- दुर्गेश जयवंत परूळकरआपल्या राष्ट्रीय जीवनातला गेल्या तीन दिवसांचा कालखंड हा सर्वसामान्य जनतेला वेदना देऊन गेला. आपल्या देशातल्या दोन समाजांत अथवा दोन विचार प्रवाहांत निर्माण होणा-या दुहीने राष्ट्राची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होईल, याचा विचार आज सर्वांनीच करायची वेळ आली आहे. आपल्याला लोकशाहीचे वरदान मिळाले आहे. आपल्या मताचा, आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्या स्वातंत्र्याचा अयोग्य उपयोग केला, तर देशातली शांतता, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय संपत्ती धोक्यात येते. याचा अनुभव आपल्याला नवीन नाही. घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तसेच निवडणूक लढविण्याचाही अधिकार आहेच. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून, वैध मार्गाने आपण आपल्याला हवे असलेल्या लोकांना निवडून त्यांच्या हाती सत्ता देऊ शकतो. त्यासाठी समाजात दुही निर्माण करण्याची आवश्यकता नाही. दुही निर्माण करून आपण देशात विविध प्रकारच्या नवीन समस्या निर्माण करतो. लोकशाहीला पोषक असे वातावरण या मार्गाने निर्माण होणार नाही.शाळेत असताना सर्वांना पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर असलेली प्रतिज्ञा आठवत असेल. त्यात लिहिले आहे - सारे भारतीय माझे बांधव आहेत. गेल्या तीन दिवसांत आपल्यातला हा भ्रातृभाव दिसला नाही, याचे वाईट वाटते. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, असेही त्या प्रतिज्ञेत आहे. आज विविधतेकडे आपण विषमता म्हणून का पाहात आहोत? या प्रश्नाचे आपण काय उत्तर देणार आहोत! याचा विचार करण्याची वेळ आली आहे.आज आपल्या देशाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी आपसात भांडून वातावरण कलुषित करणे हे राष्ट्रीय पाप आहे, असे आपल्याला वाटत नाही का? आज प्रत्येक व्यक्तीने शांतपणे बसून याचा विचार करायला पाहिजे. आपल्या देशातल्या दिवंगत नेत्यांची, संतांची, राष्ट्रपुरुषांची आपण जातीनिहाय वाटणी करत आहोत, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. समाजातली जातीव्यवस्था ज्यांनी मोडित काढली, त्यांनाच आपण त्यांच्या त्यांच्या जातीत विभागले आहे. हे सूज्ञपणाचे लक्षण आहे का? एवढा विद्वेष आपल्यात निर्माण होणे, हे राष्ट्राचा विचार करता हानिकारक आहे. हे दुहीचे वातावरण देशाच्या शत्रूसाठी अनुकूल ठरू शकते. देशात विविध मार्गाने घुसखोरी वाढत आहे. त्यात देशाच्या शत्रूंची संख्या अधिक आहे. अशा अराजकसदृश्य वातावरणाचा अपलाभ शत्रू घेतल्यावाचून राहणार नाही. याचे भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे. सर्वात वाईट वाटते ते या गोष्टीचे, ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ज्या पवित्र पुण्यनगरीत केला, तिथे अशी लांछनास्पद घटना घडावी, हेच दुर्दैव आहे. या घटनेमुळे शिवरायांना किती यातना झाल्या असतील, याचा आपण विचार करणार आहोत का?मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे, याची मला जाणीव आहे. मी कोणी मोठा नेता नाही. मी कोणी विचारवंत नाही. तरीही मी माझ्या सर्व देशबांधवांना नम्र विनंती करतो की, त्यांनी आपला राग आवरावा. आपल्या देशात पुन्हा असे दुही निर्माण करणारे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊ या. केवळ राष्ट्रहिताचा विचार करून आपल्या देशाची प्रगती साधू या.दुसºयांना म्हणजे आपल्याच बांधवांना नष्ट करून आपले सामर्थ्य सिद्ध करण्याचा आत्मघातकी विचार सोडून देऊ या. कारण असे करण्यातच राष्ट्रहित आहे.
(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक आहेत.)