- वसंत भोसलेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. सातारा येथे हेलिकॉप्टरने आले. दोन कार्यक्रमानंतर साताऱ्यात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी माणचा दौरा करून सांगलीत पोहोचले. सायंकाळी इचलकरंजीत गोरज मुहूर्तावरील विवाह सोहळ्यास हजेरी लावून शनिवारी सुरू झालेल्या विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या खास अधिवेशनास रात्रीत राजधानी मुंबईत पोहोचायचे होते. गोरज मुहूर्तानंतर म्हणजे सूर्यास्तानंतर विमानाने मुंबई गाठण्याची सोय मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरातून नाही. पश्चिम महाराष्ट्रात सात छोटी-मोठी विमानतळे आहेत, पण पुणे वगळता एकाही विमानतळावर दररोज उड्डाणे होत नाहीत आणि रात्री तर उड्डाणे होतच नाहीत. कारण त्यासाठीची यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कर्नाटकातील बेळगाव गाठावे लागते. आपल्याच मराठी सीमाबांधवांचे शहर बेळगाव आहे. त्या शहराच्या पूर्वेला सांबरा या गावी विमानतळ आहे. त्याचे आधुनिकीकरण चालू आहे. सध्या या विमानतळावरून दररोज बंगलोर आणि मुंबईला विमानाचे उड्डाण होते आहे. सकाळी बंगलोरहून आलेले विमान मुंबईला जाऊन दुपारी परतते आणि लगेच बंगलोरकडे झेपावते. बेळगाव परिसरातील प्रवाशांना या दोन्ही महानगरातून देशाच्या कोणत्याही राजधानीकडे जाता येते. तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासही करता येतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील कोल्हापुरात एका गोरज मुहूर्तावरील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आले होते. विवाहानंतर रात्री उशिरा बेळगाव गाठून विमानाने मुंबईला परतले होते. बेळगावला जाणे आणि विमान पकडणे हा काही कमीपणा आणणारा भाग नाही. मात्र, प्रश्न असा उपस्थित होतो की, आपल्या महाराष्ट्रात एकूण चोवीस विमानतळे आहेत. चार नव्याने होऊ घातली आहेत. चोवीसपैकी केवळ पाचच विमानतळांवरून दररोज विमानसेवा सुरू आहे. (मुंबई-सहारा, मुंबई-सांताक्रुझ, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर) बाकीच्या एकोणीस ठिकाणची विमानतळे न वापरता पडून आहेत. त्यापैकी केवळ नाशिकजवळच्या ओझर-दानोरी विमानतळावर रात्रीत विमान उतरविण्याची किंवा उड्डाण करण्याची सोय आहे. उर्वरित अठरा विमानतळांचा केवळ दिवसा येण्या-जाण्यासाठी वापर करता येतो. या विमानतळांवरून दररोज वाहतूकच होत नाही.कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर आल्यानंतर कोल्हापूरच्या विमानतळाचा वापर करण्यात येतो, पण रात्रीच्या उड्डाणाची असलेली सोय बंद करण्यात आलेली असल्याने शेजारच्या बेळगावच्या सांबरा विमानतळाशिवाय पर्यायच नाही. एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्रात अॅम्बी व्हॅलीतील खासगी विमानतळासह सात विमानतळे असून, पुण्याचा एकमेव अपवाद वगळता रात्रीचे उड्डाण करण्याची सोय नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे या महाराष्ट्रीयन नेत्यांना कर्नाटकातील विमानतळाचा आश्रय घ्यावा लागतो. महाराष्ट्र-कर्नाटकामध्ये सीमाप्रश्न सोडला तर तसा वाद नाही. कृष्णा खोऱ्यातील कर्नाटकाला पाणीटंचाई जाणवली की, कोयनेतून कृष्णा नदीद्वारे पाणी देण्यात महाराष्ट्र नेहमी मदतीचा हात पुढे करतो. चालू उन्हाळ््यातसुद्धा महाराष्ट्राने कर्नाटकाला आतापर्यंत दोन टीएमसी पाणी दिले आहे. तसे कर्नाटकातील विमानतळांचा वापर करण्यात गैर काही नाही.प्रश्न उरतो तो महाराष्ट्रावर ही वेळ का यावी? होऊ घातलेल्या चार विमानतळांसह (नवी मुंबई, शिर्डी, पुरंदर आणि सिंधुदुर्ग) महाराष्ट्रात एकूण अठ्ठावीस विमानतळे आहेत. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात आठ, कोकणात मुंबईसह पाच, मराठवाड्यात चार, विदर्भात नागपूरसह सहा आणि खान्देशात नाशिकच्या लष्कराच्या विमानतळासह पाच विमानतळे आहेत. त्यापैकी केवळ सहाच कार्यान्वित असावीत आणि इतर केवळ राज्यकर्त्यांच्या सोयीने दौऱ्यावर ये-जा करण्यासाठी असावीत, हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्य लोकांना किंवा उद्योजक, व्यापारी यांना त्याचा लाभ घेता येऊ नये ही वाईट बाब आहे. शिर्डीसारख्या धार्मिक ठिकाणी विमानतळ व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत नाही. ते विमानतळ दहा वर्षे रखडले आहे. नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्याची चर्चाही दहा वर्षांची जुनी आहे.विनोदाने असे म्हणतात की, नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची चर्चा दहा वर्षे चालू आहे, त्या दरम्यान चीनने शांघाय या नव्या शहराची उभारणी करून ते एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावलौकिकही प्राप्त करून गेले. मुंबईतील सांताक्रुझ येथील देशी प्रवासाचे विमानतळ आणि सहारातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रचंड वाहतुकीच्या ओझ्याने कमी पडत आहेत. म्हणूनच नवी मुंबईला नवे विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला, पण ते कधी उभे राहणार याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. मुंबईत विमानांची ये-जा इतकी आहे की, महाराष्ट्रातून नव्याने विमान सुरू करायची (कोल्हापूर-मुंबई किंंवा नाशिक-मुंबई) सोयीची वेळच मिळत नाही. त्यामुळे पुणे, औरंगाबाद व नागपूर वगळता इतर शहरातील विमानांसाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळच मुंबई विमानतळावरून मिळत नाही. त्यामुुळे इतर शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली तरी उड्डाण किंवा उतरण्यासाठी दुपारचीच वेळ मिळते. भरदुपारी कोल्हापूरला येऊन किंवा कोल्हापूरहून मुंबईला जाऊन कामे करता येत नाहीत. हीच अवस्था नाशिक, नांदेड, चंद्रपूर किंवा सोलापूरची झाली आहे. नवी मुंबईचे विमानतळ उभे राहिले, मुंबईतील विमानतळावरील गर्दी कमी झाली तरच हे शक्य आहे.ही अवस्था महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला शोभून दिसणारी नाही. पुण्यातही वापरात असलेले विमानतळ लष्कराचे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत लष्कराशिवाय इतरांना वापरता येत नव्हते. पुण्याच्या नागरिकांसाठी म्हणून स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत विमानतळच उभे करण्यात आले नाही. आता पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्र्णय घेतला आहे. त्यासाठी जमीन देण्यास शेतकरी विरोध करीत आहेत. त्यापूर्वी तो चाकणला करायचा का यावर दहा वर्षे चर्चेत घालविण्यात आली. चाकण गैरसोयीचे आणि नवी मुंबईला जवळ असताना तेथे करण्याचा आग्रह का होता समजत नाही. पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सोयीचे ठरणार आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचे विमानतळ विकसित होत नाही तोवर बारामती, कऱ्हाड, कोल्हापूर आणि सोलापूरला विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न झाले. यातील एकही विमातनळ परिपूर्ण नाही. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीसाठी कोल्हापूरचे विमानतळ परिपूर्ण उभे करणे सोयीचे असताना कऱ्हाडच्या विमानतळाचा आग्रह धरून कोट्यवधी रुपये घालण्यात आले. ते अद्याप ४७ हेक्टर जमीन हवी असल्याने पूर्णच होत नाही. ही जमीन ओलिताखालील आहे. शिवाय शेतकरी गुंठ्याला एक लाख दहा हजार रुपये मागतो आहे. सांगलीजवळ कवलापूर येथे विमानतळासाठी जागा संपादन करुन बरीच वर्षे झाली आहेत. कोल्हापूर विमानतळ काही मिनिटांच्या अंतरावर असताना आणि कऱ्हाडचे विमानतळ पूर्ण क्षमतेने चालू शकणार नाही, हे माहीत असूनही हट्टाने ते उभे करण्याचा प्रयत्न झाला. या तिन्ही तालुक्यांसाठी कोल्हापूरचे विमानतळ पूर्ण क्षमतेने उभे करणे आवश्यक आहे. आता कर्नाटकाचा आश्रय आपण घेतो आहोत. बेळगाव महाराष्ट्रात आले नाही, पण बेळगावहून मुंबईला दररोज विमान आहे, पण कोल्हापूरहून आपल्या राजधानीत जाण्यास नसावे, हे वाईट आहे. कोल्हापूरचे विमानतळ पूर्ण विकसित झाले तर बेळगावसह सीमाभागातील बांधवांना त्याचा उपयोग करता येऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे, विदर्भात नागपूर, मराठवाड्यात औरंगाबाद वगळता मुंबईच्या बाहेर एकही विमानतळ चालू स्थितीत नाही किंवा तेथे दररोजची विमानसेवा नाही. याचा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करायला हवा. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आहे. १९९९ ते २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर होते. यापैकी दहा वर्षे केंद्रातही सत्तेत होते. २००४ ते २००९ पर्यंत विमान वाहतूक मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होते. त्या काळात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सहा खासदार या पक्षाचे होते. शरद पवार यांचे कोल्हापूरवर आजोळ म्हणून खास प्रेमही आहे, पण त्यांनी या सुवर्णकाळात कोल्हापूरचे विमानतळ परिपूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न केला नाही किंवा त्यांच्या पक्षाच्या सुभेदारांनी आग्रही भूमिका घेऊन प्र्रयत्न केले नाहीत. (यांना प्रश्न सोडविण्याऐवजी ते जिवंत ठेवून त्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, हे सांगण्यात पुरुषार्थ वाटतो, अशी शंका येते.)कर्नाटकाने आता बेळगावला अत्याधुनिक विमानतळ उभे करण्यात पुढाकार घेतला आहे. दोनच वर्षांपूर्वी बेळगावपासून केवळ नव्वद किलोमीटरवर असलेल्या हुबळीला परिपूर्ण विमानतळ उभे केले तरीही इतक्या कमी अंतरावर दुसरे विमानतळ उभे राहते आहे. धारवाडसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभे केले. कोल्हापूरपेक्षाही नंतरची ही मागणी होती. धारवाड हे उत्तर कर्नाटकातील प्रमुख शहर असताना याच विभागात गुलबर्गा येथेही खंडपीठ स्थापन करण्यात आले. कर्नाटक उच्च न्यायालयाने धारवाड येथे जागा आणि इमारतीची सोय होईल का अशी शंका उपस्थित केली तेव्हा ते खंडपीठ मंजुरीत अडकले असताना चारशे कोटी रुपये खर्चून खंडपीठाच्या भव्यदिव्य इमारतीच उभा करण्यात आल्या. असा धडाका लावायला हवा. महाराष्ट्रात सर्व काही असताना केवळ राजकीय सोयीसाठी किंवा नेत्यांच्या अहंकारासाठी आपापल्या शहरात विमानतळे उभारली , पण ती चालू नाहीत. त्यामुळे ती केवळ दिखाऊ विमानतळे झाली आहेत.महाराष्ट्रातील विमानतळे महाराष्ट्रात २८ विमानतळे आहेत, पण त्यापैकी केवळ सहाच ठिकाणी दिवस-रात्र उड्डाण करण्याची सोय आहे. केवळ तीनच ठिकाणांहून आंतरराष्ट्रीय प्रवास करता येऊ शकतो. अठ्ठावीसपैकी चार विमानतळे अद्याप तयार व्हायची आहेत.पश्चिम महाराष्ट्र - पुणे - (लष्करी), हडपसर, बारामती, सोलापूर, कऱ्हाड, कोल्हापूर, पुरंदर (नियोजित), अॅम्बी व्हॅली (खासगी)मराठवाडा - औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद खान्देश - ओझर - नाशिक (लष्करी), नाशिक - (गांधीनगर), धुळे, जळगाव, शिर्डी (नियोजित)विदर्भ - नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)