- किरण अग्रवालरोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही; सरकार काळजी घेईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अखेर हो ना हो ना करीत बुधवारच्या रात्रीपासून राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे हे खरेच; परंतु अंतिमतः जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. आता तरी जनतेने समजूतदारी दाखवत प्रशासनाला सहकार्य करून निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, तसे केले तरच कोरोनाच्या संकटाला थोपवणे शक्य होईल.राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून, प्रतिदिनी सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान होत आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के एवढे झाले असले तरी मृत्युदर 1.66 टक्के इतका आहे. सर्वाधिक एक लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक जिल्ह्यांचा नंबर लागतो. रुग्णसंख्या वाढत आहे तशी रुग्णालये अपुरी पडत असून, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळणेही सोडा, आता तर रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हताशपणे मेडिकलवाल्यांकडे रांगा लावताना दिसत आहेत. शासन प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करताना दिसत आहेच; पण परिस्थिती अशी काही हाताबाहेर चालली आहे की भयाचे ढग दाटून यावेत.चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत कोरोनाची स्थिती तशी निवळलेली दिसत होती; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने दार ठोठावले आणि गेल्या वर्षापेक्षाही भयावह रूप धारण करीत कहर माजविला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने एकेक करून काही निर्बंध घातले खरे, परंतु त्याने कसलाही परिणाम होताना दिसून आला नाही. लोकांनीही कोरोना संपल्यात जमा झाल्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले. मास्क न वापरता व फिजिकल डिस्टन्स न बाळगता सारे व्यवहार होऊ लागल्याने संसर्गाचा वेग वाढून गेला आणि अखेर नाइलाज म्हणून राज्यात कडक निर्बंध आणि पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारण्याची वेळ आली. अर्थात या संचारबंदीत अत्यावश्यक वा जीवनावश्यक सेवावगळता इतर घटकांनी घरातच सुरक्षितपणे थांबणे अपेक्षित आहे, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ असा नारा दिला असून, नागरिकांनी सहकार्य केले तर ही साखळी निश्चितच तुटू शकेल.महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. एकूण 5 हजार 476 कोटी रुपयांचे कोरोना पॅकेज घोषित करण्यात आले असून, रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पॅकेज अंतर्गत 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू व तांदूळ देण्यात येणार असून, तब्बल 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर गरजूंना मोफत देण्यात येणार असून, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालक व नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत किंवा सहाय्य पुरेसे नाही व सर्वांसाठी नाही हेदेखील खरे; परंतु या संचारबंदीच्या काळात ज्यांची उदरनिर्वाहाची अडचण होऊ शकते अशा लहान घटकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. शेवटी हे संकट सर्वांवरचे आहे त्यास सर्वांनी मिळूनच सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका बहुसंख्य घटकांना थोड्याफार प्रमाणात बसणार असला तरी जिवाची काळजी म्हणून सर्वांनीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षितपणे थांबणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने ही संचारबंदी फळास जावो अशी अपेक्षा करूया...
ही संचारबंदी फळास जावो...
By किरण अग्रवाल | Published: April 15, 2021 9:39 AM