लाइव्ह परफॉर्मन्स.. अभिनेत्रीनं गमावला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:34 AM2023-11-28T09:34:56+5:302023-11-28T09:35:35+5:30

War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील ताज्या युद्धानं आणि त्याच्या हृदयद्रावक बातम्यांनी जग हादरलं असताना, त्याआधी सुमारे २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या रशियन-युक्रेन युद्धाची दाहकता जगासाठी जणू कमी झाली आहे.

Live performance.. Actress lost her life! | लाइव्ह परफॉर्मन्स.. अभिनेत्रीनं गमावला जीव!

लाइव्ह परफॉर्मन्स.. अभिनेत्रीनं गमावला जीव!

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील ताज्या युद्धानं आणि त्याच्या हृदयद्रावक बातम्यांनी जग हादरलं असताना, त्याआधी सुमारे २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या रशियन-युक्रेन युद्धाची दाहकता जगासाठी जणू कमी झाली आहे. युद्धाचे अत्यंत भीषण परिणाम जगाला सोसावे लागत असले तरी आता त्यासह जगण्याशिवाय कोणापुढेच पर्याय राहिलेला नाही. काही तासांत आम्ही हे युद्ध संपवू, अशी वल्गना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केली होती. पण हे युद्ध आता त्यांनाही अतिशय जड जात असून दोन वर्षे होत आली तरीही युक्रेन त्यांच्या नाकावर टिच्चून त्यांना जशास तसं उत्तर देत आहे. या युद्धांत दोन्ही बाजूची निरपराध माणसं मात्र हकनाक मारली जात आहेत. 

हे युद्ध आता संपवा आणि आम्हाला जगू द्या, अशी मागणी दोन्ही देशांच्या नागरिकांकडून अगदी पहिल्या दिवसापासून होत असली तरी अलीकडच्या काळात युद्ध थांबण्याची कोणतीही शक्यता नाही. या युद्धाला प्रामुख्यानं रशियालाच जबाबदार धरलं जात असलं तरी पुतीन मात्र काहीही झालं तरी मागे हटायला तयार नाहीत. या युद्धात रशियाचंही अतोनात नुकसान झालं आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. युद्धाचं मानसिक ओझंही लोकांना पेलवेनासं झालं आहे.

त्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं तर रशिया जाऊ द्या, संपूर्ण जगच हादरलं आहे आणि लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. डोनेत्स्क प्रांतातील कुमाचोव हे एक गाव. हा परिसर आधी युक्रेनच्या ताब्यात होता, पण युद्ध सुरू झाल्यानंतर रशियानं त्यावर कब्जा मिळवला आणि आता तो रशियन सैनिकांच्या ताब्यात आहे.

रशियाच्या मिसाईल आणि आर्टिलरी फोर्सच्या ॲन्युअल डे निमित्त तिथे एक कार्यक्रम सुरू होता. खास सैनिकांसाठीच हा कार्यक्रम असल्यानं अनेक रशियन सैनिकांची त्याला उपस्थिती होती. कार्यक्रम ऐन रंगात आला होता. रशियाची प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना पोलिना मेन्शिख कार्यक्रम सादर करीत होती. तिच्या प्रत्येक अदागणिक सैनिक टाळ्यांचा कडकडाट करीत होते. एकीकडे ती गिटार वाजवत होती आणि दुसरीकडे गाणं गात होती. सारे जण खुर्चीला खिळून बसले होते. अचानक दरवाजे, खिडक्या हादरल्या, मोठा आवाज झाला आणि स्टेजवर काळोख पसरला! पण हा काळोख फक्त स्टेजवर नव्हता, तर रशियाचे रंगकर्मी, कलाप्रेमी यांच्याही आयुष्यात पसरला होता.. पोलिना मृत्यूमुखी पडली होती!

काय झालं होतं असं? का तिचा अकाली मृत्यू झाला? - कारण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होता आणि शेकडो सैनिक हा कार्यक्रम पाहत होते, नेमक्या त्याच ठिकाणी युक्रेननं हवाई हल्ला केला! हल्ल्यापूर्वीची दृश्यं एका मोबाइलवर कैदही झाली आहेत. पोलिना गिटार वाजवते आहे, सैनिक तल्लिनतेनं ऐकताहेत आणि धाडकन आवाज होऊन सगळीकडे अंधकार पसरतो, आरोळ्या, किंकाळ्यांनी आसमंत दणाणून जातो..
युक्रेननं केलेल्या या हवाई हल्ल्यात केवळ पोलिनाच नाही, तर रशियाच्या काही सैनिकांचाही मृत्यू झाला. शंभराच्यावर सैनिक जखमी झाले. त्यातले अनेक जण अजूनही जन्म-मृत्यूच्या हिंदोळ्यावर झुलताहेत.. 

या हल्ल्याचा अनेकांना धक्का बसला, पण लोकांचं हृदय जास्त हळहळलं ते पोलिनासाठी! लाइव्ह परफॉर्मन्स सुरू असताना इतक्या मोठ्या कलावंतांचा दुर्दैवी अंत व्हावा याचं अनेकांना अतीव दु:ख झालं. अनेकांनी आपलं हे दु:ख सोशल मीडियावर व्यक्त करताना, आता तरी आपला हडेलहप्पीपणा सोडा आणि युद्ध थांबवा, असं आवाहन पुतीन यांना केलं आहे. त्यात अर्थातच त्यांच्याच देशाच्या लोकांचा आणि कलावंतांचाही वाटा फार मोठा आहे. पोलिना एक नृत्यांगना होती, नाटककार होती, दिग्दर्शक होती, रशियाच्या कला क्षेत्रात तिला मोठा मान होता.. पण एका माणसाच्या मग्रुरीमुळे पोलिनासारख्या अनेकांना आयुष्यातून उठावं लागतं आहे.

रशियानं याबाबत चुप्पी साधताना कानावर हात ठेवले असले तरी युक्रेननं म्हटलं आहे, रशियानं आमच्यावर काही दिवसांपूर्वी जो डरपोक हल्ला केला होता, त्याचा बदला आम्ही घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एका समारंभात रशियानं हल्ला केला होता, त्यात अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले होते.

कधीपर्यंत हे चालणार?
युद्धात निरपराध आणि सर्वसामान्य माणसांचा जीव जाऊ नये असे संकेत आहेत, पण इथे साऱ्याच गोष्टी पायदळी तुडवल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या म्हणण्यानुसार युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनचे दहा हजार सैनिक मारले गेले आहेत. रशियाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. युक्रेननंही रशियाच्या अनेक सैनिकांवर हल्ला करून तोडीस तोड उत्तर दिलं आहे. मात्र हे कधीपर्यंत चालणार? - त्याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही!

Web Title: Live performance.. Actress lost her life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.