- किरण अग्रवाल
धुवाधार पावसाने घडवलेले नुकसान व पशूंवरील लम्पीच्या आजाराने आलेले धास्तावलेपण दूर सारून बळीराजा हिमतीने उभा राहिला असून, कोणतीही संकटे आपल्याला नाउमेद करू शकत नाहीत, असा संदेश त्यातून मिळून गेला आहे. आता याच सोबतीने समाजातील वंचित घटकांसाठी संवेदनांनी माणुसकीचा दीप लावण्याची गरज आहे.
संकटे व अडीअडचणींमुळे निराशा व हतबलता येते हे खरेच, परंतु सकारात्मक इच्छाशक्ती असली की त्यावर मात करणेही सहज शक्य बनते. यंदाच्या दिवाळीत बाजारात उसळलेली गर्दी व ग्राहकांचा उत्साह याच सकारात्मकतेचा सांगावा देत आहे.
निसर्ग आता बेकाबू होत चालला आहे म्हणायचे. यंदा मुसळधार व संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुराने बळीराजाला रडवलं आणि शेतातील पीक सडवलं. आपल्याकडे वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक दीड लाखापेक्षा अधिक शेतकरी नुकसानग्रस्त असून, अकोल्यात एक लाख 20 हजारावर, तर बुलडाणा जिल्ह्यात 12 हजारांवर शेतकरी नुकसानग्रस्तांच्या यादीत आहेत. आपल्या भागात कापूस व सोयाबीनचे अधिक पीक होते. त्यालाच या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. निसर्गाची ही अवकृपा कमी म्हणून की काय, गेल्या वेळी कोरोनाने छळले होते, तर यंदा लम्पी आजाराने पशुधन धोक्यात आले आहे; पण या संकटातून सावरत बळीराजा मोठ्या हिमतीने उभा राहिलेला दिसत आहे. त्यांची ही हिंमतच उमेदीचा प्रकाश पेरणारी आहे.
बळीराजाच्या या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनातर्फे जमा करण्यात येत आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान लक्षात घेता येऊ घातलेल्या रब्बीतील बियाणांसाठी राज्याचा कृषी विभाग अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावणार आहे. त्यासाठी महाबीजची यंत्रणा तयारीस लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे शासकीय योजनांच्या बाबतीत बेभरवशाची स्थिती व चर्चा लक्षात घेता आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रहावर आधारित करून त्यांची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये 75 हजार तरुणांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. राज्यातील भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफीही घोषित झाली आहे. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत दिवाळी किट देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे, हे किट कालपर्यंत उपलब्ध झाले नव्हती म्हणून ओरड होती; परंतु आता त्या किटचेही समारंभपूर्वक वितरण सुरू झाले आहे.
बाजारातही चैतन्याची स्थिती असून, साऱ्याच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहताना दिसत आहे. बाजारातील ही गर्दी समाज जीवनातील आनंद, उत्साह अधोरेखित करणारीच म्हणता यावी. ऋण काढून सण साजरे करणारे आपण आहोत, पण तसे असले तरी त्यासाठीही सकारात्मक मानसिकता असावी लागते. नैसर्गिक व आरोग्यविषयक संकटांना तोंड देऊन पुढे जात असताना ही सकारात्मकताच आयुष्यात सुखासमाधानाचा प्रकाश उजळणार आहे, म्हणून तिचे वेगळे महत्त्व आहे.
अंधार वाटांवर उजेड पेरणाऱ्या या बाबी दिवाळी अधिक प्रकाशमान करणाऱ्या आहेत; पण याचसोबत व्यवस्थांखेरीज व्यक्ती म्हणूनही प्रत्येकाने क्षमतेनुसार आपापली भूमिका निभावणे अपेक्षित आहे. समाजातील एक वर्ग असाही आहे ज्याला दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत आहे. आदिवासी वाड्यापाड्यांवरील अनेक लहानगी बालकं थंडीत उघडीनागडी कुडकुडत असतात. त्यांना पुरेसे दोन घास मिळण्याची मारामार असल्याने ते कुपोषित ठरत आहेत, दिवाळीची मिठाई त्यांच्या नशिबी कुठून येणार? तेव्हा अशा वर्गासाठी संवेदनांनी माणुसकीचे दीप आपण उजळूया. समाजातील विविध संस्था व व्यक्ती त्यासाठी पुढे येऊन कोणी रद्दी विकून तर कोणी घरातील वापरलेले कपडे जमा करून त्यांच्यापर्यंत दिवाळीचा आनंद साकारण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, अशा संस्था व व्यक्तीसोबत आपलाही मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा दीप लावूया...