- बाळासाहेब बोचरेयोद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारक-याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. गेली आठ वर्षे माऊलींचा अश्व म्हणून सोहळ्यात वाटचाल करणाºया ‘हिरा’ या अश्वाला रविवारी वारीच्या वाटेवर चालता चालता भाग्याचं मरण आलं. गेल्या आठ वर्षांत या अश्वाने लाखो भाविकांना लळा लावला होता.‘हिरा’ त्याचं नाव. पांढराशुभ्र रंग आणि तजेलदार उमदा असलेला हिरा चपळ तर होताच शिवाय रिंगणाच्या खेळात त्याला डोळे भरून पाहावं असंच वाटायचं. हिराचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अंकली (जि. बेळगाव) येथील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार हे मुख्य मानकरी आहेत. सोहळ्यासाठी त्यांचे दोन अश्व आणि माऊलींसाठी तंबू असतो. दोन अश्वांपैकी एक माऊलींचा अन् दुसरा स्वाराचा अश्व हे बहुतांशी वारक-यांना चांगलेच ज्ञात होते. पालखी पुढे २७ ंनंबरच्या दिंडीमागे चालणारे हे दोन अश्व आले म्हणजे गावोगावी माऊली आल्याचा आनंद गावक-यांना व्हायचा. एरवी आपण सर्वसामान्य अश्व किंवा एक पशू अशीच त्याची गणना करतो. पण सोहळ्यातील वारकरी पशूंनाही देवाच्या रूपात पाहतात. श्रीमंत शितोळे सरकार यांचा तर अश्वावर प्रचंड जीव. अनेक वेळा त्यांनी त्यांचा तबेला पाहायला या, असा आग्रह केला. अंकलीच्या तबेल्यात वर्षभर अश्वांना पोसले जाते. त्यांची तयारी करून घेतली जाते. मारुतीबुवा आणि मानतेश या काळजीवाहकांना सरकारांनी पारखून नेमले आहे. तबेल्यातील अश्वावर आपल्या कुटुंबातीलच सदस्यांप्रमाणे सरकार प्रेम लावतात.तरुण वयात पालखी सोहळ्यात हिरा दाखल झाला तेव्हा त्याला आवरणे कठीण जायचे, पण गेली आठ वर्षे तो माऊलीमय झाला होता. पालखी सोहळ्यातील चार गोल अन् तीन उभ्या रिंगणाच्या माध्यमातून वारकºयांमध्ये चैतन्य फुलविण्याचे काम हिराने केले. हिराचे रिंगण सुरू झाले की संपूच नये असे वाटते. हिराच्या टापा म्हणजे भाविकांच्या नेत्रपटलात साठवून ठेवलेल्या छबी असून, हिरा अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. धावणारे अश्व म्हणजे साक्षात माऊली आपल्यासमवेत खेळत आहेत अशी वारकºयांची श्रद्धा असून, रिंगणाचा खेळ झाल्यानंतर त्यांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी श्रद्धाळूंची उडणारी झुंबड पाहिली की प्राणिमात्रांवर किती आणि कसा जीव लावावा याची शिकवण इथेच मिळते. गेल्या आठ वर्षांत हिराने शेकडो मैलांचा प्रवास केला असून, हिराचे प्रत्येक पाऊल हे त्या मातीला पावन करत गेले आहे. माऊलींचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या जीवापुढे नतमस्तक होतात. श्रद्धेने त्याच्या पाया पडतात. असे किती श्रद्धाळू त्याने घडविले असतील याची मोजदाद नाही. किती जणांनी त्याच्या पायाची धूळ मस्तकी लावली असेल याची मोजदाद नाही. लाखोंच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिराच्या पायाची धूळ मस्तकी लागावी यासाठी धडपडणाºया भाविकांना हिराचा विरह पोटात कालवाकालव केल्याशिवाय राहणार नाही.
तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या मस्तकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:23 AM