-सुभाषचंद्र वाघोलीकरपंतप्रधानांनी महाटाळेबंदी पुकारल्यापासून महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असताना आपल्याला फक्त चौफेर गोंधळ पाहायला मिळत आहे. भारत खुला झालाय का अजून कुलूपबंद आहे? या प्रश्नाचे ठाम उत्तर किंवा अंशत: उत्तरसुद्धा देता येत नाही. गृह मंत्रालयातून निघालेल्या लहरी फर्मानांनी परिस्थिती आणखी गढूळ मात्र केली. हे हुकूम कायदेशीर आहेत की नाहीत, याचीही शंकाच आहे.वेगवेगळे अधिकारपदस्थ वेगवेगळे अर्थ सांगतात, त्यावर खुलासे होतात आणि खुलाशावर खुलासेसुद्धा केले जातात. साथीमुळे उद्भवलेल्या आणीबाणीत आरोग्य विभागाचेच मत दुसऱ्या कोणत्याही उद्देशापेक्षा प्रमाण मानले पाहिजे.असे असताना हे आदेश गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सहीने का निघतात, हाही प्रश्न आहे. कोरोनाविरोधी लढाईचे नेतृत्व जिच्याकडे असायला पाहिजे, ती इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेला ते आदेश काढताना पुसले होते काय? दिसते असे की, दोन विचारधारा परस्परविरोधी दिशांनी धावत आहेत- एका बाजूने पुकार होतोय की, पैसे कमावण्याचा धंदा झटपट सुरू करू द्या बरं! पण साथीचा धोका डोळे वटारतोय, याची दुसºया बाजूला जास्त काळजी वाटते. स्वत: सरकार मात्र श्रद्धाळू देशाला पुढची- मागची काही आखणी न करता अंधाºया बोगद्यात ढकलून दिल्यानंतर आता स्वत:चे हातपाय सोडवून घेण्यासाठी चाचपडत आहे. एका उद्योगपतीने अगदी अचूक शब्दांत तात्पर्य सांगितले की, कोरोना व्हायरस होता जो देशभर पसरविण्याचे काम सरकारने करून दाखविले !हा पेच भारतातच पडलाय असं नाही. अनेक भारतीयांच्या स्वप्नातील आदर्शभूत नमुना असलेल्या अमेरिकेत आणि दुसºयाही पश्चात्य आणि पोर्वात्य देशांमध्ये हीच गोष्ट घडताना दिसतेय. राजकारणी वर्गाचा कुचकामीपणा कोरोनाने थेट वेशीवर टांगला, ही संकटातील अजोड फलनिष्पत्ती म्हणावी लागेल. इतिहासातील मोठ्या परीक्षेत राजकारणी वर्ग नापास झालाय, अगदी दांडी उडालीय त्यांची. काय करणार, आम्हाला काहीच पूर्वसूचना नव्हती, आम्हाला काही आखणी करायला, तयारी करायला वेळच मिळाला नाही, हा त्यांचा लंगडा बचाव आहे. शास्त्रज्ञ मंडळी पार जानेवारी २०२० पासून आगामी संकटाचे स्वरूप आणि व्याप्ती काय असेल, याबाबत इशारे देत होती; पण आमची सरकारे बहिरी आणि आंधळी झालेली, मार्चचा मध्य येईपर्यंत त्यांना काहीच उमगले नाही आणि तोपर्यंत तो राक्षस बकासूरासारखा माजला होता!‘लान्सेट’ हे वैद्यकविज्ञानाचे अग्रणी नियतकालिक आहे. त्याने ३१ जानेवारीला, हो- जानेवारीच- एक निबंध प्रसिद्ध केला, ज्यात या जागतिक महामारीचा इशारा दिला होता. हाँगकाँग विद्यापीठाच्या तीन संशोधकांनी लिहिलेल्या या निबंधात गणिती प्रारूपाच्या मदतीने कोरोना महामारीचा चीनमध्ये आणि तेथून बाहेर कसाकसा प्रसार होऊ शकतो, याचे भाकीत करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेला जेवढी माहिती उपलब्ध होती, ती वापरून त्यांनी जगव्यापी महामारीचा इशारा दिला होता. त्यांनी बजावले होते की, ‘एवढ्या मोठ्या व्याप्तीच्या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी अगदी थोड्या अवधीच्या सूचनेने अंमल सुरू करता येईल, अशा सिद्धतेच्या योजना हाताशी ठेवल्या पाहिजेत. त्यात औषधांच्या पुरवठ्याची साखळी कायम करणे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (उपचार करणाºयांच्या वापरासाठीचे साहित्य), हॉस्पिटलांना लागणारे सामानसुमान आणि जरूर ते मनुष्यबळ यांची योजना करून ठेवली पाहिजे.’या आगाऊ इशाºयामुळे फारच थोडे राजकीय नेते हालले असे दिसते. याला कदाचित एखादा जर्मनी, एखादा दक्षिण कोरिया अपवाद म्हणू. केरळ राज्याने आदल्याच दिवशी भारतात घडलेल्या पहिल्या कोरोना आयातीची सूचना दिली होती. त्या राज्याने सार्वजनिक आरोग्यसेवेची जी बांधीव क्षमता निर्माण केली होती, तिच्या बळावर अल्पावधीत नमुनेदार यश मिळविले; परंतु हे झाले अपवाद. राजसिंहासनांच्या पुढे-मागे झुलणाºया एकातरी महाभागाने ‘लान्सेट’मधील तो लेख चुकूनमाकून का होईना वाचला असता आणि त्यातील गंभीर शब्दांचा अर्थ त्याला उमगला असता, तर तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तरी सरकारी यंत्रणेला चालना देऊ शकता, पण सत्तेच्या सारिपटात गुंगलेली मंडळी कधी काही वाचतात की नाही, देवच जाणे, मग विद्वतजनांची प्रकाशने वाचणे खूप दूरच! लोककथेमध्ये राजा नागडा असल्याचे ओरडून सांगणारा जो लहान मुलगा होता, त्याची जीभ तुटली आहे आणि त्याचा चापलूस मीडियावाला बनला आहे. विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्याविषयी आपल्या राजकारण्यांची तुच्छता भयचकित करणारी आहे.सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण या संस्कृतीच्या दोन आधारस्तंभांच्या खच्चीकरणाची शिक्षा आपण भोगत आहोत. राज्यकर्त्यांनी लोकहितावर दगड ठेवून या दोन गाभाभूत जबाबदाºया वाºयावर सोडल्या व त्या खासगी नफेखोरीला आंदण दिल्या. आरोग्य आणि शिक्षण हे कधीच निवडणुकीचे मुद्दे केले जात नाहीत, राजकीय पक्षांकडून नाहीत, माध्यमांकडून नाहीत आणि खुद्द मतदारांकडूनही नाहीत. परिणाम होतो हा की, कोरोना महामारीत औषध म्हणून फरशी पुसण्याचे कीटकनाशक प्यायला देणारे आमच्या लोकशाहीचे नेते बनतात व दुसरे कोणी देशी गोमूत्राचे प्याले रिचविण्याचे मेळे भरवतात. सध्या आमची परमपूज्य सद्गुरू महाराज मंडळी कोरोना व्हायरसची महायज्ञात आहुती देण्यासाठी आश्रम व मठांची कुलपे उघडण्याचीच वाट पाहात आहेत. कदाचित ३ मे नंतर तेही पाहायला मिळेल.(लोकमत, औरंगाबादचे माजी संपादक)
ज्ञानविज्ञानाशी वैर करणारे पुढारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 3:05 AM