- प्रशांत दीक्षित- राहूल गांधी यांनी हिंदू व्यक्तिमत्वाला आपलेसे केले हा चिंतेचा विषय नाही. काळजी याची आहे की कोणत्या प्रकारचे हिंदू व्यक्तिमत्व वा परंपरा राहूल गांधी आपल्याशा करणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस नेत्यांनी आपल्याशा केलेल्या हिंदू संस्कृतीकडे राहूल काँग्रेसला परत नेणार आहेत की मुस्लीम धर्माला प्रत्युत्तर म्हणून प्रतिगामी कर्मकांडाचा आग्रह धरणाऱ्या हिंदू प्रचाराकडे राहूल हे वळणार आहेत हा मुख्य प्रश्न आहे. -----------------------------------राहूल गांधींच्या मंदिर भेटी, त्यांनी उघडपणे जाहीर केलेले ब्राह्मणत्व आणि त्या ब्राह्मणत्वच्या सिद्धतेसाठी नुकताच दिलेला दत्तात्रेय गोत्राचा दाखला याची राजकीय भाष्यकारांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे.सुहास पळशीकर, शेखर गुप्ता, रामचंद्र गुहा, योगेंद्र यादव, दिलीप मंडल यांनी यावर बरेच भाष्य केले आहे. त्यामध्ये राजकीय भाष्य आहे. तसेच सांस्कृतिक भाष्यही आहे.राहूल उघडपणे घेतलेल्या हिंदू ओळखीने हे भाष्यकार गोंधळात पडले. राहूल गांधींच्या धर्मावतावर भाष्य करणाऱ्यांमध्ये पुरोगामी, प्रगतीशील, डाव्या विचारांकडे झुकलेल्या भाष्यकारांची संख्या अधिक आहे. धर्म, धार्मिक श्रध्दा याबद्दल तिटकारा असणाऱ्या भाष्यकारांना राहूल गांधींच्या मंदिर भेटी हा सांस्कृतिक अध:पात वाटतो. भारताचे जे चित्र या बुद्धीमंतांच्या समोर होते किंवा ज्या दिशेने भारत जावा असे या बुद्धीमंतांना वाटत होते, त्याच्या विरुद्ध दिशेला भारत जात असल्याची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मोदींच्या विजयानंतर उभी ठाकली. त्याला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब हे भाष्यकार करत असतानाच अचानक काँग्रेस पक्षाने सौम्य हिंदुत्वाचा पर्याय स्वीकारला. बुद्धीमंतांना हा पहिला धक्का होता. त्यानंतर गेले काही महिने काँग्रेसचा हिंदु रंग गडद होऊ लागला. मध्य प्रदेश निवडणुकीच्या जाहीरनाम्यात गोशालेपासून गोमुत्रापर्यंत आणि पुढे अध्यात्मिक मंत्रालयापर्यंत काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदू आयडेंटीटीमुळे या भाष्यकारांची झोप उडाली आहे. भारताचे जे वैचारिक, नैतिक वा राजकीय चित्र (आयडिया आॅफ इंडिया) या मंडळींनी मनात धरले होते त्याला तडा देणार्या या घटना असल्याने हे वर्तुळ अस्वस्थ होणे साहजिक आहे.काँग्रेसचे हिंदूकरण हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धोका आहे असेया भाष्यकारांना वाटते. काँग्रेसच्या या हिंदूकरणामुळे देशात बहुसंख्यांकवाद वाढेल आणि त्याचे पर्यवसान तालीबानी व्यवस्थेत होण्याचा धोका या मंडळींना वाटतो. तालीबानी व्यवस्था असा शब्द कोणी वापरलेला नसला तरी त्या सर्वांच्या लेखनातील अध्याहृत धोका तोच आहे.आधुनिक भारताची जी चौकट पंडित नेहरूंनी घालून दिली ती विस्कटून टाकण्याची धडपड संघ परिवाराने केली. त्याचा प्रतिकार पुरोगामीगटांकडून सुरू असतानाच काँग्रेसचेवागणे-बोलणेही संघाच्या भाषेत सुरू झाले. राहूल गांधी हे नेहरूंपासून दुरावले आहेत व हे चांगले लक्षण नाही, असे रामचंद्र गुहा यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.देशातील बहुसंख्यांकांच्या एका समाजगटाशी (कम्युनिटी) उघडपणे जोडून घेण्याच्या राहूल गांधींच्य धोरणामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मूल्याचे काय होईल अशी चिंता सुहास पळशीकर यांनी व्यक्त केली आहे. या भाष्यकारांनी लक्षात आणून दिलेले धोके नाकारण्यासारखे नाहीत. बहुसंख्यांकवाद हा हुकूमशाहीच्या दिशेने कधी जाईल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर वाढती धार्मिक अस्मिता ही व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध आणते,व्यक्तिविकासाला बाधक ठरते हेही खरे आहे. व्यक्तिस्वातंत्र संपले की सर्जनशीलता खुंटते. नवे विचार, नव्या कल्पना पुढे येत नाहीत. बंदिस्त विचारसरणीतून मजबूत संघटन बांधता आले तरी त्यामध्ये प्रतिभेला वाव नसल्याने समस्यांवर अभिनव तोडगा निघू शकत नाही. सध्या मोदींच्या कारभारात हीच अडचण आहे. सरकार मजबूत आहे, नेतृत्व लोकप्रिय आहे. पण देशासमोरील आर्थिक समस्यांवर तोडगा काढू शकणार्या प्रतिभावान व्यक्तींना हे नेतृत्व जवळ करीत नााही. परिणामी समस्या उग्र होत असताना हेडमास्तरी रीतीने त्यावर उपाय सुरू आहेत. प्रतिभावान व्यक्तींना आकर्षित करण्याची ताकद नेहरूंकडे होती, हे नेहरूंवर टीका करणार्या संघ नेत्यांनी लक्षात घ्यावे.तथापि, काँग्रेसने हिंदू चेहरा घेतल्याने याच आपत्ती येतील असे मानण्याचे कारण नाही. राहूल गांधी यांनी हिंदू व्यक्तिमत्वाला आपलेसे केले हा चिंतेचा विषय नाही. काळजी केले हा चिंतेचा विषय नाही. काळजी याची आहे की कोणत्या प्रकारचे हिंदू व्यक्तिमत्व वा परंपरा राहूल गांधी आपल्याशा करणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसनेत्यांनी आपल्याशा केलेल्या हिंदू संस्कृतीकडे राहूल गांधी काँग्रेसला परत नेणार आहेत की मुस्लीम धर्माला प्रत्युत्तर म्हणून प्रतिगामी आचारधर्माचा आग्रह धरणार्या हिंदू दृष्टीकोनाकडे राहूल गांधी वळणार आहेत हा मुख्य प्रश्न आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला धार्मिक अधिष्ठान होते. सर्व महत्वाच्या व लोकप्रिय नेत्यांची गीतेवर श्रद्धा होती. स्वातंत्र्य चळवळीतील जहाल राष्ट्रवादी चळवळ वा चळवळ या दोन्हींचा पाया घालणार्या नेत्यांची हिंदू संस्कृतीवर खोल श्रध्दा होती. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या राजकीय विचारांकडे पाहिले तर त्यावर धर्मश्रध्देचा प्रभाव दिसेल.मात्र ही धर्मश्रद्धा कडवी नव्हती. त्याला जसे सतानती तत्वज्ञानाचे अधिष्ठान होते तसेच काळानुरूप धर्मश्रद्धेत बदल झाले पाहिजेत ही जाणीवही होती.प्रतिगामी नेते अशी लोकमान्य टिळकांची प्रतिमा उभी करण्यात आली आहे.सामाजिक चळवळींना त्यांनी केलेला विरोध याला कारणीभूत आहे. तथापि, लोकमान्यांनी गीतारहस्यात प्रतिपादन केलेले हिंदू तत्वज्ञान पाहिले तर ते अत्यंत प्रगतीशील असल्याचे आढळून येईल. मात्र सामाजिक पातळीवर त्यांनीया प्रगतीशील विचारांना प्राधान्य दिले नाही व ही मोठी चूक झाली.(याबाबतचे एक वेगळे विश्लेषण लक्ष्मणशास्त्री जोशी व मे पुं रेगे यांच्या एका संभाषणात मिळते. पण तो आत्ताचा विषय नाही) महात्मा गांधींचा गीतेवर अनन्य विश्वास होता. पुढे विनोबांनी तर गीतेवर चालू काळाला अनुरुप असे अप्रतिम भाष्य केले, इतकेच नव्हे तर गीताईच्या रुपाने गीता मराठीत आणून मराठी भाषेला वेगळे वैभव दिले. गोरक्षणापासून अणुयुगापर्यंतच्या अनेक विषयांवर विनोबांनी केलेले भाष्य पाहिले तर धार्मिक तत्वांनाही आधुनिक रुप कसे देता येते हे कळून येईल. याबाबत विनोबांची प्रतिभा असीम होती. त्या काळातील सर्व मोठ्या नेत्यांचा उल्लेख येथे करता येत नाही. पण हे सर्व नेते धार्मिक अधिष्ठान कायम ठेऊन देशाला प्रगतीशील विचारांकडे घेऊन जात होते. परंपरागत धार्मिक श्रद्धांना छेद न देता किंबहुना परंपरागत श्रद्धांना वेगळे रुप देऊन नव्या युगासाठी समाजमनाची तयारी करण्याची धडपड या नेत्यांची होती. यामुळेच आचारधर्माला म्हणजे कडव्या कर्मकांडाला या नेत्यांनी कधीही आपलेसे केले नाही.गणेशोत्सवाकडे टिळक समाजबांधणीचा प्रयोग म्हणून पाहात होते. धार्मिक उन्मादाचे हत्यारम्हणून नव्हे, हे त्यावेळच्या त्यांच्या अनेक भाषणांतून दिसून येते. प्लेग हा दारिद्र्याचा रोग आहे असे भाषण लोकमान्यांनी ओेंकारेश्वरवरील सभेत केले होते. ते भाषण इंग्रजांच्या दप्तरात आहे. गुरुयेऊर येथील मंदिरात हरिजन प्रवेशासाठी धार्मिक अंगाने काय करता येईल यासाठी महात्मा गांधींनी केलेले प्रयत्न पाहिले तर धर्माचा आधार घेऊनही प्रगत विचार कसा करता येतो हे पाहता येईल. डी जी तेंडुलकरांच्या गांधी चरित्रात याचा तपशील दिलेला आहे. क्रांतीकारी चळवळीतील अरविंद व सेनापती बापट यांची चरित्रे पाहिली तरी शुद्ध हिंदू धर्मविचारांचा, कर्मकांडाचा नव्हे, प्रभाव स्पष्ट दिसतो. अन्य कोणत्याही धर्मांपेक्षा हिंदू धर्मामध्ये परिवर्तनशील तत्वांची प्रेरणा अधिक आहे व व्यक्तिस्वातंत्र्याला अधिक वाव आहे ही जाणीव या नेत्यांना होती. हिंदू समूहमनाच्या मर्यादा या नेत्यांच्या लक्षात आल्या होत्या. त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता पटली होती. पण ते बदल हिंदू श्रद्धांना बरोबर घेऊन करण्याची धडपड होती. या धडपडीला यशही मिळत होते. स्वातंत्र्यानंतर यात बदल होऊ लागला. समाजात रुजलेल्या शुद्धधर्मविचारांचा आधार घेऊन समाज बदलण्याऐवजी पाश्चात्य मूल्यांचा आधार अधिक घेतला जाऊ लागला. ही मूल्ये समाजावर लादण्याची धडपड सुरू झाली. अलिकडे याचा अतिरेक इतका झाला की हिंदू असणे किंवा हिंदू परंपरा वा तत्वज्ञान याबद्दल बरे बोलणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे काय असे वाटू लागले. याची हिंदू समाजमनामध्ये प्रतिक्रिया उठत होती. त्याचा फायदा संघ परिवाराने घेतला. संघाने हिंदू तत्वज्ञानाची आत्मीयतेने चिकित्सा करून त्याचा आधार घेण्याऐवजी हिंदू संस्कृतीत बोकाळलेल्या कालबाह्य आचारविचारांच आधार घेऊन संघटनाबांधणी सुरू केली. असे करणे अधिक सोपे होते. काँग्रेसच्या बहारीच्या काळात बाजूला फेकल्या गेलेल्या व तुच्छतेची शिकार बनलेल्या संघ परिवाराला सामर्थ्य मिळविण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता होती. प्रतिगामी हिंदू आचारविचारांना आपलेसे केल्यामुळे ती मिळू लागली. हिंदू परंपरेतील ज्ञाननिष्ठ मार्गाला संघाने कधीच आपलेसे केलेले नाही हे लक्षात घ्यावे.हिंदू समाजाला आपलेसे करण्यासाठी राहूल गांधी संघाच्या मार्गाने जाणार की हिंदू परंपरेतील उच्च तत्वांचा आधार घेऊन समाज परिवर्तनासाठी त्या तत्वांचे सहाय्य घेण्याचा मार्ग स्वीकारणार हा कळीचा प्रश्न आहे. हिंदू तत्वज्ञानाबद्दल आस्था, त्याची चिकित्सा, त्यातून चुकीच्या गोष्टी बाजूला टाकून नव्या क्षमतांचा सातत्याने शोध आणि यातून समाजाशी संवाद ही स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसची वाटचाल होती. यातूनच काँग्रेसला अफाट क्षमता लाभली. सध्याच्या परिस्थितीत हा मार्ग खडतर वाटत असला तरी खर्या हिंदू विचारांशी निष्ठा ठेवणारा आहे. मात्र केवळ मते मिळविण्याकरता राहूल गांधी कर्मकाडांच्या दुसर्या मार्गाने गेले तर वर उल्लेख केलेल्या भाष्यकारांना वाटणारी भीती खरी ठरण्याची शक्यता आहे. हिंदू परंपरेतील कर्मकांडाला फाटा देऊन ज्ञाननिष्ठ भागाला उजाळा देण्यास राहूल गांधी यांनी अग्रक्रम दिला तर भारताचे चित्र भागाला उजाळा देण्यास राहूल गांधी यांनी अग्रक्रम दिला तर भारताचे चित्र बदलेल. केवळ आंधळी टीका न करता या कामासाठी राहूल गांधींना या भाष्यकारांनीही मदत केली पाहिजे.
राहूल गांधींचा गोत्र दाखला आणि राजकीय तर्क- वितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:22 PM