लालूप्रसाद यादव म्हणजे मोठा द्वाड आणि खोडकर पुढारी. मागल्या सप्ताहात मुंबई मुक्कामी असताना त्यांनी दोन प्रमाणपत्रांचं वितरण केलं. योगायोग म्हणजे त्यांना यासाठी सापडले ते दोघे ठाकरेच. एका प्रमाणपत्राद्वारे त्यांनी राज ठाकरे यांना चक्क नापासच करुन टाकलं तर उद्धव ठाकरे यांना मात्र प्रशस्तीपूर्ण प्रमाणपत्र देताना त्यांना ‘जंटलमन’ अशी उपाधीदेखील बहाल केली. राज ठाकरे मुंबईतील परप्रांतीयाना आणि त्यातही पुन्हा बिहारींना सळो की पळो करुन सोडतात म्हणून ते नापास तर उद्धव तसे काही करीत नाहीत म्हणून जंटलमन! लालंूचा खोडकरपणा दिसतो ते इथेच. खरे तर परप्रांतीयांवर दात धरुन वागायचे ही शिकवण शिवसेनेची. राज यांनी ती उधारीत मागून घेतली वा खेचून घेतली. तेव्हा शिवसेनेच्या आद्य तत्त्वप्रणालीची ईमाने इतबारे जपणूक जर कोणी करीत असेल तर राज ठाकरे, उद्धव नव्हे, हाच लालूंच्या कथनाचा मथितार्थ. आता आला का कलहाचा विषय. सैनिकांच्या मनात त्यांच्या विद्यमान पक्ष प्रमुखांविषयी जाता जाता लालू निर्माण करुन गेले की नाही किंतु? अर्थात त्याबाबत उद्धव आणि त्यांचे सैनिक काय पाहायचे ते पाहून घेतील. मुद्दा लालूंनी त्यांना बहाल केलेल्या उपाधीचा. उद्धव जंटलमन म्हणजे सोज्वळ आहेत, हे प्रशस्तीपत्र खुद्द उद्धवना कितपत मान्य होईल तेच जाणोत. तरीही लालू म्हणतात त्याप्रमाणे ते असतीलही जंटलमन. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात या ‘जेन्टलनेस’च्या जोडीनेच एक कवीमन आहे, त्याला अध्यात्माची डूब आहे आणि केवळ तितकेच नव्हे तर त्यांच्यात एक कठोर आत्मपरीक्षकदेखील दडलेला आहे याचा पत्ता लालंूना लागला नसला तरी खुद्द उद्धव यांनीच तो खुला केला आहे. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करताना त्यांनी दोन ओंडक्यांच्या भेटीच्या कोणे एकेकाळी गदिमांनी लिहून ठेवलेल्या सिद्धांताचा पुनरुच्चार करुन आपल्यातील कवीमन खुले केले. ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ’! या ओळीतील दृष्टांताला समकालीन बनविताना त्यांनी हे दोन ओंडके म्हणजे भाजपा आणि शिवसेना असल्याचे सूचित केले. तीनेक दशकांपूर्वी हे दोन ओंडके परस्पराना भेटले आणि आता विभक्त होण्याची त्या दोहोंना आस लागल्याचे दिसून येते आहे. मुळात गदिमांच्या या ओळी ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ या गीतरामायणातील एका गीतात समाविष्ट आहेत आणि त्यात अध्यात्म दडलेले आहे. स्वाभाविकच उद्धव यांनी गदिमांच्या ओळींचा आधार घेताना त्यांच्यातल कवीमनाचा आणि त्यास असलेल्या अध्यात्माच्या बैठकीचा प्रत्यय आणून दिला आहे. पण बोलण्याच्या भरात त्यांनी त्यांच्यातल कठोर आत्मपरीक्षकाचा जो साक्षात्कार घडविला तो अधिक महत्वाचा. ते म्हणाले लाटेत ओंडकेही तरंगतात! त्याला संदर्भ लोकसभेच्या निवडणुकीचा. त्या निवडणुकीत मोदींची लाट आली होती (अर्थात तशी लाट आली होती हे साऱ्यांना नंतर कळले जसे आजकाल पाऊस सुरु झाल्यावर वेधशाळेला तो सुरु झाल्याचे कळते तसे) आणि त्या लाटेत अनेक ओंडके तरुन गेले. तरुन गेलेल्या ओंडक्यांमध्ये शिवसेनेचे अठरा ओंडकेदेखील समाविष्ट होते याची जाहीर वाच्यता करता येणे हा कठोर आत्मपरीक्षणाचाच आविष्कार मानायचा. स्वत: शिवसेना प्रमुख तसे रोखठोक, आडपडदा नाही की अलंकारिक भाषा नाही. जो काही होता तो रोकडा व्यवहार. अफझल गुरुला फासावर लटकवायचा शब्द द्या आणि आमची मते घेऊन जा, मग ‘कमळाबाई’ची भूमिका काही असो, असा रोकडा शब्द त्यांनी प्रतिभा पाटील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवीत होत्या तेव्हां दिला. प्रत्यक्षात तसे तेव्हां झाले नाही उलट पाटील बाईंनी घाऊक पद्धतीने अनेकांची फाशी रद्द केली हे वेगळेच. साहजिकच युती हवी पण त्यासाठी लाचारी पत्करणार नाही असली गुळमुळीत आणि ताकाला जाऊन गाडगे लपविण्यासारखी भाषा सेनाप्रमुखांनी कधीच केली नाही. पण तेही साहजिकच म्हणायचे. पिढी बदलली आणि त्याहून महत्वाचे म्हणजे काळ बदलला. त्याच्याच जोडीने पारडेदेखील फिरले. तेव्हां भाजपा ज्या पारड्यात होती त्या पारड्यात आज सेना आहे. युतीच्या आधीच्या राजवटीत जे सेना करीत होती, तेच आज भाजपा करते आहे. वरकरणी दोन्ही पक्ष कित्येक दिवसांपासून स्वबळाची भाषा करीत आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कायम राखण्यासाठी आणि अधूनमधून ते उंचावण्यासाठी असे म्हणत राहावेच लागते असे त्या दोहोंचे नेते प्रत्यही सांगतही असतात. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील ‘लव्ह-हेट रिलेशन’सारखेच यांचेही नाते. याचा अर्थ युती असो की आघाडी त्यांच्यातील अस्थायी स्वरुपाचे सख्य सोय जाणे तो सोयरा याच धर्तीचे. धर्मान्ध शक्तींना सत्तेपासून दूर राखण्यासाठी आमची आघाडी असे त्यांनी म्हणायचे आणि हिन्दुत्वासाठी आम्ही एकत्र असे युतीकरांनी म्हणायचे. त्यामुळे दोहोंच्या अशा जाहीर वक्तव्यांना मतदार आता गांभीर्याने घेत नाही हे जोवर त्यांच्या लक्षात येत नाही तोवर हे चालायचेच. तेव्हां मुद्दा इतकाच की लाट प्रहार करते तेव्हां दोन ओंडक्यांची युती भंग पावते हे जितके खरे तितकेच हेही खरे की पुन्हा एखादी लाट येते तेव्हां हेच ओंडके पुन्हा एकत्रदेखील येऊ शकतात.
एक लाट तोडी दोघा...!
By admin | Published: June 21, 2016 1:58 AM