- हरीश गुप्ता(नॅशनल एडिटर, नवी दिल्ली)
लोकसभा सभागृहात बहुमतासाठी आवश्यक २७२ हा आकडा भाजपला गाठता आला नाही याचा मोदीभक्तांना धक्का बसला असेल. मात्र, संघपरिवारातील अनेकांना वाटते की, भाजप नेतृत्वालाच यासाठी जबाबदार धरले पाहिजे. संघाने प्रारंभीच्या काळात दिलेल्या सल्ल्यांकडे भाजपने दुर्लक्ष केले. ग्रामीण भागात असंतोष आहे, तिथे परिस्थिती फारशी चांगली नाही याकडे लक्ष वेधून याविषयी तत्काळ काहीतरी केले पाहिजे असा सल्ला संघाने दिला होता. परंतु, भाजपचे नेते आपल्याच विश्वात गुंग होते. २००४ साली अटल बिहारी वाजपेयी ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेवर स्वार झाले आणि अगदी थोडक्या जागांनी त्यांची गाडी हुकली होती. २० वर्षांनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने वधारलेल्या शेअर बाजारावर भरवसा ठेवून नेमकी तीच चूक केली. ‘अब की बार चारसो पार’चा नारा देण्याच्या भरात पक्षाच्या राज्य नेत्यांच्या म्हणण्याकडे शीर्षस्थ नेतृत्वाने लक्ष दिले नाही. जिल्हापातळीवर नेमलेल्या संघाच्या प्रचारकांना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपमध्ये बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातले डागाळलेले नेते पक्षात घेण्याचा सपाटा लावल्याबद्दलही संघाच्या नेतृत्वाने चिंता व्यक्त केली होती. राक्षसी बहुमत मिळविण्याच्या लालसेने पक्षाच्या प्रतिमेचा बळी देण्यात आला. या गदारोळात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ‘भाजपला प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. आता पक्ष मोठा आणि सक्षम झाला आहे, स्वबळावर कारभार करू शकतो!’- यापुढे आम्हाला आमचे राजकारण करू द्या. प्रचारकांच्या सल्ल्याची आता गरज नाही, असेच त्यांना स्पष्टपणे सुचवायचे होते. संघपरिवारातील अंतस्थ सूत्रे सांगतात, की निर्णय प्रक्रियेत भाजपच्या शीर्ष नेत्यांना कोणाची लुडबुड नको आहे. भाजपसाठी संघ वैचारिक गुरुस्थानी राहील, परंतु रोजच्या कामकाजात तो नको!- त्यामुळेच संघ स्वयंसेवकांनी यावेळी पुढाकार घेऊन कोणतेही काम केले नाही म्हणतात. उमेदवार निवडीसह इतर अनेक कामांपासून स्वयंसेवक दूर राहिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर उभयतांच्या नातेसंबंधाचे काय होणार?- हे अद्याप ठरायचे आहे.
या निवडणूक निकालाने सर्वांनाच आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. आतातरी पक्षात आपले ऐकले जाईल असे वाटू लागल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुखावले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही बरे वाटत असावे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत त्यांना फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. भाजपला आता आघाडीचा धर्म पाळावा लागेल म्हणून मित्रपक्षही खुशीत आहेत. काँग्रेसमध्ये खुशीचे वातावरण असण्याचे कारण पक्ष राजकीय पटलावर प्राधान्याने झळकला आहे. राहुल गांधी यांचा प्रभावही यातून सिद्ध झाला आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते कारागृहात आहेत. त्यांनाही आता दैवी न्याय मिळण्याची आशा ठेवता येईल. पंजाबातील अकाली दलासारखे प्रादेशिक पक्ष भाजपने दडपून टाकले होते, त्यांनाही आता ‘अच्छे दिन’ येतील असे वाटू लागले आहे. हरयाणा आणि इतर काही राज्यांतही अशीच स्थिती आहे. बाकी काही असो, या निवडणुकीत अंतिमत: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जिंकले आहे. या यंत्रावरचे सर्व आरोप एका फटक्यात धुतले गेले!