शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वरुण नको, अरुण हवेत! आजच्या राजकारणाचे चरित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 8:32 AM

Lok Sabha Election 2024 : गांधी घराण्याच्या दुसऱ्या पातीचे वारस वरुण गांधी यांचेही तिकीट पिलीभीत मतदारसंघातून भाजपने कापले.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया हळूहळू पुढे जात असताना सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊ पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पाचव्या उमेदवार यादीत काही सेलेब्रिटींना स्थान दिले आहे. सोशल मीडिया तसेच टीव्ही चॅनल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे समर्थन करणारी, बहुतेकवेळा वादग्रस्त बोलणारी अभिनेत्री कंगना रनौत व रामायण मालिकेतील ‘राम’ अरुण गोविल ही त्यापैकी ठळक नावे. कंगनाचे पणजोबा कधीकाळी आमदार होते. असा राजकीय वारसा अरुण गोविल यांना नाही. गेल्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी विशेष निमंत्रित हा दोघांमधील समान धागा. त्यांना रिंगणात उतरवताना भाजपने अश्विनीकुमार चौबे, जनरल व्ही. के. सिंग या मंत्र्यांना, ‘राज्यघटना बदलविण्यासाठी चारशे खासदार हवेत’ असे जाहीर सांगून पक्षाची अडचण करणारे अनंतकुमार हेगडे वगैरेंना उमेदवारी नाकारली.

गांधी घराण्याच्या दुसऱ्या पातीचे वारस वरुण गांधी यांचेही तिकीट पिलीभीत मतदारसंघातून भाजपने कापले. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जतीन प्रसाद हे वरुण यांच्याऐवजी उमेदवार असतील. वरुण यांच्या मातोश्री मनेका यांची सुलतानपूरमधील उमेदवारी मात्र कायम आहे. वरुण गांधी यांचे व्यक्तित्व, त्यांचा शांत स्वभाव, विचारातील नेमकेपणा यामुळे तसेही ते भाजपच्या शिस्तीत बसत नव्हतेच. त्या तुलनेत वैचारिक लढाई वगैरेच्या भानगडीत न पडता प्राणीमात्रांच्या कल्याणाकरिता वाहून घेतलेल्या मनेका गांधी पक्षाला चालतात. आताही उमेदवारी नाकारल्यामुळे वरुण गांधी संतापणार वगैरे नाहीत. वरुण गांधींना नकार आणि अरुण गोविल यांना पायघड्या हा विरोधाभास आजच्या राजकारणाचे चरित्र सांगून जाणारा आहे. स्पष्ट राजकीय चेहरा नसलेले सेलेब्रिटी मात्र या चरित्रात फिट्ट बसतात. त्यातही सारे आयुष्य पडद्यावर घालविणाऱ्या चंदेरी चेहऱ्यांची संसदेतील कामगिरी फार गौरवाने सांगण्यासारखी नाही.

लोकसभा असो की राज्यसभा, हे हिरो-हिरोईन सभागृहात बोलतच नाहीत. त्यांच्यामुळे फारतर संसदेबाहेर टीव्ही चॅनल्सच्या कॅमेऱ्यांना काम मिळते. वैचारिक भाषणांची वगैरे अपेक्षा त्यांच्यापासून ठेवायची नसते. या अकार्यक्षमतेची सुरुवात अगदी राम नाईकांना पराभूत करणाऱ्या गोविंदापासून होते आणि हा प्रवास अलीकडे दिल्ली ते मथुरेदरम्यान जनसामान्यांशी आपली नाळ किती जुळलेली आहे, हे दाखविताना कापलेल्या पिकाच्या पेंढ्या उचलणाऱ्या हेमा मालिनीपर्यंत येतो. मध्यंतरी जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेले एक संतप्त भाषण किंवा सभागृहाबाहेर शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधकांना ‘खामोश’ करताना लावलेला सूर, हे यातील काही अपवाद. बाकी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, किरण खेर वगैरे सगळ्या सेलेब्रिटींनी एकदा संसदेच्या पायरीला नमस्कार केला यापलीकडे नोंद घ्यावी, असे काही नाही. त्यातही पक्षाला मोठ्या समर्थनाची खात्री असेल तरच हे असे सेलेब्रिटींचे प्रयोग करता येतात. म्हणूनच भारतीय जनता पक्ष सगळे फिल्मी हिरो प्रामुख्याने हिंदी पट्ट्यातच उतरवतो. या टापूत दगड उभा केला तरी निवडून येईल, याची भाजपला खात्री असल्यामुळेच मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ हे लढतीत असलेले किंवा आसनसोलमधून माघार घेणारे पवनसिंग या भोजपुरी कलावंतांची नावे उमेदवारांच्या यादीत झळकतात.

ममता बॅनर्जींचा पक्ष गुजरातमधील क्रिकेटपटू युसूफ पठाणला बंगालच्या बेहरामपूरमधून उतरवताे. कंगना रनौत व अरुण गोविल हेही या वाटेवरची नवी नावे. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सध्या हिमाचलमधील मंडी येथील खासदार आहेत. काँग्रेसअंतर्गत वादामुळे त्या सध्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. म्हणून भाजपने कंगनाला तिथे उतरविले आहे. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल मीरतचे उमेदवार असतील. अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीमुळे ते चर्चेत आले. राजकारणाच्या दृष्टीने तसे ते कमनशिबी. कारण, सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया हिच्या लोकप्रियतेचा लाभ भाजपने १९९१ सालीच तिला बडोद्यातून उभे करून घेतला. चिखलिया यांच्यानंतर तेहतीस वर्षांनी गोविल यांना उमेदवारी मिळाली. योगायोगाने आणखी एक सीता भाजपच्या उमेदवार बनल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांची थोरली सून सीता सोरेन अलीकडेच भाजपवासी झाली असून, त्यांना दुमका येथे उमेदवारी देण्यात आली आहे, तर तारांकित उमेदवारांची ही अशी पाचा उत्तराची कहाणी आहे. विजयाच्या रूपाने ती साठा उत्तराची होते की नाही, हे निकालानंतरच कळेल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक