स्व. जवाहरलालजी दर्डा यांची आज जयंती. आज बाबूजी हयात असते तर ९३ वर्षांचे असते. आपल्या नातवंडात ते रममाण झाले असते, तरी त्यांचे लक्ष मात्र लोकमतच्या प्रगतीकडेच खिळलेले असते इतके ते लोकमतमय झालेले होते. लोकमत हाच त्यांचा श्वास होता, ध्यास होता, प्राण होता आणि सर्वकाही होता. आयुष्यभर ते विविध स्वप्ने बघत राहिले आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आयुष्य वेचित राहिले. तरुणपणी त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली होती आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला होता. तुरुंगातून सुटल्यावर एकीकडे काँग्रेससाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना ते पत्रकारिताही करीत होते. बापूजी अणे यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी चालवलेले लोकमत हे नियतकालिक पुढे बंद पडले. ते चालविण्याचे बाबूजींनी ठरविले. कारण त्या नियतकालिकाच्या मागे बापूजी अणे यांची पुण्याई होती, तसेच लोकमान्य टिळकांचा आशीर्वादही त्या नियतकालिकाला लाभला होता. नवीन देऊळ बांधण्यापेक्षा जुन्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याच्या भूमिकेतून त्यांनी लोकमत चालवायला घेतला.साप्ताहिक लोकमत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले होते ते बघितले की, एखादी व्यक्ती जिद्दीने काय काय करू शकते याची कल्पना येते. साप्ताहिक लोकमतचे अंक खपविण्यासाठी ते बसने गावोगाव जायचे. तेथे पोहोचल्यावर भाड्याची सायकल घेऊन ते अंक घरोघरी पोहोचवायचे. अशातऱ्हेने अंक तयार करण्यापासून अंक वाटण्यापर्यंत त्यांनी सर्वतऱ्हेची कामे सुरुवातीला केली. त्यानंतरच त्यांनी लोकमतचे रूपांतर दैनिकात करून त्याचे मुद्रण नागपुरातून करायचे ठरविले. त्यांचे राजकारणातील मित्र स्व. वसंतराव नाईक यांनी त्यांना याबाबतीत बरेच समजावले. दैनिक काढण्याच्या भानगडीत तू पडू नको, असे त्यांनी बाबूजींना सांगितले. पण बाबूजींना महाराष्ट्रव्यापी दैनिक सुरू करण्याच्या कल्पनेने इतके पछाडले होते की त्यांनी आपल्या मित्रांचा सल्ला मनावर न घेता दैनिक स्वरूपात लोकमतचे प्रकाशन करण्याचा आपला संकल्प सिद्धीस नेलाच. या दैनिकात त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून काम करण्याची संधी मिळाल्याने बाबूजींना मी अगदी जवळून पाहू शकलो आणि त्यांच्या स्वभावातील विविध पैलू जाणून घेऊ शकलो. त्यांच्या स्वभावाची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या ‘जवाहरलाल’ या नावात सामावलेली आहेत, असे माझ्या लक्षात आले. त्यातील ‘ज’ म्हणजे जय, ‘वा’ म्हणजे वाक्चातुर्य, ‘ह’ म्हणजे हरहुन्नरीपणा, ‘र’ म्हणजे रसिकत्व, ‘ला’ म्हणजे लाजवाब आणि ‘ल’ म्हणजे लढवय्या, या तऱ्हेने त्यांच्या नावातूनच त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये स्पष्ट होत असल्याचे दिसून येते.‘ज’ हा शब्द जय दर्शविणारा तसेच त्यांचे जमिनीशी असलेले नाते दर्शविणारा आहे. बाबूजींच्या हातात मिडासच्या स्पर्शाची जादू आहे असे मला सतत वाटत आले आहे. मिडास राजा ज्याला स्पर्श करायचा त्याचे सोने व्हायचे. तसेच बाबूजी ज्या कामाला हातात घेत त्याचे ते सोने करायचे. लोकमतला त्यांनी सर्वोत्कृष्ट दैनिक करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे दैनिक म्हणून त्याचा लौकिक संपादन केला. त्यांचे नाते जमिनीशी जुळले होते. जमिनीवर त्यांचे प्रेम होते म्हणून लोकमतच्या प्रत्येक कार्यालयात त्यांनी बागा फुलविल्या. जमिनीशी असलेले त्यांचे नाते त्यांनी सामान्य माणसाच्या सुखदु:खाशी स्वत:ला बांधून दाखवून दिले. त्यातूनच लोकमत परिवार ही संकल्पना त्यांनी मजबूत केली. बाबूजींच्या नावातील दुसरा शब्द ‘वा’ त्यांचे वाक्चातुर्य दाखवितो. गोड बोलण्याने माणसांना आपलेसे करण्याची किमया त्यांना साधली होती. त्याचे एक उदाहरण देतो. यवतमाळला साहित्य संमेलन भरणार होते. संमेलनासाठी निधी जमा करण्यासाठी झालेल्या बैठकीत बाबूजीही होते. बाबूजींनी संमेलनाच्या पैशाचा भार काही प्रमाणात उचलावा अशी सूचना बैठकीत कुणीतरी केली. त्यावर बाबूजी म्हणाले, ‘‘तुम्ही कामाला लागा. जेवढा पैसा कमी पडेल तो मी देईन.’’ त्यांच्या बोलण्याने कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. त्यामुळे निधी एवढा जमा झाला की बाबूजींना पैसे देण्याची गरज पडली नाही ! ही किमया त्यांच्या वाक्चातुर्याची होती. त्यांच्या नावातील ‘ह’ म्हणजे हरहुन्नरीपणा. तसेच ‘हत्ती चलत है, कुत्ते भोकत है’ ही वृत्ती. त्यांचा हरहुन्नरीपणा लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांच्याकडे कोषाध्यक्षपद सोपवले होते. तसेच ‘हत्ती चलत है’ या वृत्तीमुळे त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला ते समर्थपणे तोंड देऊ शकले. एका दैनिकाने त्यांच्याविरुद्ध प्रचाराची मोहीम चालवली होती. त्याला ‘तेरामजली पोटदुखी’ या अग्रलेखातून त्यांनी चोख उत्तर दिले होते. ते स्वातंत्र्यसैनिकच नाहीत असाही अपप्रचार करण्यात आला. पण त्यांनी पुराव्यानिशी आपले स्वातंत्र्यसैनिक असणे सिद्ध करून विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले होते. त्यांच्या नावातील ‘र’ शब्द त्यांची रसिकवृत्ती दर्शविणारा आहे. बाबूजी खरे कलारसिक होते. कलाकारांची, लेखकांची ते कदर करायचे. त्यांच्या मैफिलीत ते रममाण व्हायचे. बाबूजींची सौंदर्यदृष्टी आणि नीटनेटकेपणा लोकमतच्या प्रत्येक कार्यालयात पहावयास मिळतो. एकदा कालनिर्णयचे जयंत साळगावकर बाबूजींना भेटायला नागपूरला आले होते. बाबूजी आॅफिसात यायचे होते म्हणून मी त्यांना लोकमत प्रेस दाखवायला घेऊन गेलो. तेथील स्वच्छता पाहून ते चकितच झाले. बाबूजींपाशी त्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘आमच्या प्रेसमध्ये हिंडताना तुमच्या पायाला शाई लागलीच म्हणून समजा.’’ बाबूजींच्या सौंदर्यदृष्टीचे आणि नीटनेटकेपणाचे आणखी वेगळे प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. विजयबाबूंनी कलादालन आणि संगीत अकादमीच्या माध्यमातून बाबूजींचे योग्य स्मारक केले आहे.बाबूजींच्या नावातील शेवटची दोन अक्षरे ‘ला’ आणि ‘ल’ म्हणजे लाजवाब वृत्ती आणि लढवय्या माणूस. हाती घेतलेले कोणतेही काम परिपूर्ण आणि उत्कृष्टच झाले पाहिजे याविषयी त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे ते ज्या ज्या खात्यांचे मंत्री झाले त्या त्या खात्यात ‘दर्डा इफेक्ट’ पाहिला मिळायचा. त्यांनी आपले प्रत्येक खाते चांगले काम करून गाजवले. त्यांच्यातील लढवय्या माणूस त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले तेव्हा जसा पाहायला मिळाला तसाच लोकमतसमोरील आव्हानांना तोंड देतानाही दिसून आला. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत ते कधी खचले नाही. उलट त्यावर मात करून अधिक तेजाने त्यातून बाहेर आले. एक कुटुंब म्हणून त्यांनी लोकमत परिवार उभा केला. परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदु:खात ते तितक्याच तळमळीने सहभागी झाले. फुलांचा सुगंध हा मातीलासुद्धा लागत असतो. तसे त्यांनी प्रत्येकाची जीवने सुगंधीत केली, त्यांना सौंदर्यदृष्टी. नीटनेटकेपणा बहाल केला. संकटांना सामोरे जाण्याची विजिगिषु वृत्ती दिली. त्यामुळे बाबूजी आज नसले तरी त्यांच्या गुणांचे दर्शन त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तीच्या रूपातून पाहायला मिळते. त्यातून त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे!-कमलाकर धारप(संपादक समन्वयक लोकमत)
लोकमान्य व लोकनायक अनुग्रहित जवाहरलाल दर्डा
By admin | Published: July 02, 2016 5:37 AM