पंढरपूरची आषाढी वारी जवळ आली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत-सज्जनांच्या पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. त्यांच्यासोबत लाखो वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता झपझप पावले उचलत आहेत. ‘एक गाऊ विठु तुझे नाम आणिकाचे काम नाही’ या संतवचनाप्रमाणे केवळ आणि केवळ विठुचा ध्यास लागलेले वारकरी येणाऱ्या सर्व संकटांचा आनंदाने प्रतिकार करत भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरवत टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत वाटचाल करीत आहेत. एवढेच काय त्याला स्वत:च्या पोटाचीही चिंता नसते. मुखाने हरिनाम गात निघालेल्या वारकऱ्याच्या मुखात दोन घास घालणारे श्रद्धाळू जागोजाग भेटतात. त्यांंच्यापुढे हात पसरण्यात वारकऱ्याला कधीच कमीपणा वाटत नाही. गरजेपुरते पोटात ढकलणे आणि अखंड हरिनाम घेत वाटचाल करणे एवढेच त्याला माहीत असते. गावोगावचे प्रतिष्ठित, गरीब-श्रीमंत यांच्याशी त्याला काही देणे-घेणे नसते. काही शक्ती आता वारकऱ्यांचेही लक्ष विचलित करू लागल्या आहेत. गावागावात पालखी येते तेव्हा घोषणा, आरोळ्या देऊन गणपती उत्सवाप्रमाणे पालख्यांचे स्वागत करणे, फटाके वाजवणे, आमच्यासाठी पालखी थांबवा म्हणणे, मानकऱ्यांशी हुज्जत घालणे, आदी प्रकार घडत आहेत. पण वारकरी त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. आपण गावात पालखीचे स्वागत करतो म्हणजे नेमके काय करतो हेच गावोगावच्या पुढाऱ्यांना कळत नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे अन् नातलगांचे दर्शन होईपर्यंत पालखी थांबून ठेवण्याचा आग्रह एकापुरता मर्यादित नसून लाखो लोकांचा सोहळा त्यासाठी थांबला जातो, याची कल्पना यायला हवी. भल्या सकाळी निघालेला पालखी सोहळा म्हणजे पादुका विसावल्याशिवाय बसायचे नाही, असा वारकऱ्यांचा नियम असतो. त्यामुळे किती वाजता निघायचे अन् किती वाजता पोहोचायचे हे ठरलेले असते. त्यामुळे वाटेतल्या भाविकांच्या भावनांची कदर करत बसले तर पंढरपूरपर्यंत पोहोचणेच कठीण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह काही सोहळ्यात रिंगणाचा खेळ होतो. तो वारकऱ्यांचा आनंदाचा खेळ असतो. तो प्रेक्षकांनी फक्त पहावा, अशी अपेक्षा असते. पण काही अतिउत्साही भाविक वारकऱ्यांच्या खेळात व्यत्यय आणतात. रिंगणाचाही बऱ्याच वेळा आनंद हिरावून घेतात. वारीच्या वाटेवर कधीही तुम्हाला चिडचिड, शिवीगाळी किंवा बाचाबाची पाहायला मिळत नाही. १५-२० दिवसांची वारी वारकरी आनंदमयी करतो, पण गावोगावचे अतिउत्साही कार्यकर्ते त्यामध्ये व्यत्यय आणतात. तसे न होऊ देता वारकऱ्यांना त्यांच्या मार्गाने व परंपरेने जाऊ द्या. त्यांची वारी सुखेनैव वारी होऊ द्या.
वारी सुखेनैव होऊ द्या
By admin | Published: June 29, 2017 12:56 AM