Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

By सुधीर महाजन | Published: March 25, 2019 07:44 PM2019-03-25T19:44:55+5:302019-03-25T19:46:44+5:30

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले आहे.

Lok Sabha Election 2019 : Sattar's politics on Aurangabad constituency is for whom? | Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

googlenewsNext

- सुधीर महाजन

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांचा झोत आपल्यावर सतत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आता २९ मार्च रोजी लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार आहेत. हे जाहीर करताना आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले. संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या दोन घडामोडींदरम्यान परवा मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे ‘ट्रबल शूटर’ सिंचनमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या गूढ भेटीची चित्रफीत प्रसारित झाली म्हणल्यापेक्षा करण्यात आली. या मध्यरात्रीच्या भेटीने काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाला. याचा आनंद सत्तारांनीसुद्धा घेतला. या भेटीत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. केवळ आभार मानण्यासाठी मध्यरात्री ‘गुजगोष्टी’ होतात हे न कळण्याइतका सामान्य माणूस दूधखुळा नाही.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दाखवत सत्तारांनी ‘कात्रजचा घाट’ नेमका कोणाला दाखवला, हे काही दिवसांत स्पष्ट होईल; पण तोपर्यंत संभ्रम निर्माण करीत राजकीय गोंधळ उडवून देण्यात तरी ते यशस्वी झाले. गेल्या वर्षभरात औरंगाबादच्या जिल्हा काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याचा आढावा घेतला तर लोकसभेसाठी त्यावेळी अब्दुल सत्तार यांनीच विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांचे नाव पुढे आणले. झांबड यांनी तयारी सुरू करताच त्यांच्या उमेदवारीची शिफारस करणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली. आपल्या वार्डात ते बुथ कमिट्या बनवू शकले नाहीत ते लोकसभा कशी लढवणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी प्रा. बनसोड हा नवखा चेहरा पुढे आणला. हे नाव पुढे बरेच दिवस चर्चेत राहिले आणि बनसोड हे सुद्धा काँग्रेसची उमेदवारी मिळणारच या आशेवर नियोजन करीत राहिले आणि झांबड यांच्याप्रमाणे त्यांचाही पत्ता सत्तारांनी कापला.

दरम्यान, उमेदवारांची चाचपणी श्रेष्ठींकडून सुरू झाली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार या चर्चेने जोर धरला. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणही लढण्याच्या तयारीत होते. पुढे ही चर्चा मागे पडली. सत्तारांनी औरंगाबाद, तर माजी आमदार कल्याण काळे यांनी जालन्यातून लढावे, असा प्रस्ताव श्रेष्ठींकडून येताच दोघांनीही नकार दिला. याचवेळी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाली. हे घडताच सत्तार यांनी पक्षाच्या राजीनाम्याची घोषणा केली. आता सत्तार यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढायची आहे. झांबड पण त्यांच्यासाठी निवडणूक न लढण्याची भाषा करतात. असे असतानाही सत्तार अपक्ष लढणार, असे सांगतात. सत्तारांचे हे दबावतंत्र आणि हूल देण्याचे राजकारण नेमके कोणासाठी आहे, हाच कळीचा प्रश्न आहे? त्याचे उत्तर येत्या चार दिवसांत मिळेल.

Web Title: Lok Sabha Election 2019 : Sattar's politics on Aurangabad constituency is for whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.