अपर्णा वेलणकर
पावसाळा संपला की, बेडकांच्या काही जाती ‘हायबरनेशन’मध्ये जातात. म्हणजे मराठीत निष्क्रिय होतात. अखिल भारतीय वैगेरे मराठी साहित्य महामंडळाचे तसेच आहे. एक संमेलन संपल्यावर जी झोप घ्यायची, ते थेट पुढल्या संमेलनाच्या तुताऱ्या वाजवायलाच उठायचे. ठाले-पाटील बोलू लागले की समजावे, चला, आले पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! या वर्षी कोरोनाने नसता गोंधळ घातला म्हणून, नाहीतर एव्हाना मांडव परतण्याचे मानापमान सोहोळे संपवून अ.भा. मराठी साहित्य महामंडळ पुन्हा एकवार शयनगृहात जाण्याची वेळ झालीच असती. तरीही उगीच अपवादाची तीट नको, म्हणून सलामीलाच किरकोळ वादाचा खेळ उरकून या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकपदाची माळ नाशिककरांच्या गळ्यात पडली आहे. हे उत्तम झाले. पुण्याने कितीही डोळे वटारले, तरी नाशिककरांच्या सांस्कृतिक उमदेपणाला तोड मिळणे तसे अवघडच. या शहराचा साहित्यिक इतिहास संपन्न, मनाची श्रीमंती मोठी आणि खिसाही खोल! उगीच कटोरे घेऊन सरकारच्या दारात जाण्याची गरजच पडू नये, अशी राजकीय पुण्याईही गाठीशी जोडलेली, शिवाय देश-परदेशातून कुठूनही नाशकात यावे म्हटले, तरी सोपे आणि नाशकात येण्याला नवी-जुनी नयनरम्य, चवीढवीची साहित्यबाह्य कारणेही तशी पुष्कळच! साहित्य संमेलन यशस्वी करायला आणखी काय लागते, तेव्हा तसे ते होईलच!
या वर्षी अनेक अटी-शर्ती असतील, कोरोनाने घातलेली दृश्य-अदृश्य बंधने पाळावी लागतील. पण जे ठरवले, ते करून दाखविण्याची धमक नाशिककरांच्या ठायी असणार, हे निर्विवाद! पण मराठी साहित्य संमेलन म्हणून जे काय करायचे, ते नेमके काय आणि कसे असावे? याचा जरा मुळातून विचार करणे कधीपासून मागेच पडून गेले आहे; त्याची निदान सुरुवात तरी नाशिकने करायला हवी. गेल्या दीड दोन दशकांत जग किती बदलले, याचे वारे मराठी साहित्य क्षेत्राला कोणत्याच अर्थाने फारसे लागलेले नाही. साहित्याभिमानाच्या जुनाट प्रथा-परंपरांची बोटे सोडायची हिंमत नसलेले (मराठीत) लिहिणारे ‘जुने’च राहून गेले आहेत आणि जगभराचा वारा प्यायची विपूल साधने उपलब्ध झालेले ‘वाचणारे’ मात्र नि:ष्कांचन मातृभाषेची चिंता करणे सोडून, श्रीमंत मावशांच्या सोबतीने जगभ्रमंतीला निघून गेले आहेत. हे वाक्य जरा झोंबणारे वाटत असल्यास, आपल्या मराठी साहित्य संमेलनांच्या गेल्या पाच-दहा वर्षांच्या कार्यक्रमपत्रिका काढून पाहाव्यात. तेच विषय, तेच वक्ते, तोच वकूब, तेच उमाळे, तीच रडगाणी आणि अख्ख्या मंडपभर पसरून राहिलेला असह्य कंटाळ्याचा तोच चिकट तवंग! हल्ली आडगावी जी साहित्य संमेलने झाली, तिथली गर्दी होती ती मुख्यत: मंडपाच्या बाहेर. पुस्तक प्रदर्शनात, खाण्यापिण्याच्या ठेल्यांवर आणि मोकळ्यावर रंगलेल्या गप्पांच्या कोंडाळ्यात!!
‘नाही हो, हल्ली लोक नेटफ्लिक्सवर चावट सिनेमे बघत बसतात, पुस्तके कुठे कोण वाचतो?’ असे आक्रंदन करणे सवयीचे होऊन गेलेल्यांनी एकदा स्वखर्चाने ‘जयपूर लिट फेस्ट’ला चक्कर टाकून यावे. इतक्या लांब कशाला, मुंबई-पुण्यातही हल्ली छोटे-मोठे लिट-फेस्ट होतात, तिथे जावे. हे ‘फेस्ट’ इंग्रजी असतात, म्हणून घाबरू नये. तिथे हिंदीत लिहिणारे-बोलणारे लेखकही असतात आणि मुख्य म्हणजे असतो, तो गर्दी करून जमलेल्या जाणत्या, प्रत्यक्ष काही वाचणाऱ्या वाचकांचा सळसळता उत्साह! कोणत्या ‘लिट फेस्ट’मध्ये यंदा कोण लेखक आहे, ते ठरवून आपापले प्रवासाचे बेत आखणारे चोखंदळ वाचक या महाराष्ट्र भूमीतही आहेत. ते साहित्य संमेलनांच्या वाट्याला जाईनासे झाले आहेत; कारण त्यांना आकर्षून घेईल, अशी कसलीच ‘जादू’ या मराठी मंडपात नसते. ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशा साहित्यिकांची जुनी पिढी काळाच्या पडद्याआड झाली, मधल्या पिढीची सुगी तशी कोरडीच गेली आणि नव्या माध्यमात नवे प्रयोग करणारे हरहुन्नरी नव-निर्मिक साहित्य वा अन्य कलाक्षेत्रात आहेत, याचा महामंडळाला अद्याप पत्ताच नाही! त्यातून ‘मराठी’ या एकाच भाषेचे काटेकोर रिंगण आखलेले! सगळा खेळ त्याच्या आतच मांडायचा, तर इतक्या अटीशर्ती असलेल्या आणि केवळ गट-तट, ओळखी-पाळखी एवढेच जाणणाऱ्या या जुनाट गदळ वाड्यात जगभरातल्या सर्जनाचे वारे येणार कसे? स्वत:च्या कोंकणीपणावर स्वत:च कोट्या करून मिश्कील हसणारे विंदा आता नाहीत. कोटजाकिटे घालून आणि साड्यांचे पट्टे काढून साहित्य क्षेत्रातले कारभारी म्हणून मिरविणाऱ्यांनी ‘तेच ते आणि तेच ते’ ही विंदाची कविता निदान साहित्य संमेलनापुरती खोटी ठरविली, तर विंदा जिथे असतील, तिथे खूशच होतील!
(लेखिका लोकमतमध्ये फिचर एडिटर आहेत)