- प्रा. शिवाजीराव भुकेलेमध्ययुगीन कालखंडातील सर्वच प्रांतांतील संतांनी स्वत:मधील ‘अहंकाराचा’ जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते आपल्या कालखंडात का असेना समाजाच्या मानगुटीवरील अहंकाराचे भूत उतरवू शकले. जोपर्यंत मीपणाची जाणीव सरत नाही, तोपर्यंत दिव्यत्वाची आणि देवत्वाची प्रचिती येऊ शकत नाही. मीपणा हाच मोक्षमार्गातील सर्वांत मोठा अडथळा आहे. ज्ञानाचा आणि अहंकाराचा जवळचा संबंध आहे. एकदा ज्ञानाला अहंकाराची नशा चढली, की स्वत:ला स्वत:भोवती गिरक्या घालायला लावून ती जगाला तुच्छ लेखायला लावते. कर्तेपणाची ही लागण ज्ञानी म्हणवून घेणाऱ्यालाही उद्धट बनविते. ज्ञानाचा उन्मादर् सामान्यांच्या जीवनात ज्ञानेच्छेच्या कोवळ्या किरणांऐवजी अंधकाराचेच काळेकुट्ट मेघ निर्माण करतो, हे तथाकथित आचार्य, शास्त्री, पंडित, गुरू, स्वयंघोषित जगद्गुरू ईश्वराचे प्रति अवतार यांनी लक्षात ठेवावे. अहंकाराच्या विलक्षण मिठीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात -नवल अहंकाराचे गोठी ।विषेश न लगे अज्ञान्यांचे पाठी ।सज्ञानाच्या झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ।।ज्ञानी माणसाच्या कंठाला अहंकार झोंबला की, तो त्याला नाना संकटाने नाचवितो. आम्ही तर रात्रंदिवस माझ्या व मीपणाच्या पोषणासाठी अहंकाराची मदिरा बरोबरच घेऊन फिरत आहोत. तर दुसºया बाजूला कुणी मठ, मंदिरासाठी शिष्याची पिलावळ वाढविण्यासाठी स्वत:च्या पारमार्थिक प्रदर्शनासाठी अहंकाराचे अदृश्य पोषण करतो. स्वत:ला पारमार्थिक म्हणवून घेणारी व अहंता-ममतेचा त्याग न करणारी मंडळी अहंकाराचे अदृश्य पोषक आहेत आणि हे अदृश्य पोषक दृश्यापेक्षा खूपच घातक आहेत.
अहंकार सोडावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:25 AM