नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती. मात्र आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपण तशी कारवाई करणार नाही अशी समंजस भूमिका घेतली आहे. त्याचवेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या लोकांना आपल्या राज्यात आश्रय देण्याची तयारी दर्शविली आहे. साऱ्या जगात आज निर्वासितांची समस्या मोठी आहे आणि त्यांची अतिशय हृदयद्रावक चित्रे आपण दूरचित्रवाहिन्यांवर पाहिलीही आहेत. ज्यांना मायभूमी नाही वा जे मायभूमीत परतू शकत नाहीत त्यांना आश्रय देणे याविषयी कायदे व नियम नसले तरी तशी संस्कृती जगात आहे. माणूस वा मनुष्य जात ही साºयांत सनातन बाब आहे. धर्मांचे आयुष्य तीन ते चार हजार वर्षांचे आणि देशांना तर जेमतेम पाचशे वर्षाहून मोठे आयुष्य नाही. जगातले दीडशेवर देश तर गेल्या शंभर वर्षात जन्माला आले. यातल्या कुणी कुणाला विरोध करायचा आणि कुणी कुणाला अडवायचे हा प्रश्न त्याचमुळे माणुसकी व संस्कृती यांच्याशी जुळला आहे. महत्त्व माणसांना, भूमीला की धर्मांना? दुर्दैवाने आजच्या काळाचे व त्यातील माणसांचे याविषयीचे निकष बदलले आहे. माणसाहून धर्म आणि त्याहूनही भूमी हे त्यांच्या पहिल्या क्रमांकाचे विषय झाले आहेत. भारतातील किती जणांना काश्मिरी जनतेविषयीचे प्रेम आहे आणि किती जणांना ती भूमीच तेवढी हवी आहे? रोहिंग्यांचा देश म्यानमार. ते मूळचे आदिवासी. कधीतरी इतिहासात ते मुसलमान झाले. पण म्यानमारच्या बौद्धांना ते चालत नाहीत. त्या देशाच्या सैनिकांनी जंगलातील श्वापदे मारावी तशी या रोहिंग्यांची शिकार केली. सिरिया, इराण, इराक आणि मध्य आशियातील मुसलमान निर्वासितांना निर्वासित कुणी केले? त्यांच्या धर्मातल्या कडव्या संघटनांनी. या संघटनांच्या लोकांना आपल्या धर्माच्या लोकांचे जीव घेणे, त्यांना निर्वासित करणे, त्यांच्यातील अल्पवयीन मुलींना भोगदासी बनविणे यात धार्मिक वा सामाजिकदृष्ट्या काही गैर वाटत नाही. भारतात नागरिकत्वाचे कायदे घटनानिर्मितीच्या काळातच झाले. त्यात जगभरातून येणाºया हिंदूंना नागरिकत्व देण्याची बाब आहे. कारण हिंदूंना दुसरा देश नाही. तरीही पाकिस्तानात हिंदू आहेत. त्यांची पूजास्थाने आहेत. बांगला देशात, म्यानमारपासून जपानपर्यंत आणि अमेरिका, कॅनडा, इंग्लंड व आॅस्ट्रेलियातही हिंदू भारतीय आहेत. खरे तर अमेरिका हा देशच निर्वासितांनी घडविला आहे. ही स्थिती आजच्या आताच्या राज्यकर्त्यांना बरेच काही सांगू व शिकवू शकणारी आहे. रोजी-रोटीसाठी आलेले, मोलमजुरी करणारे, चहाच्या मळ्यात काम करणारे अनेक नेपाळी व बांगला देशी लोक तेथे पिढ्यान्पिढ्या राहात आहे. अज्ञानामुळे नागरिकत्व वगैरे घेण्याच्या प्रयत्नात ते राहिले नाहीत. जी माणसे वर्षानुवर्षे व पिढ्यान्पिढ्या एका जागी राहतात, त्यांना वहिवाटीनेही काही हक्क प्राप्त होतात. त्यांना कायद्याचा बडगा दाखविणे व घटनेची कलमे त्यांच्यापुढे नाचविणे यात अर्थ नाही. त्यात कायदा असेल पण संस्कृती नाही आणि मनुष्यधर्म तर नाहीच नाही. या माणसांना सोबत घेऊन व सामावून घेणे हेच भारतीयत्वही आहे. ७० वर्षांपूर्वीचे कालबाह्य कायदे दाखवून त्या अभाग्यांना ‘तुम्ही देश सोडून जा’ असे म्हणण्यात दुष्टावाही आहे. तो भारताने करू नये. कारण त्यात सांस्कृतिक भारतीयत्व असणार नाही. ‘देश ही धर्मशाळा नाही’ हे सुभाषित ऐकायला चांगले आहे. पण घर आणि देश याखेरीज माणसांची आश्रयस्थाने दुसरी असतात तरी कोणती? तरीही माणसांना त्यांचीच वडिलोपार्जित भूमी नाकारत असेल तर त्या भूमीचा उपयोग तरी कोणता? शेवटी भूमी माणसांसाठी असते. तिला निर्दय होता येत नाही. तो माणसांचा दुर्गुण आहे. जी माणसे पिढ्यान्पिढ्या आसामचे वैभव वाढवीत राहिली त्यांना कायद्याचे कलम दाखवून निर्वासित व्हायला लावणे हा प्रकार किमान आपल्या देशाने करू नये.
त्यांना राहू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:40 AM