- अनिल देशमुखचीनमधल्या वुहान शहरातून उद्रेक झालेला ‘कोविड-१९’ विषाणू एव्हाना जगातल्या दोनशेहून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अभूतपूर्व अशी परिस्थिती या एका विषाणूने जगभर निर्माण केली. व्यापार, उद्योग, शेती, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य... एकही क्षेत्र असं नाही जे या विषाणूमुळे संकटात सापडलेलं नाही. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानं जग बदललं असं म्हटलं जातं. परंतु, या दोन्ही महायुद्धांमध्येही जे घडलं नाही ते या विषाणूनं करून दाखविलं.
महाराष्ट्रात आपण २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला. अगदी न्यूझीलंडसारख्या तुलनेने अत्यंत छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या देशानेही महिनाभराचा लॉकडाऊन घोषित केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परिसीमा असलेल्या मुक्त वातावरणात जन्मलेल्या २००० नंतरच्या ‘न्यू मिलेनियम जनरेशन’च्या दृष्टीनं हा लॉकडाऊन म्हणजे फार मोठी शिक्षा होतीच, शिवाय माझ्यासारख्या किंवा अगदी तिशी-चाळिशीतल्या पिढीसाठीही लॉकडाऊनचा निर्णय अमलात आणणं ही फार सोपी बाब नव्हती. राज्य सरकारसाठी ही नवी गोष्ट आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गृहमंत्री या नात्याने त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर होती. माझे सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी जिवाची बाजी लावून त्याला सामोरे गेले. दिवस असो की रात्र, उन्हाळा असो की पावसाळा, डोळ्यांत तेल घालून सतत रस्त्यावर उभं राहणं माझ्या पोलीस दलाला नवीन नाही. तरीही ‘जिवाची बाजी’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. कारण, यावेळची लढाई डोळ्याला न दिसणाºया विषाणूशी होती. हा विषाणू कधी, कुठून कोणत्या माध्यमातून तुमच्यावर हल्ला करेल हे सांगता येत नाही. तरीही त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्याचं पोलीस दल गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून रस्त्यावर आहे. जगभराचे संशोधक कोरोना विषाणूचा खात्मा करणाºया लसीच्या शोधात गुंतले आहेत. या संशोधकांना यश लाभेपर्यंत गृहखात्याला रस्त्यावरची लढाई चालूच ठेवावी लागणार आहे.
लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना स्वाभाविकपणे लोकांच्या नाराजीचा पहिला सामना करावा लागतो तो रस्त्यावरच्या पोलिसांना. लॉकडाऊनचं गांभीर्य सुरुवातीच्या टप्प्यात लोकांना लक्षात येत नसल्यानं मलाही प्रारंभी कठोर भूमिका घ्यावी लागली. ‘काठीला तेल लावून पोलिसांनी तयार राहावं,’ हे म्हणण्यामागे माझा उद्देश इतकाच होता की, लोकांनी या महामारीचं गांभीर्य लक्षात घेऊन घरी थांबावं. कुटुंबप्रमुखाप्रमाणे मी कठोर झालो. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, लॉकडाऊन ही पोलिसांनी किंवा सरकारने लादलेली अडवणूक नव्हे. ‘कोविड-१९’विरुद्धच्या लढ्यातलं हे महत्त्वाचं हत्यार आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून जगातल्या अनेक साथरोग नियंत्रण तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे की, लॉकडाऊन कशासाठी हवा? लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होते.
लोक घरात राहिल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून प्रशासनाला आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारण्यास अवसर मिळतो. मार्चमध्ये जेव्हा पहिला रुग्ण महाराष्ट्रात सापडला तेव्हा आपल्याकडे पुरेसे मास्कसुद्धा नव्हते. व्हेंटिलेटर, रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा, पुरेशा संख्येने डॉक्टर, नर्स या सर्वांचा तुटवडा होता. परंतु, सरकारने या दिशेने तातडीने पावले उचलली. आता परिस्थिती दिलासादायक आहे. कमतरता नाहीत असा दावा मी करणार नाही. परंतु, प्रश्न नेमका काय आहे आणि त्याचे उत्तर काय हे सरकारला अचूक समजले असून, त्या दिशेने वेगाने प्रगती होते आहे.
एक वस्तुस्थिती लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे जग कोविडमुक्त होईपर्यंत लॉकडाऊनसारख्या उपायांचा आधार घ्यावा लागेल. हा पूर्ण इलाज नाही याची जाणीव सरकारलाही आहे. लॉकडाऊनच्या काळातदेखील मी सतत प्रवास करतो आहे. राज्यातल्या २८ जिल्ह्यांमधून आजपर्यंत मी जाऊन आलो. कोरोना आढावा बैठका घेतल्या. कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. प्रवासात ठिकठिकाणी थांबून रस्त्यावरच्या पोलीस अधिकारी-कर्मचाºयांशी संवाद साधतो. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करतो.
माझी पत्नीसुद्धा पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करते. या राज्यातले पोलीस, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे सगळे लोक स्वत:चा जीव धोक्यात घालून तुमच्या-माझ्यासाठी संघर्ष करीत आहेत. याच संघर्षात ८७ पोलिसांचा बळी कोरोनाने घेतला. लाखो परप्रांतीय स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याचे कर्तव्य पार पाडत असताना शेकडो पोलीस कोरोनाबाधित झाले. या असंख्य कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाºयांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. उद्योग-धंद्यांचे गाडे रुळावर येत नाही. या सर्वांची वेदना माझ्यासह संपूर्ण सरकारच्या मनात आहे. आमचे नेते शरद पवार वयाच्या ऐंशीतदेखील त्याच उमेदीने लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. पुणे, रायगड, सोलापूर, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांशी संवाद ठेवून ते सातत्याने सरकारला मार्गदर्शन करीत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: राज्यातल्या अधिकाºयांना सूचना करीत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी नऊपासून मंत्रालयात असतात. विविध मंत्र्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम ते करतात. प्रशासनाला कामाला लावतात. कोरोना योद्धा असणाºया पोलिसांसाठी ५० लाखांच्या विम्याचा निर्णय असेल, साडेबारा हजार पोलीस पदांच्या निर्मितीचा मुद्दा असेल, यासाठी अजित पवार यांनी निर्णय घेण्यास सहकार्य केले. आरोग्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री आपापल्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. या सगळ्या गोष्टी प्रत्येकवेळी मीडियासमोर येतातच असे नाही. व्यापार, उद्योग, कारखाने लवकर सुरूझाले पाहिजेत. वाहतूक पूर्ववत झाली पाहिजे. शेतमालाचा पुरवठा अखंडित राहिला पाहिजे, असा आग्रह शरद पवार आमच्याकडे धरत असतात. सरकारचे प्रयत्न त्याच दिशेने चालू आहेत.
जबाबदार मंत्री म्हणून मला महाराष्ट्राला हे सांगितले पाहिजे की, कधी कधी लांबवर झेप घ्यायची तर दोन पावले मागे सरकावे लागते. राज्याच्या विविध भागांत स्थानिक परिस्थितीनुसार लागू केला जाणारा लॉकडाऊन म्हणजे तात्पुरती माघार आहे. उद्याच्या मोठ्या झेपेसाठी मला आनंद याचा आहे की, ९५ टक्के जनता सरकारला सहकार्य करीत आहे. ‘कोविड-१९’च्या संकटाची तीव्रता या जनतेने जाणली आहे. अगदी थोडक्या लोकांमध्ये बेपर्वाई, निष्काळजीपणा आहे. त्यांना आमचे पोलीस समजावून सांगत आहेत. समंजस व्यक्तींना कायद्याचा धाक पुरा असतो.
कोरोना महामारीपूर्वीचे जग पुन्हा अनुभवयाचे असेल तर संयम आणि शिस्तीची गरज आहे. अनावश्यक नियमांचा जाच जनतेवर लादण्याची हौस सरकारला नाही. नियमांचा बडगा दाखविणारा पोलीस तुमच्याच हितासाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभा आहे, याबद्दल खात्री बाळगा. उलट जनता जेवढे सहकार्य करेल तितक्या लवकर परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल. मुद्दाम मी आकडेवारीच्या खोलात जात नाही; पण चाचण्यांची संख्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग, विलगीकरणाची व्यवस्था, आॅक्सिजनयुक्त खाटा, व्हेंटिलेटरयुक्त खाटा या सर्वांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. ज्या काही त्रुटी असतील त्यांचाही निपटारा वेगाने केला जात आहे. पोलीस, प्रशासन आणि या महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक या सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरात लवकर कोरोनापूर्व स्थितीत येऊ, याचा विश्वास मला आहे.