- किरण अग्रवाल
आगामी निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. आपले सरकार निवडून देण्यासाठी आपणास संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे, त्यासाठी मतदार याद्यांचे पुनरिक्षण सुरू असून, जबाबदार नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने मतदार नोंदणी होणे अपेक्षित.
आचार विचारांचे स्वातंत्र्य देणाऱ्या प्रजासत्ताक देशाचे आपण नागरिक असलो आणि त्याचा अभिमानही असला तरी, या सत्तेची निपोकता व सुदृढता जपण्यासाठी जी कर्तव्ये बजावणे अपेक्षित असते ती आपल्याकडून बजावली जातात का, असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फारसे समाधानकारक आढळून येत नाही. तेव्हा, येणारा निवडणुकांचा काळ लक्षात घेता याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणे गरजेचे ठरावे.
दोनच दिवसांपूर्वी भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रात: झेंडावंदन करून देशभक्तीपर वातावरणात आपण न्हाऊन निघालो. या प्रजासत्ताकासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या आठवणींना व कार्याला यानिमित्ताने उजाळाही दिला गेला, पण हे सारे करताना या प्रजासत्ताकाच्या प्रजेतील एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जी कर्तव्ये आहेत त्याची जाण व भान आपणास आहे का, असा प्रश्न करता यावा अशीच एकूण स्थिती आहे. दुसऱ्या व्यक्ती अगर यंत्रणेकडून अपेक्षा बाळगताना स्वतःच्या जबाबदारीबद्दल फारसा विचार केला जाताना आढळत नाही, म्हणूनच प्रजासत्ताकाचे महत्त्व जाणून ते जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरकार व यंत्रणा आपल्यासाठी काम करीत आहेच, पण त्यांच्याही मर्यादा असतात. साधा स्वच्छतेसारखा मुद्दा घ्या, त्यात नागरिकांनीच स्वतःची जबाबदारी ओळखून अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यायला हवी; पण त्याबाबतचे भान बाळगले जात नाही. याच स्तंभात गेल्यावेळी त्यासंबंधीचा ऊहापोह करून झाला आहे. पर्यावरण रक्षणाच्याही बाबतीत तोच अनुभव येतो. शहरे प्रदूषित होत आहेत. आज पिण्याच्या पाण्यासाठी प्युरिफाइड पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, तशी उद्या श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरण्याची वेळ येऊन ठेपली आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही; अशी एकूण स्थिती आहे. तेव्हा वायू, जल व ध्वनी अशा सर्वच पातळींवरील प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. हेल्मेट घालून वाहन चालविणे किंवा सीट बेल्ट लावणे हा आपल्याच सुरक्षिततेचा भाग आहे, पण त्यासाठी पोलिसांना सक्तीची मोहीम हाती घ्यावी लागत असेल ते योग्य ठरू नये.
आता निवडणुका येऊ घातल्या आहेत. एकापाठोपाठ एक लोकसभा, विधानसभा व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुकांसाठी मतदानाचा सर्वांत मोठा हक्क संविधानाने, प्रजासत्ताक व्यवस्थेने आपल्याला दिला आहे. लोकशाही सशक्त करण्यासाठी त्याचा वापर होणे गरजेचे आहे. त्याकरिता यंत्रणांकडून मतदान जागृती अभियान राबविले जात आहे. शाळा शाळा व गावागावांमधून मोहीम सुरू आहे. या हक्काचे मोल आपण जाणायला हवे. घसरणारी मतदानाची टक्केवारी यापुढे तरी वाढायला हवी.
महत्त्वाचे म्हणजे यंदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांची मोठी संख्या वाढली आहे. अकोला जिल्ह्यात ती गेल्या तीन महिन्यात सुमारे १६ हजारपेक्षा अधिकने वाढली आहे. वाशिम व बुलढाण्यातही अशी वाढ नोंदविली गेली आहे. मतदार यादीत नाव नोंदणीची अजूनही संधी असल्याने यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचतील याची वाट न पाहता तरुणाईने स्वतः होऊन मतदार नोंदणी करून घ्यायला हवी. मतदानानंतर बोटाला लागणारी शाई ही केवळ कर्तव्याची खूण नसते, तर ती अभिमानाने मिरवण्याची बाब असते. प्रजासत्ताकाच्या बळकटीसाठी उंचावलेले ते बोट वा पाऊल असते.
सारांशात, आपल्या नागरिकत्वाची कर्तव्ये लक्षात घेता सर्वच बाबीसाठी शासन किंवा यंत्रणांवर अवलंबून न राहता व्यक्तिगत उपयोगितेच्या बाबींसाठी तरी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला जाणे अपेक्षित आहे, यात मतदार नोंदणीसाठीही तरुण वर्गाने स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे.