‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:55 PM2022-07-02T14:55:35+5:302022-07-02T14:56:36+5:30
दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दिवस होते.
गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते -
वाहरलाल दर्डा यांचे नाव मी ऐकून होतो, प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती. पण, जेव्हा इंदिराजी म्हणाल्या, ‘तुला महाराष्ट्रातून लोकसभा लढायची आहे आणि त्यासाठी वाशिम लोकसभा मतदारसंघ ठरवला आहे.’ - त्या निवडणुकीसंदर्भात पहिल्यांदा दर्डाजींशी संबंध आला. माझ्याकरिता सुचवलेल्या वाशिम मतदारसंघाचे पूर्वीचे खासदार स्वर्गीय वसंतराव नाईक होते. त्यांच्या दु:खद मृत्यूनंतर ती जागा खाली झाली होती. इंदिराजींनी अंतुलेंना सांगितले, ‘दर्डाजी को फोन करो और उनको बताओ, वाशिम के लिये गुलाम नबी को भेज रही हूं। उनकी पुरी मदत कीजिए।’ दर्डाजींवर इंदिराजींचा संपूर्ण विश्वास होता.
दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दिवस होते. ताबडतोब मी नागपूरमार्गे यवतमाळला गेलो. अगदी तरुण होतो. दर्डाजींशी भेट झाली आणि माझी चिंताच मिटली. दर्डाजींनी मला खूप मोठा आधार दिला. पहिल्याच भेटीत मला म्हणाले, ‘कसली चिंता करू नका! काश्मीरहून तुम्ही इथे लढायला आलात, पुढचे मी पाहतो! ’ - त्यानंतर निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. त्यादरम्यान दर्डा परिवारासोबतचा माझा संबंध अधिक दृढ झाला. दर्डाजींच्या पत्नी वीणाताई... उनके बारे मे क्या बोलू? जेव्हा-जेव्हा मी यवतमाळला गेलो, तेव्हा-तेव्हा त्यांनी न जेवता मला कधीही जाऊ दिलं नाही. अवघ्या दर्डा कुटुंबाने मला खूप प्रेम दिलं. जवाहलालजी, विजयबाबू, राजेंद्रबाबू या सर्वांनी मला फार जीव लावला. ‘लोकमत’चं जे साम्राज्य आज उभं राहिलं आहे, त्यामागे बाबूजींची दूरदृष्टी आहे. कोणतंही काम इमानदारीत करायचं, हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. ते सेक्युलर होते. त्यांचा पूर्ण परिवार सेक्युलर आहे. त्यांच्या घरात दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतसुद्धा हिंदू-मुस्लीम किंवा जात-पात असा कसलाही भेद नाही, याचा मला फार अभिमान वाटतो. इंदिराजी आणि बाबूजींची राजकीय गाठ पक्की झाली, याचं कारण दोघांमध्ये ‘सेक्युलरिझम’ हा समान धागा होता. बाबूजींच्या मृत्यूनंतरही बाबूजींच्या परिवाराशी माझे संबंध तेवढेच घट्ट राहिले.