मानवा-मानवात कोणताही फरक नसावा; स्त्री सकट प्रत्येक व्यक्तीचा माणूस म्हणून विचार व्हावा, हे विचार आधुनिक काळात महात्मा फुले, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, आगरकर व भांडारकर यांनी अधोरेखित केले. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जगण्यातून स्त्री मुक्तीच्या त्या आद्य प्रणेत्या होत्या हे सिद्ध केले. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका आणि ‘अर्वाचीन मराठी काव्याच्या जननी’ आहेत. सन १८५४ मध्ये त्यांचा ‘काव्यफुले’ हा ४१ कवितांचा संग्रह केशवसुतांच्या अंदाजे ३० वर्षे आधी प्रसिद्ध झाला. भारतातील प्रबोधन युगात नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्याकडे सावित्रीबार्इंचा ३ जानेवारी १८३१ रोजी जन्म झाला. १८४० साली जोतिबांशी त्यांचा विवाह झाला. थॉमस पेन यांच्या ‘जस्टिस अँड ह्युमॅनिटी’ तसेच ‘राईटस् आॅफ मॅन’ या ग्रंथांनी घडलेल्या जोतिबांना स्त्रीच्या बुद्धीची, भावनांची, व्यक्तिमत्त्वाची जाणीव होती. त्यांच्याच प्रेरणेने १८४७ मध्ये सावित्रीबाई नॉर्मल स्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जोतिराव व सावित्रीबाई ही दोन स्वतंत्र प्रस्फुरणे होती. फुले दाम्पत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केली. पुरोगामी भिड्यांनी शाळेसाठी भाडे न घेता उलट रु. १०१ देणगी म्हणून दिले. तसेच दरमहा पाच रुपयांची मदत शाळेला देऊ केली, असा उल्लेख आढळतो. या आधी मिशनरींनी मुलींची शाळा सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. १८२० साली मिस कुकने बंगालमध्ये आणि नंतर त्याच बाई मिसेस विल्सन झाल्यावर पुण्याच्या मंगळवारी परिसरात स्कॉटिश मिशनतर्फे शाळा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.भिडे वाड्यातील शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या सावित्रीबार्इंनी समाजाकडून होणाऱ्या अवमानाला धैर्याने तोंड दिले. त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. १८ ठिकाणी शाळा सुरू करणाऱ्या जोतिबा व सावित्रीबार्इंचा या शिक्षण कार्यासाठी १२ फेब्रुवारी १८५३ ला मेजर कँडी यांनी विश्रामवाड्यात मोठा सत्कार केला.१८५३ लाच फुले वाड्यात भ्रूणहत्त्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केले. १८७३ साली अडचणीत आलेल्या काशीतार्इंचे त्यांनी बाळंतपण केले आणि यशवंतराव या तिच्या मुलाचा पुत्र म्हणून सांभाळ केला. १८०६ च्या दुष्काळात सत्यशोधक समाजातर्फे दोन हजार मुले व मुलींची जेवण व्यवस्था केली होती.नापितांचे हृदयपरिवर्तन करून केशवपनाची क्रूर पद्धत त्यांनी बंद केली. शेतकरी व मजूर स्त्री-पुरुषांसाठी प्रौढ शिक्षण देणाऱ्या रात्रीच्या शाळा आणि १८६४ ला अनाथ बालकाश्रम काढण्याचे अमोल कार्य त्यांनी केले.१८९० ला जोतिबांच्या निधनानंतर अखंड कार्यरत असणाऱ्या या करुणामय मूर्तीचे प्लेग पीडितांची सेवा करताना निधन झाले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे
स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा
By admin | Published: January 21, 2017 12:07 AM