>> संदीप प्रधान
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार रिंगणात नाही, राज ठाकरे यांचा एकही खासदार वा आमदार नाही, राज ठाकरे हे काही राष्ट्रीय स्तरावरील नेते नाहीत, तरीही 'ए लाव रे तो व्हिडीओ' हा हॅश टॅग राज ठाकरे यांनी आपल्या नावे निर्माण केला आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पूर्वार्धात शरद पवार हे सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे प्रमुख विरोधक राहिले असतील, तर उत्तरार्धात राज ठाकरे यांनी आपणच सत्ताधाऱ्यांसमोरील प्रभावी विरोधी पक्ष असल्याचा देखावा निर्माण केला आहे. देखावा हा शब्द येथे मुद्दाम वापरला, कारण लोकसभेच्या रिंगणात राज यांच्या मनसेचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे निकालानंतर तेच प्रमुख विरोधी पक्षाचे नेते असल्यावर लागलीच शिक्कामोर्तब होणार नाही.
लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू होताच शरद पवार व राज ठाकरे यांच्या गुप्त बैठकांच्या बातम्या पसरल्या व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मनसे सामील होणार, अशी चर्चा सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की, मनसे मृतवत झाल्यामुळे सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका वटवणाऱ्या शिवसेनेच्या तंबूत घबराट पसरली. राज हे आघाडीत सामील झाले व त्यांना एक-दोन जागा लढवायला मिळाल्या, तर त्यातून त्यांचा पक्ष जिवंत होईल. अशावेळी आपण भाजपला गालीप्रदान करत राहिलो व युती झाली नाही, तर त्याचा फटका आपल्याला बसेल, या कल्पनेने शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने युती करण्याच्या दिशेने पावले टाकली. कदाचित, राज यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहिल्यावर आपण युतीची जरा अधिक घाई केली, अशी चुटपुट उद्धव यांना लागली असेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होताच शिवसेनेने विरोधी पक्षाची स्पेस सोडली. ती काबीज करण्याकरिता शरद पवार व राज ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू झाली. मोदी-फडणवीस यांनी जाहीर सभांमध्ये शरद पवार व कुटुंबीयांना लक्ष्य करून पवार यांनी ही स्पेस भरून काढावी, असा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना युतीत सामील झाल्याने निर्माण झालेली विरोधकांची स्पेस अखेरच्या टप्प्यात राज यांनी 'लाव रे तो व्हिडीओ'ची हाळी देत आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे २०१४ नंतर स्पेस गमावून बसलेल्या राज ठाकरे यांना त्यांच्या १० ते १२ जाहीर सभांमुळे स्पेस मिळाली.
मनसेने लोकसभा निवडणुकीत एक-दोन जागा लढवाव्या, अशी त्यांच्या पक्षातील काही नेत्यांची इच्छा होती. मात्र, राज यांनी त्याला नकार दिला. कारण, निकालानंतर जर मनसेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असते, तर लोकसभेच्या प्रचारात निर्माण केलेली ही स्पेस विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवणे राज यांना कठीण गेले असते. राज यांनी प्रचार केल्यामुळे ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना लाभ होईल, त्यांना विधानसभा निवडणुकीत मनसेला काही जागा सोडाव्या लागतील. किंबहुना, मनसेचा विचार आघाडी करताना करावा लागेल. मनसेच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार राज यांनी घेतलेल्या सभांनंतर मनसेच्या 'अ' श्रेणीतील ३४ जागा असून, 'ब' श्रेणीतील ३० ते ३२ च्या आसपास जागा आहेत. याच जागांकरिता ते वाटाघाटी करतील. राज यांच्या करिष्म्यावर गमावलेले जे पुन्हा थोडेफार हाती लागले आहे, ते जर टिकवायचे व वाढवायचे असेल, तर मनसेला लोकसभेचा प्रचार संपताच संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागावे लागेल. दीर्घकाळ पक्ष कोमात असल्याने अनेक ठिकाणी संघटन शिल्लक नाही. जेथे संघटन आहे, तेथे ते विस्कळीत झालेले आहे. अन्य पक्षांतील चांगले नाराज हेरून त्यांना मनसेत आणून उमेदवारीकरिता प्रबळ दावेदार शोधावे लागतील. अन्यथा, चांगले उमेदवार नसल्याचा फटका विधानसभेला बसू शकतो. मनसे हा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भात्यामधील बाण असेल. मनसेचे जे कुणी उमेदवार विजयी होतील, ते आपल्या संख्याबळाशी जोडून राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकेल. महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाकरिता एकच तगडा दावेदार नसल्याने २००४ मध्ये हाती आलेल्या मुख्यमंत्रीपदावर उदक सोडण्याची चूक सुधारण्याची संधी पवार यांना प्राप्त होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुंबईतील अखेरच्या सभेत राज ठाकरे यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टार्गेट केले, तर ते राज यांच्याच पथ्यावर पडणारे आहे. भाजप नेत्यांनी राज यांच्या आरोपांना उत्तरे देऊन राज फॅक्टर संपणार नाही, याचा चोख बंदोबस्त केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे संख्याबळ घसरले (ज्याची जास्त शक्यता आहे) आणि शिवसेना विधानसभा जागावाटपावरून पुन्हा आक्रमक होऊ लागली, तर मनसेच्या कुडीत फुंकला गेलेला प्राण भाजपकरिता एक आधार असणार आहे. मनसेचे भय घालून लोकसभेत सेनेला युती करायला भाजपने भाग पाडले, त्याच धर्तीवर पुन्हा खेळ खेळला जाईल. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या भाषणांना कुठेही ठळक प्रसिद्धी मिळत नाही. मोदींवर स्तुतिसुमने उधळणारी त्यांची भाषणे बेगडी व कृत्रिम वाटत आहेत. अगोदर भाजपला शिव्याशाप देऊन युती केल्यामुळे या दोघांनी वाहिन्या, वृत्तपत्रे यांना मुलाखती देण्याचेही टाळले आहे. त्याचवेळी राज हे केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, इंग्रजी माध्यमांना मुलाखती देऊन भाव खाऊन जात आहेत. राज यांच्या भाषणांची व प्रामुख्याने कुठल्या भाषणात कुठला व्हिडीओ दाखवायचा, याची तयारी ते गेले आठ महिने करत होते. या तयारीमुळे आज राज हे ठामपणे म्हणू शकतात की, 'ए लावला की नाही माझा व्हिडीओ'.
अर्थात, राज यांचा एक दुर्गुण त्यांच्या प्रगतीकरिता फार घातक आहे. ते इन्स्टंट गरमागरम मॅगीसारखे इन्स्टंट राजकारण करतात. त्यामुळे आता राज यांनी पुन्हा कोशात जाऊन चालणार नाही. विरोधकांची काबीज केलेली स्पेस विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.