तुम्ही दहा वर्षांपूर्वी कर्ज घेतलं घरासाठी, ४० लाख रुपये. हप्ता बसला साधारण ४०,००० हजार रुपये. दोघं कमावते, तुमचे पगार वाढले याकाळात. आता तुम्हाला दोघांना मिळून ४०,००० रुपये हप्ता काही फार नाही असं वाटतं आहे. १० हजाराने हप्ता वाढवून घ्यावा की त्या दहा हजारांची एसआयपी करावी प्रश्न तुम्हाला पडला आहे. म्हणजे मुख्य प्रश्न हाच की, हप्ता वाढवू का म्हणजे लोन लवकर फिटेल?
या प्रश्नाचं उत्तर दोन अधिक दोन चार असं नाही देता येत, त्यासाठी तुमचा स्वभाव, मनोवृत्तीही लक्षात घ्यायला हवी.तर हा निर्णय घेताना कशाकशाचा विचार कराल?१) कर्ज म्हणजे ओझं असं तुम्हाला वाटतं का? कर्ज डोक्यावर असलं तर झोप येत नाही, नको ते ओझं, कधी एकदा कर्ज फेडू असं होतं का? तसं असेल तर मग तुम्ही स्वत:ला विचारा की या कर्जातून मुक्ती मिळाली तर तुम्हाला जास्त चांगलं वाटेल की, जे १० हजार तुमच्या हाताशी आहेत ते एसआयपी केले, वाढीस लागले, पंधरा वर्षांत ते भरपूर वाढले पैसे तर ते जास्त सुख देईल? यात चूक - बरोबर असं काही नाही. तुमची मनोवृत्ती कशी आहे यावर हा निर्णय होईल.
२) मुख्य म्हणजे त्याही पलीकडे हप्ता वाढवण्याचा निर्णय घेताना याचा विचार करा की आपल्याला जी आताची आमदनी आहे ती अजून किती वर्षे टिकेल, कमी होईल? आपलं वय काय? हे उत्पन्न किती वर्षे मिळेल, निवृत्तीसाठी किती वर्षे उरली आहेत. निवृत्तीला पाचच वर्षे बाकी असतील तर कर्ज फेडून टाकणं उत्तम. भरपूर वर्षे असतील, उत्पन्न वाढतच राहण्याची शक्यता असेल तर कर्जफेडीची घाई कशाला, त्यापेक्षा गुंतवणूक वाढवा.
३) घराला डिप्रिसिएशन असतं, कर्जफेड प्रक्रियेला नाही हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या पैशाचा वापर समजुतीने करा.
४) सध्या इतिहासात कधी नव्हे ते कर्ज स्वस्त आहे, कर्ज घेऊन त्याचा आपल्या वाढीसाठी स्मार्टली उपयोग करणं, त्यादृष्टीने विचार करणं ही अजून एक शिकून घेण्यासारखी गोष्ट आहे. कर्ज हप्ता वाढवताना याचाही विचार करा.
५) पॉवर ऑफ कम्पाउंडिंग हे आपण शाळकरी वयात शिकलेलो असतो. त्यामुळे दरमहा १० हजार जर आपण नीट सुरक्षित गुंतवले तर त्यातून पंधरा वर्षांनी काय लाभ होईल याचा विचार करा.
- हे सारे मुद्दे लक्षात घेऊन मग ठरवा की हप्ता वाढवणं योग्य की आहे तेच ठीक आहे!!