- किरण अग्रवाल
ढग दाटून येतात पण पावसाचा पत्ता नाही, अशा मोठ्या विचित्र परिस्थितीतून आपण जात आहोत. त्यामुळे खरिपाचा हंगाम कसा पार पडायचा हा तर प्रश्न आहेच, पण तहान भागविण्याचीही चिंता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे.
निसर्ग बी काऊन सतावून राह्यला कोण जाणे.. जुलैचा पहिला हप्ताही गेला तरी सार्वत्रिक पाऊस नाही. पावसाच्या आशेने केलेली पेरणी वाया जाण्याची भीती असून, दुबार पेरणीची वेळ ओढवते की काय अशी चिन्हे आहेत. अलीकडे निसर्गाचा हा लहरीपणा बळीराजाची धडधड वाढवणाराच ठरू लागला असून, पीकविमा कंपन्याही तोंडाला पानेच पुसत असल्याने कुणाच्या तोंडाकडे पहावे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे अंदाज वर्तविले गेले होते, मात्र नेहमीच्या अनुभवाप्रमाणे ते फोल ठरले. बळीराजा पेरणी करून बसला आहे, पण अपवाद वगळता सार्वत्रिक पाऊस नाही. म्हणायला ढग दाटून येतात. कधी कधी रिमझिम पावसाला सुरुवात होतेही, पण हवा तसा पाऊस होत नाही. संपूर्ण राज्यातच ही स्थिती असून अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कसे व्हायचे उद्याचे, या चिंतेचेच ढग मनामनात दाटून आले आहेत.
यंदा मृगाचाही पाऊस झाला नाही त्यामुळे अल्पकालिक पीकपेरणी पुरेशी झाली नाही. मूग व उडीद पिकाला त्याचा फटका बसला. या पिकांच्या ८५ टक्के क्षेत्रात सोयाबीन व कपाशी लागवड केली गेली आहे; पण पावसाअभावी ही पिकेही धोक्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन असताना पावणेतीन लाख हेक्टरवरच पेरणी झाल्याची आकडेवारी आहे. म्हणजे ४० टक्के क्षेत्र अजूनही नापेर राहिलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरचे नियोजन असताना तब्बल सात लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र पाऊस सरासरीच्याही पार गेला आहे, तेथे जून महिन्यात अपेक्षित सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला आहे.
पावसाअभावी धरणांमधील जलसाठाही घटला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या काटेपूर्णा धरणात १४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णामध्ये मृत जलसाठाच उपलब्ध आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होत असून, सध्या जे पाणी येत आहे ते गढूळ असल्याने आरोग्याच्याही तक्रारी उद्भवत आहेत. पाऊस जर आणखी लांबला तर टँकरच्या मागण्या सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचा वापर जपून होणे गरजेचे असताना शहरी भागात पाण्याची उधळपट्टी थांबताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे.
महत्त्वाचे म्हणजे, एकीकडे निसर्गाच्या बेभरवसेपणाचा फटका बसत असताना दुसरीकडे व्यवस्थेकडून होणारी नागवणीही जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. यावर्षी प्रारंभी जी अतिवृष्टी झाली व त्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यावेळी उतरविण्यात आलेल्या पीक विम्याचे अवघे ७० ते २०० रुपये नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम म्हणजे बळीराजाची थट्टाच म्हणायचे ! खासगी विमा कंपन्यांची ही मनमानी रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचेच एकूण चित्र आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोल्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पोर्टलवर वेळेत तक्रारी करूनही पंचनामे न होणे व अतिशय तुटपुंजी रक्कम मिळणे या कारणामुळेच हे पीकविमा उतरविण्याकडे शेतकरी पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे.
सारांशात, पाऊस लांबल्याने व तो सार्वत्रिक नसल्याने मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनांसोबतच पिण्याच्या पाणीपुरवठ्यावरही होण्याची भीती आहे. अर्थात निसर्ग आपल्या हाती नसल्याने प्रार्थने पलीकडे तूर्त तरी इलाज दिसत नाही, ती प्रार्थना सारे मिळून करूया...