श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली असे आपण म्हणतो ना, त्याच भीतीच्या सावटाखाली सध्या जगभरातील मनोरंजन इंडस्ट्री आहे. हा सगळा उद्योग सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या संकटांच्या चिंतेत आहे. ओपन एआयने फेब्रुवारीच्या मध्यात ‘सोरा’ हे वापरकर्त्यांनी दिलेल्या वर्णनाबरहुकूम खरेखुरे वाटावेत असे व्हिडीओ बनविणारे मॉडेल आणले. हा आविष्कार खरेच अद्भुत, आश्चर्यकारक व अफलातून आहे. जग अचंबित आहे. त्याचप्रमाणे मोठमोठे स्टुडिओ, महागडे कॅमेरे, तसेच व्हीएफएक्ससारख्या तंत्रज्ञानातून कष्टाने तयार होणारे व्हिडीओ असे क्षणात तयार व्हायला लागले तर आपले काय होणार, ही भीती कलाकारांमध्ये आहे. एआय मॉडेल्सचा मारा जिथून सुरू झालाय त्या अमेरिकेतील अब्जावधी डॉलर्सच्या उलाढालीचे हॉलिवूड नखशिखान्त हादरले आहे. टायलर पेरी यांनी त्यांच्या अटलांटा स्टुडिओच्या विस्ताराची तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्सची योजना बाजूला ठेवली. जणू डोलारा कोसळू लागला आहे. एआयमुळे केवळ यंत्रसामग्री व स्टुडिओ मोडीत निघतील असे नाही. सिनेमाचे कथानक चित्रीकरणापर्यंत घेऊन जाणारे शेकडो लोक कित्येक हजार तास खपून जे काम करतात ते एआय अवघ्या आठ-दहा सेकंदांत करील. पटकथा लेखक बेरोजगार होतील. मुख्य व एक्स्ट्रा अशा कोणत्याच कलाकारांची भविष्यात गरज राहणार नाही. महत्त्वाचे म्हणजे फोन, लॅपटॉप व घरातल्या टीव्हीचे कॅमेरे तुम्हाला सतत टिपत राहतील, तुमच्या आवडीनिवडींची सविस्तर नोंद घेतली जाईल आणि त्यानुसार अगदी नजीकच्या भविष्यात एआयद्वारे तयार केलेले मनोरंजन तुमच्या ताटात वाढले जाईल. अगदी ‘रेडी टू इट’ जेवणासारखे रेडिमेड मनोरंजन !‘सोरा’ हा खरोखर एआय चमत्कार आहे. चॅटजीपीटी हे ‘टेक्स्ट टू टेक्स्ट एआय मॉडेल.’ त्यानंतरचे डॅल-ई हे ‘टेक्स्ट टू इमेज मॉडेल’, तर सोरा हे ‘टेक्स्ट टू व्हिडीओ मॉडेल.’ हा सगळा प्रवास अवघ्या दीड वर्षातला. २०२२ च्या उत्तरार्धात चॅटजीपीटी आल्यानंतर अनेकांना वाटले की सारे काही बदलायला किमान काही वर्षे लागतील. प्रत्यक्षात काही महिन्यांतच बदल झाला. त्यातच ओपनएआय व गुगलमध्ये स्पर्धा लागलीय. ‘पिका’ व ‘रनवे’ या एआय मॉडेलनंतर गुगलनेही ‘व्हिडीओपोएट’ नावाचे असेच वर्णनानुसार व्हिडीओ तयार करणारे मॉडेल आणले आहे. या महिन्याअखेर ते विस्ताराने जगापुढे येईल. जगभरातील मनोरंजन इंडस्ट्रीपुढील एआयचे आव्हान भयावह आहे. या उद्योगाने मूकपट ते बाेलपट, त्यानंतर स्टुडिओंची उभारणी व मोडकळीस येण्याचे टप्पे तसेच टीव्हीचे आक्रमण, नंतर ओटीटी, गेमिंग वगैरे आव्हाने याआधी पेलली आहेत. परंतु, ते सारे टप्पे मनुष्यबळ, माणसांचे कौशल्य सामावून घेणारे होते. एआयसारखे मानवी कल्पना किंवा गुणवत्ता मोडीत काढणारे नव्हते. शिवाय, एआयमुळे या व्यवसायाचे लोकशाहीकरण होणार आहे. तसेही रील्सच्या माध्यमातून सामान्य लोक या व्यवसायात उतरले आहेतच. सोरा किंवा व्हिडीओपोएटमुळे नजीकच्या भविष्यात तो व्यवसाय महान वगैरे म्हणविल्या जाणाऱ्यांच्या हातातून निघून जाईल. मोठी उलथापालथ होईल. अशीच उलथापालथ वीसेक वर्षांपूर्वी एमपी-३ व इतर स्वस्त सॉफ्टवेअरमुळे संगीत क्षेत्रात झाली. रेकॉर्डिंगचे मोठमोठे स्टुडिओ बंद पडले. बाथरूममध्ये गुणगुणायची गाणी रसिकच गाऊन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करू लागले. अशी सामान्यांनी गायिलेली पंचवीस हजार ते एक लाख गाणी सध्या स्पॉटिफायवर चोवीस तासांत अपलोड होतात. याबाबतीत हॉलिवूड चिंतेत असले तरी आपल्या बॉलिवूडला एआयची दारावरची टकटक ऐकू येत नाही. सिनेसृष्टीची साखरझोप सुरू आहे. रश्मिका मंदाना किंवा आलिया भट यांचे डीपफेक व्हिडीओ, आपले नाव व ‘झक्कास’ शैली किंवा आवाज वगैरेचा गैरवापर होऊ नये म्हणून अनिल कपूरची न्यायालयात धाव वगैरे बातम्या आणि झालेच तर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकीर्दीला गेल्या दि. १७ फेब्रुवारीला ५५ वर्षे पूर्ण झाली म्हणून एआयचा वापर करून इन्स्टाग्रामवर टाकलेले छायाचित्र यातच आपण खुश आहोत. शाहरुख खानच्या ‘जवान’ व ‘पठाण’ या हिट सिनेमातील काही व्हिज्युअल इफेक्टसाठी एआयचा वापर, आयुष्मान खुराणा याने ‘अगोडा’च्या जाहिरातीसाठी वापरलेली हॅट, हा या खुशीचा थोडा विस्तार म्हणता येईल. प्रत्यक्ष चित्रपटात एआयचा छोटासा का होईना पण पहिला खरा वापर लेखक, दिग्दर्शक गुहान सेनियाप्पन यांनी ‘वेपन’ या तमिळ सिनेमात केला आहे. हा सिनेमा वर्षअखेरीस पडद्यावर येईल आणि त्यात एआयचा वापर केलेले एक अडीच मिनिटांचे पूर्ण दृश्य प्रेक्षकांना दिसेल. यावर कुणी असे म्हणेल की, आपला सिनेमा म्हणजे सगळा भावनांचा, नात्यांमधील गुंतागुंतीचा खेळ आहे. कॉम्प्युटर कितीही स्मार्ट झाला तरी हे त्याला हा खेळ थोडीच जमणार आहे? अर्थात, हा भ्रम आहे. सोरा-एआयने अवघ्या तीन आठवड्यांत हॉलिवूडमध्ये जो धुमाकूळ घातलाय, तो पाहिला तर हे अद्ययावत तंत्रज्ञान त्सुनामी बनून पूर्ण ताकदीने भारतात येईल तेव्हा आपली लाडकी सिनेइंडस्ट्री पालापाचोळा होऊन उडून जाईल. या दृष्टीने एक ताजे उदाहरण लक्ष्यवेधी आहे. १९८३चा ‘मासूम’ हा शेखर कपूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आणि त्यात नसरुद्दीन शहाच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाला स्वत:च्या कुटुंबात सामावून घेताना शबाना आझमीची झालेली घालमेल आठवते का? शेखरला त्याचा सिक्वल आणायचाय आणि एआयचे चमत्कार ऐकल्यानंतर त्याने ठरविले आहे, की त्यातील भावनिक गुंतागुंत, कोंडमारा, घुसमट सारे काही चॅटजीपीटीच्या माध्यमातून पडद्यावर साकारायचे. शेखरने हे ठरविले तेव्हा सोरा यायचे होते. बस्स. यातच सारे काही आले.shrimant.mane@lokmat.com