शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुंबई, ठाण्याचं पुन्हा मोदींसाठी मतदान?, की वाढलेला टक्का काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?

By संदीप प्रधान | Published: May 02, 2019 12:17 PM

भाजप-शिवसेना युतीच्या संबंधात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्यावेळी मुंबईच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये ज्याप्रमाणे निकाल एकतर्फी लागले, तसे ते यावेळी लागणार नाहीत.विरोधकांना वाढलेले मतदान हे सरकारविरोधातील मतदान वाटत आहे.मागील वेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे, या हेतूने मुंबईकरांनी अन्य काहीही न पाहता मतदान केले होते.

>> संदीप प्रधान

चौथ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर वगैरे परिसरांतील मतदान झाले आणि महाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा खाली बसला. आता निकालाकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात, सर्वाधिक लक्ष हे मुंबई व ठाणे येथील निकालांकडे लागणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या निकालात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथील निकालांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीच्या संबंधात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्यावेळी मुंबईच कळीचा मुद्दा ठरणार आहे. मुंबईतील मतदानानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी, वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी चर्चा केली असता, काही ठळक बाबी निदर्शनास आल्या.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१४ मध्ये ज्याप्रमाणे निकाल एकतर्फी लागले, तसे ते यावेळी लागणार नाहीत. त्याचबरोबर जो कुणी उमेदवार विजयी होईल, त्याचे मताधिक्य प्रचंड मोठे असणार नाही. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील वाढलेले तीन ते चार टक्के मतदान ही नैसर्गिक वाढ असल्याचे काहींचे मत आहे, तर अर्थातच विरोधकांना वाढलेले मतदान हे सरकारविरोधातील मतदान वाटत आहे. मतदानातील वाढ नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, नवीन मतदारनोंदणी व मतदान करण्याकरिता निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था या साऱ्यांनीच प्रचंड प्रयत्न केले. त्यामुळे युवा व मुख्यत्वे प्रथम मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुण-तरुणींनी उत्साहाने मतदान केल्याने मतांचा टक्का वाढला. हा युक्तिवाद करणाऱ्यांचा दावा असा आहे की, गेल्या पाच वर्षांत तरुण व नवमतदारांच्या मनात घराणेशाही, सेक्युलॅरिझम (मुस्लिम अनुनय या दृष्टीने) याबद्दल घृणा निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे नवमतदारांनी केलेले मतदान हे पर्यायाने भाजपच्या बाजूने जाईल. अर्थात, वाढलेला टक्का ही प्रस्थापित सरकारविरुद्धची नाराजी असल्याचा दावा करणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की, मोदींनी अनेक आश्वासने दिली, लोकांच्या अपेक्षा उंचावल्या, मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. नोटाबंदीसारख्या निर्णयाचा गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांना फटका बसला. महागाईने सर्वसामान्य त्रस्त आहे. त्यामुळे वाढलेला टक्का नाराजीचा आहे.

मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. येथे विविध भाषिक, धार्मिक तसेच जातींचे लोक वास्तव्य करतात. मागील वेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे, या हेतूने मुंबईकरांनी अन्य काहीही न पाहता मतदान केले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली आहे. मुंबईतील व्यापार, उद्योगांवर वर्चस्व असणाऱ्या गुजराती समाजाने अनेक भागांत सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी रांगा लावून मतदान केले, असे अनेकजण सांगतात. मोदींना मत दिले नाही, तर त्याचा भाजपला फटका बसेल, या भावनेतून गुजराती समाजाने सकाळीच मोठ्या प्रमाणावर मते दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा जोडगोळीविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व शिवसेनेबरोबर गेल्या साडेचार वर्षांत झालेली खडाखडी यामुळे कदाचित मराठी मते ही मागील वेळी पडली तितकी यावेळी मोदींना पडणार नाहीत, त्यामुळे गुजराती मतांचे ध्रुवीकरण झाले. घाटकोपर, बोरिवली वगैरे काही भागांत गुजराती मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. सोसायट्यांमधील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय यांनीही रांगा लावून मतदान केले. शहरी मध्यमवर्गीयांच्या मनात मोदींबद्दल २०१४ मध्ये होते, तेवढे ममत्व नसले तरी मोदींना आणखी एक संधी देऊन पाहायला काय हरकत आहे, असे वाटणारा मोठा वर्ग आहे. दीर्घकाळ आघाडीची सरकारे पाहिलेला, लंगड्या सरकारमधील सत्तासंघर्ष पाहून विटलेला हाच मध्यमवर्ग सोशल मीडियावर तावातावाने चर्चा करत असतो. अनेक प्रादेशिक नेत्यांशी तो मोदींची तुलना करतो, तेव्हा त्याला मोदी अधिक जवळचे वाटतात, हे वास्तव दृष्टिआड करून चालणार नाही. त्यामुळे या सोसायटीमधील मतदारांचे मतदान नेमके भाजपला झाले आहे का? किती प्रमाणात झाले आहे? हा कळीचा मुद्दा आहे. विलेपार्ले परिसरात वाढलेला मतांचा टक्का हा याच सोसायटीतील मतदारांमधील ध्रुवीकरणाकडे अंगुलीनिर्देश करतो.

मुस्लिम, उत्तर भारतीय व गोरगरीब मतदारांनी मागील वेळी मोदींना चांगल्या प्रमाणावर मतदान केले होते. या मतदारांबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मुस्लिम समाज हा गोमांसावरून देशभरात झालेल्या हल्ल्यांमुळे व भाजपच्या धर्मांध राजकारणामुळे नाराज आहे. त्यामुळे मुस्लिमबहुल परिसरांत झालेले मतदान हे भाजपविरोधात जाणार, असा दावा अर्थातच विरोधक करत आहेत. मात्र, काही सामाजिक कार्यकर्ते असा दावा करतात की, पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असेल, तर मोदींच्या विरोधात एकगठ्ठा मतदान करण्याची चूक मुस्लिम मतदार करणार नाही. अशावेळी तो उमेदवार, त्याचे काम पाहून मतदान करील. कारण, एकगठ्ठा विरोधात मतदान केले, तर आपल्याला त्याचे परिणाम पुढील पाच वर्षे भोगावे लागू शकतात, अशी भीती मुस्लिम मतदारांच्या मनात आजही आहे. शिवाय, समाजवादी पार्टी आणि ओवेसी यांचा समावेश असलेल्या वंचित आघाडी यांचे प्रलोभन या मतदाराला आहे. सपा व वंचित आघाडीला विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळणार नाही, याची खबरदारी त्यांनी आपापल्या पॉकेटमध्ये घेतली, असे काहींचे मत आहे. उत्तर भारतीय मतदारांबाबतही असेच वेगवेगळे दावे केले जात आहेत. काहींच्या मते उत्तर भारतीय मतदार हा सुटी लागताच मोठ्या संख्येने गावी निघून गेला. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांची युती झाल्यामुळे उत्तर भारतीयांमधील यादव मते भाजपकडे वळणार नाहीत. पण, महाराष्ट्रातील दलित मतांवर मायावतींचा फारसा प्रभाव नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील दलित मतदार येथे मतदान करताना वेगळा विचार करील. २००८ मध्ये मुंबईतील उत्तर भारतीयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ले झाले होते. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. राज यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. या निवडणुकीत तेच राज, कुणालाही द्या, पण मोदींना मते देऊ नका, असे सांगत होते. राज व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील हा छुपा समझोता मुंबईतील उत्तर भारतीयांमधील २००८ मधील हल्ल्याच्या जखमेवरील खपली काढणारा ठरेल, असे काहींना वाटते. तसे झाले तर उत्तर भारतीयांचे मत हेही भाजपकडे झुकू शकते, असे काहींचे म्हणणे आहे.

भाजप-शिवसेना यांची बऱ्याच खडाखडीनंतर युती झाली. शिवसेनेच्या टीकेमुळे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मतदारांच्या मनावर घाव झाले. त्यामुळे जेथे शिवसेनेचा उमेदवार आहे, तेथे मोदींच्या विजयाकरिता किती मतदारांनी मते उत्स्फूर्तपणे टाकली, याबाबत शंका घेतली जात आहे. कदाचित भाजप, संघाची मोदींना पंतप्रधान बनवणे, ही महत्त्वाकांक्षा असल्याने हा मतदार मतदानाला उतरला असेल. मात्र, भाजपचा सत्तेचा माज व शिवसेना नेतृत्वाने कठोर टीका केल्यानंतर अचानक गायलेली मोदीकवने यामुळे शिवसेनेचा कट्टर मतदार निराश झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जेथे भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या मतदाराने तडफेने मतदान केले किंवा कसे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना पराभूत करण्याचे आवाहन करताना काँग्रेसला फायदा झाला तरी चालेल, असे मत व्यक्त केले होते. मनसेचा मतदार हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा असून मवाळ शिवसेना पसंत नसल्याने राज ठाकरे यांच्या 'खळ्ळ खट्याक'वर भाळलेला आहे. काँग्रेसला या मतदाराने कधीच स्वीकारले नव्हते व शरद पवार यांच्याबाबत तर या मतदाराच्या मनात अढी आहे. त्यामुळे जेथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, तेथे मनसेच्या मतदाराने उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदान केले किंवा कसे, याची शंका आहे. कदाचित, मनसेच्या मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडलेला असू शकतो, असे काहींना वाटते.

मतदानयंत्रात काय बंद झाले, ते २३ मे रोजी स्पष्ट होईल. त्यावेळी कुठून कुणाला मताधिक्य प्राप्त होते, यावरून कुठला फॅक्टर प्रभावी ठरला किंवा कुणाला कशाचा फटका बसला, ते कळेल. एक गोष्ट निश्चित, मुंबईतील मतदारांनी आपल्या मतदानाने लढती उत्कंठावर्धक होतील, याची पुरेपूर काळजी घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी