(मना रे)
- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर
जीवनात येणाऱ्या अडीअडचणीतून माणसाची सहज सुटका होतेच असे नाही. अशावेळी आपण त्रासलेले असतो. अन्यायाने बेजार झालेले असतो. बळीचा बकरा झालेले असतो असे अनेकांना वाटते. अशा स्वत:बद्दलच्या बिचारेपणाच्या पिंजऱ्यात आपल्याला सुरक्षित वाटते. या दुनियेत आपला ‘नाहक बळी’ गेला आहे हा विचार नाही म्हटले तरी थोडासा सुखदायक वाटतो. कारण हे अगाध विश्व आपल्या विरोधात गेले आहे म्हणून आपण असे दु:खीकष्टी झाले आहोत ही भावना आपल्या सहज पचनी पडते. आपल्या दु:खी जीवनाचे खापर आपल्यावर न फोडता आपण ते दुसऱ्यावर फोडू शकतो ही भावना त्यातल्या त्यात समाधान देणारी आहे. पण सत्य परिस्थिती गंभीरपणे पाहिली तर जग तसे आपल्या छोट्यामोठ्या वा बऱ्यावाईट संकटांबद्दल विचार करण्यासाठी बांधील तर नाहीच. इतर लोकांना यावर विचार करण्यासाठी इतका वेळ कुठे आहे. प्रत्येक जण आपल्याच कडूगोड अनुभवांमध्ये इतके गुंतलेले असतात की दुसऱ्याचे बरेवाईट कुणाच्या लक्षात येईल असेही नाही. प्रत्येक जण स्वत:तच गुंतलेला, भरकटलेला, वाट चुकलेला. एकूण काय प्रत्येकाची अशी स्वत:ची सुखदु:खाच्या झमेल्यात अडकलेली कहाणी असते. दुसऱ्याची दर्दीली कहाणी मग कोण कशाला चघळत बसेल. आपल्या आयुष्यातील भावनांच्या पलीकडे या जगात दुसरे काही असूच शकत नाही या भ्रमात राहणारे तसेच अनाकलनीय दु:खात राहतात. कारण आपल्या भावना, प्रचंड विश्वातील असंख्य लोेकांच्या भावनिक अनुभवाचा एक नगण्य हिस्सा आहे. आपण मात्र उर बडवित फिरतो. डोके फोडत असतो की आपलेच दु:ख किती अमर्याद आहे.तसे पाहता अनेक प्रसंगी आपल्याकडे एक अमूल्य संधी असते. या विविध दुर्दैवी व दुर्भागी प्रसंगांतून, इतर माणसांच्या दृष्ट कृतींतून स्वत:ला वाचवायचे की त्यात वाहत जाऊन स्वत:लाही दु:खात बुडवायचे. या दुर्भावनेच्या व्यापातून मुक्त होऊन आपण सुख शोधायचे की पीडा देणाऱ्या लोकांच्या हातात आपल्याला आणखी दु:खीकष्टी करण्याची पॉवर द्यायची? किंबहुना या पोरखेळात रमायची सवय झाल्याने त्यातच माणसांना राहायला आवडते. तीच अप्रिय माणसे, तेच वाईटसाईट प्रसंग, तेच दुर्दैव. आपण त्यातून बाहेर पडू इच्छितच नाही. सुख-सुख म्हणून आयुष्यभर ओरडतो; पण आयुष्याच्या नतद्रष्ट चक्रातून बाहेर पडायचा साधा प्रयत्न करायलाही आपण घाबरतो. अशा या विरोधाभासात आपण का राहतो? कारण या सगळ्या घटना जरी नकारात्मक असल्या व सुखापासून वंचित ठेवणाऱ्या असल्या तरी आपल्याला त्यांची सवय आहे. या दुर्दैवी जीवनाचा आपल्याला अनुभव आहे. अंगवळणी पडलेले हे मार्ग कठीण असले तरी आपण ते स्वीकारतो. मात्र आशादायी असल्या तरी नवीन वाटा आपल्याला पटत नाहीत. नावीन्यात असलेली असुरक्षित भावना आपल्या पचनी पडत नाही. नवीन विचारांची दमदार बैठक मनात बसविण्यासाठी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ ही तात्त्विकता गरजेची आहे. सुरुवातीला थोडे अस्वस्थ वाटेल. कारण जुन्या सवयी मोडून नवीन सवयी अंगवळणी लावायच्या म्हणजे थोडी गैरसोय सोसावीच लागते. समाजसुधारणेतसुद्धा समाजसुधारकांची नवीन विचारशैली, जुन्या विचारांची कात टाकूनच प्रभावीपणे पुढे येते. एखादी मनात अडकणारी किंवा मनाला अडकविणारी गाठ सुटत नसेल तर ती तशीच सोडून आपण पुढे सरकलेले बरे. ही संकल्पना घशाखाली उतरली तरच समोरचा मैत्रीपथ दिसेल. अतृप्त, असमाधानी आणि विटलेल्या दुनियेत माणूस का जगतो? आजचा वर्तमान जीवनाला गुदमरून टाकतो तो भविष्यात मोकळा श्वास घेऊ देईल याची खात्री नसते. या असहाय वर्तमानाचे भविष्यसुद्धा निराशाजनक असणार हा बोध मनाला स्पर्शून गेलेला असतोच. तेव्हा भविष्यकाळ सुंदर बनविण्यासाठी नव्याने आयुष्याची जडणघडण किती अमूल्य आहे हे वेळीच ज्याला समजते त्याचेच भविष्य सुकर बनते. या जुन्या गोष्टी तिथेच त्या वळणावर सोडाव्यात. ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ या सुंदर रोमँटिक ओेळींची ‘हम दोनो’ची दोनो ही फिलॉसॉफी आपल्या रोजच्या आयुष्यातला गंभीर अनुभव. आपल्याबरोबर घडणारे विविध प्रसंग, अनेक घटना आणि अनेक व्यक्ती आपल्या आनंदी जगण्याच्या प्रक्रियेत अनेक अथडळे आणतात. त्यांना मागे विसरून पुढच्या आयुष्याकडे पुन्हा नव्याने पाहावे. ‘आपल्याकडून आता काहीच होणार नाही’ असे समजून नांगी टाकण्यापेक्षा एखादा नवनूतन मार्ग स्वीकारत आयुष्य पुन्हा एकदा नव्या उमेदीने जगण्याची संधी देणारी माणसेच खऱ्या अर्थाने भरभरून जगतात. त्यासाठी जे हातातून सुटते आहे व सोडून देण्यासारखे आहे ते जाऊ दे!!बदल घडवताना : वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अगदी छोटेखानी बदल घडवायचे असतील तर आत्तापर्यंत अनोळखी असलेली नवी विचारसरणी मनी रुजवावी लागते. नव्या कोषात शिरण्यासाठी लागणारे धाडस सामान्य व्यक्तीकडे नसते. ‘जुने जाऊ दे’ हे खरे तर आपले जुने कपडे टाकून देऊन नव्या कपड्यांचा स्वीकार करण्याइतके सरळसाधे गणित असू शकते. तर कधी स्वत:ची जगण्याची शैलीच पूर्ण बदलून टाकण्याइतके गुंतागुंतीचेही असू शकते. हे बदल करताना भीती वाटते की या बदलातून भविष्य जर सकारात्मक नसले तर आगीतून फुफाट्यात तर आपण पडणार नाही ना?