अष्टविनायका बरोबरच इतर अनेक गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत. या लेखात आपण एकवीस गणेशमंदिरांना भेट देऊन एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊया.(१) प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक---या मंदिरातही दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. दर मंगळवारी आणि संकष्ट चतुर्थीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होत असते. के, रघुनाथजी यांनी लिहीलेल्या व इ,सन १९०० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ' 'मुंबईतील देवालये ' या ग्रंथात प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. म्हणजे हे मंदिर पावणे दोनशे वर्षाहूनही अधिक पूर्वींचे आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे. मूर्ती सुमारे अडीच फूट उंचीची असून तिला चार हात आहेत. मूर्तीच्या माथ्यावर मुकुट असून गळ्यात नागाचे जानवे आहे. श्रीगणपतीच्या बाजूना ऋद्धिसिद्धी आहेत. मंदिराबाहेर सभामंडप असून मंदीराची जागाही प्रशस्त आहे. चैत्र, भाद्रपद, मार्गशीर्ष आणि माघ महिन्यात तेथे उत्सव असतो.(२) बोरिवलीचा स्वयंभू श्रीगणेश --- बोरिवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक रस्त्यावर वजिरा गावठाण आहे. तेथे स्वयंभू गणेशाचे हे मंदिर आहे. या स्वयंभू गणेश मंदिराजवळच एक सुंदर सरोवर आहे. या मंदीराची व्यवस्था श्रीगणेश ग्रामस्थ सेवा मंडळातर्फे ठेवली जाते. या मंदिरात संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला भाविकांची मोठी गर्दी असते.(३) फडके गणपती-- इसवी सन १८६५ मध्ये अलिबाग येथील गोविंद गंगाधर फडके यांनी मुंबईत विठ्ठलभाई पटेल रस्त्यावर एक जागा घेतली आणि तेथे त्यांनी हे गणेश मंदिर बांधले. या मंदिरातील गणेशमूर्ती अतिशय सुंदर आहे. माघी चतुर्थीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.(४) गोरेगावचा संकल्पसिद्धी गणेश --- मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथे संकल्पसिद्धी गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरातील गणेशमूर्ती अतिशय सुंदर आहे. दर वर्षी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला या मंदिरात मोठा उत्सव असतो. व दुसर्या दिवशी सहस्रभोजनाचा कार्यक्रम असतो. (५) टिटवाळ्याचा महागणपती --- टिटवाळ्यापासून जवळच्या वासुदरी येथे पेशवे विश्रांती घेण्यासाठी येत असत. पाण्याच्या सोईसाठी त्यांनी तेथे एक तलाव बांधून घेतला . त्या तलावाच्या दुरुस्तीचे काम चालू असताना एक गणेशमूर्ती सापडली. पेशव्यांना रात्री दृष्टांत झाला होता. पेशव्यांनी तलावाच्या बाजूला मंदिर बांधले. ही महागणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. ती चतुर्भुज आहे. ही मूर्ती आसनस्थ आहे. अंगारकी आणि संकष्ट चतुर्थीला भाविकांची तेथे प्रचंड गर्दी होत असते.(६) अणजूर येथील श्रीसिद्धिविनायक-- ठाण्याहून भिवंडीकडे जाताना वाटेत अणजूर या गावी जाण्यासाठी रस्ता लागतो. इतिहासप्रसिद्ध गंगाजी नाईक यांच्या वाड्यातील माडीवर ही गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती आठ इंच उंचीची असून उजव्या सोंडेची आहे. गंगाजी नाईक यांनी वसईच्या लढाईत चिमाजी आप्पाना खूप साहाय्य केले होते. (७) दिगंबर श्रीसिद्धिविनायक-- कर्जत तालुक्यांतील कडाव या गावीं गणपतीची बरीच मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती यज्ञोपवितधारी आहे. ही मूर्ती फार प्राचीन असून हिची स्थापना कण्व ऋषीनी केली आहे. ही मूर्ती तीनशे वर्षांपूर्वी गावच्या पाटीलांना शेतात सापडली. (८) चिंचवडचा मंगलमूर्ती -- प्रसिद्ध गणेशभक्त मोरया यांनी चिंचवड येथे श्रीमंगलमूर्तीची स्थापना केली. मोरया गोसावी यांनी तेथेच जीवंत समाधी घेतली.चिंचवड गाव पूर्वी खूप वैभवशाली होते. येथील नाणे ' चिंचवडचा रुपया ' म्हणून प्रसिद्ध होता. पूर्वी तेथे टाकसाळ होती. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. वाड्यातील मंगलमूर्ती ही मोरया गोसावी यांना मोरगाव येथे मिळालेली प्रासादिक मूर्ती आहे. मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेपासून षष्ठीपर्यंत चार दिवस तेथे महोत्सव चालू असतो. (९) कसबा गणपती --- पुण्यामधील कसबा गणपती फार प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहे. हे शिवकालीन मंदिर आहे. पूर्वी कसबा गणपतीची मूर्ती लहान होती. परंतु सतत शेंदूर लावीत केल्याने ही मूर्ती आता मोठी झाली आहे. असे जाणकार सांगतात. (१०) सारसबाग तळ्यातील गणपती-- पुण्यामध्ये पर्वतीकडे जाताना डाव्या बाजूला पेशवे उद्यानानजीक असलेले सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती संगमरवराची असल्यामुळे अतिशय सुंदर आहे. पद्मासन घातलेली अशी हीमूर्ती आहे. (११) दशभुज गणपती--- पुण्याला पर्वती जवळच चिंतामणी नगरात दशभुज चिंतामणीचे एक मंदिर आहे. मूर्तीच्या कपाळावर ॐकार आहे. मूर्ती त्रिनेत्री आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. मूर्तीला दहा हात आहेत. मूर्तीची उंची दोन फूट असून रंग तांबूस आहे. या गणपतीला नर्मदेश्वर असेही म्हणतात. (१२) श्रीशिवाजीस्थापित गणपती--- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अंबवडे गावी छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे. अंबवडे येथे पोहोचल्यावर धूळगंगा ओढ्यावरचा झुलता पूल ओलांडून गेल्यावर शंकरची नारायण यांच्या समाधी जवळच उतरून गेल्यावर ही मूर्ती आहे. पूर्वींचे मंदिर आता नष्ट झाले असून ही मूर्ती कोनाड्यात ठेवली आहे असे सांगितले जाते.(१३) पुळ्याचा गणपती-- कोकणात समुद्र किनार्यावर गणपतीपुळे येथे स्वयंभू गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे. रत्नागिरीपासून १९ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी येथे येऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले होते.येथे संपूर्ण टेकडी गणपती मानली जाते. प्रदक्षिणा संपूर्ण टेकडी सभोवती घातली जाते.या मंदिराचा घुमट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे एक प्रधान अण्णाजी दत्तो यांनी बांधला. या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे येथे एकही भिकारी भीक मागताना दिसत नाही. तसेच अन्नछत्र दररोज सुरू असते. गणेश जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. येथील भक्तनिवासही खूप चांगला आहे.(१४) हेदवीचा लक्ष्मीगणेश -- चिपळूण जवळ हेदवी येथे पेशवेकालीन गणेशमंदिर आहे. ही मूर्ती काश्मीर येथे तयार केली असल्याचे सांगण्यात येते. दोन फूट उंचीच्या सिंहासनावर साडेतीन फूट उंचीची ही गणेशमूर्ती आहे. मूर्ती संगमरवरी पाषाणाची आहे. पेशवेकालीन कोळकर स्वामीना ही मूर्ती पेशव्यांकडून मिळाली असेही सांगण्यात येते.(१५) उफराटा गणपती-- चिपळूण तालुक्यात गुहागर येथे उफराटा गणपतीची दोन-अडीच फूट उंचीची ही मूर्ती आहे. गावातील कोळी बांधवांना ही मूर्ती सापडल्याचेही सांगण्यात येते.(१६) परशुराम गणेश-- चिपळूण जवळ परशुराम येथे उजव्या सोंडेची संगमरवरी पाषाणाची ही सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना १८७५ साली झाल्याचा उल्लेख सापडतो. (१७) कड्यावरचा गणपती-- रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावी हे गणेश मंदिर आहे. हे मंदिर एका सुंदर टेकडीवर आहे. मूर्ती काळ्या दगडी सिंहासनावर विराजमान झालेली आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. इसवी सन १८७४ मध्ये हे मंदिर बांधण्यात आले. (१८) नांदगावचा श्रीसिद्धिविनायक-- ग्रहलाघव ग्रंथाचे कर्ते गणेश दैवज्ञ हे या सिद्धिविनायकाचे भक्त होते. मुरूडजवळच सागर किनारी हे सुंदर मंदिर आहे. यामंदिरातील मूर्ती प्रसन्न आहे. हा परिसर रमणीय व शांत आहे. गणेश जयंतीच्या दिवशी येथे उत्सव असतो.(१९) कनकेश्वरचा श्रीरामसिद्धिविनायक -- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कनकेश्वर येथे हे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर अतिशय सुंदर परिसरांत हे मंदिर आहे. येथे जाण्यासाठी सुमारे साडेसातशे पायर्या चढाव्या लागतात.(२०) उरणचा श्रीसिद्धिविनायक -- पनवेल तालुक्यांतील उरण जवळ विनायक नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात सुमारे ९०० वर्षांपूर्वी हंबीरराजाच्या काळातील हे मंदिर आहे. मंदिर चिरेबंदी आहे. थोरले माधवराव पेशव्यांनी या मंदिरास भेट दिली होती.(२१) सांगलीचा गणपती -- सांगलीचा गणपती प्रसिद्ध आहे. काळ्या पाषाणाचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे.गणेशमूर्ती मोठी आहे. बाजारपेठेत रस्त्यावर उभे राहूनही मूर्तीचे दर्शन घेतां येते. या एकवीस गणपतींचे आपण दर्शन घेतले. अजूनही महाराष्ट्रात खूप गणपती मंदिरे आहेत. पुढे आपण त्याही गणपतींचे दर्शन घेऊया.म्हणूया- " गणपती बाप्पा मोरया !"
आधी वंदू तूज मोरया - जाऊ गणपतींच्या गावाला !
By दा. कृ. सोमण | Published: September 04, 2017 11:59 AM
अष्टविनायका बरोबरच इतर अनेक गणेश मंदिरे प्रसिद्ध आहेत. या लेखात आपण एकवीस गणेशमंदिरांना भेट देऊन एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊया.
ठळक मुद्दे' 'मुंबईतील देवालये ' या ग्रंथात प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहेबोरिवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक रस्त्यावर वजिरा गावठाण आहे. तेथे स्वयंभू गणेशाचे हे मंदिर आहेपुण्यामध्ये पर्वतीकडे जाताना डाव्या बाजूला पेशवे उद्यानानजीक असलेले सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक हे प्रसिद्ध देवस्थान आहेटिटवाळ्यातली महागणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. ती चतुर्भुज आहे. ही मूर्ती आसनस्थ आहे.