डॉ. अजित मगदूमसन १९०८. ‘केसरी’मधील टिळकांनी लिहिलेल्या लेखाविरुद्घ भरलेल्या देशद्रोहाच्या खटल्याचा निकाल लागला. टिळकांना ६ वर्षांचा कारावास आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ज्या ९ न्यायालयीन पंचांच्या निवाड्यावर आधारित हा निकाल देण्यात आला त्यातील ७ युरोपियन पंचांनी टिळकांना दोषी ठरवलंं तर २ भारतीय पंचांनी ते निर्दोष असल्याचं मत मांडलं. टिळकांना म्यानमारमधील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी ‘गीता रहस्य’ हा गं्रथ लिहिला. ६ वर्षांनंतर त्यांची मुक्तता झाल्यानंतर देशभर लोकांनी टिळकांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. या स्वागतातूनच लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ ही उपाधी दिली. ‘‘जर एक भारतीय मुख्य न्यायाधीशाच्या खुर्चीत विराजमान होत असेल तर ते लोकमान्य टिळकांनी सोसलेल्या अपार यातना आणि त्यांच्या बलिदानामुळेच.’’ स्वतंत्र भारतात १९४८ साली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती एम. सी. छगला यांनी वरील उद्गार काढले होते.
पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून बी.ए. गणित विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर टिळकांनी एम.ए. शिक्षण मध्येच सोडून कायद्याची पदवी संपादन केली. देशात ब्रिटिश सत्तेचा वारू चौखूर उधळत होता. तेव्हा भारतीय सामान्यजन अन्याय, अत्याचार व दडपशाहीखाली भरडून निघत होते. सबंध देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत असल्याच्या विचाराने टिळकांच्या मनात अस्वस्थता वाढत होती. एका बाजूला शिक्षण प्रसाराने लोकांच्यात स्वराज्याबाबत सजगता निर्माण होईल असे वाटून न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. तर दुसरीकडे यापेक्षाही व्यापक जनजागृती करण्यासाठी ‘केसरी’, ‘मराठा’ यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. स्वराज्याच्या कल्पनेने त्यांच्या मनात ठाण मांडले होते. या वृत्तपत्रांतून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्घ वाचा फोडण्यासाठी आपली संपादकीय कारकिर्द पणाला लावली. सरकारच्या दडपशाहीविरुद्घ जहालपणे लिहिण्यामुळेच त्यांना कारावासही सोसावा लागला. यामुळेच ब्रिटिश पत्रकार, लेखक व्हलेंटाईन शिरोल यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या ‘भारतीय असंतोष’ (१९१०) या पुस्तकात ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटल्याने हे विधान प्रसिद्घ झाले. १८८६ मधील दुष्काळात शेतकऱ्यांकडून सारा गोळा करण्यास विरोध करून आंदोलन छेडले. या काळात टिळकांनी शेतकरी व कष्टकरी जनतेला संघटित करून ‘दुष्काळ साहाय्यता कायद्या’प्रमाणे दुष्काळपीडित शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणला.
तिकडे लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा घाट घातल्याने लोकमान्य टिळक, लाला लजपत राय व बिपिनचंद्र पाल यांनी आंदोलन उभारले. सरकारच्या या कुटिल कृत्याविरुद्घ देशभर असंतोष पसरविण्यात या तिघांना यश आले. यामुळेच त्यांना ‘लाल, बाल, पाल’ असे गौरवपूर्ण संबोधन प्राप्त झाले. शिवजयंती व गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासाठी चालना देणाºया लोकमान्यांचा लोकसंग्रह अफाट वाढत गेला. दीड वर्षाच्या तसेच सहा वर्षांच्या तुरुंगवासाने राष्ट्रीय पातळीवर एक निडर, झुंझार स्वातंत्र्य सेनानी म्हणून टिळकांची ओळख निर्माण झाली. टिळक कोणत्याही क्षणी डगमगले नाहीत. स्वराज्यासाठी बलिदान देण्याची तयारी हे भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाकांक्षेचं टिळक हे एक प्रतीक होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून अरविंद घोष, व्ही. ओ. चिदंबरम, पिल्लई, महम्मद अली जीना यांसारख्या मातब्बरांची फळी निर्माण केली.
‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्घ हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’’ हा नारा देणारे टिळक. प्लेग साथीच्या वेळी फवारणीच्या छद्मी धोरणावर ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत अग्रलेख लिहिणारे टिळक. दुष्काळात शेतकºयांकडून कर वसूल करण्यास ब्रिटिश सरकारला विरोध करणारे टिळक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू संपूर्ण देशभर परिचित आहेत. लोकमान्य टिळक हे लढवय्ये नायक होते तसेच ते विद्वान तत्त्वचिंतकही होते. एका बाजूला असंतोषाचे जनक तर दुसºया बाजूला संयमी, विवेकी, स्थितप्रज्ञही. टिळकांच्या ठायी जात्याच असलेली सत्त्वशीलता, कणखरपणा व चिंतनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा तसा अलक्षितच राहिला. टिळक हे काम करण्यावर निष्ठा असणारे कर्मवीर होते. त्यांनी ‘गीता रहस्य’ लिहिले. अध्यात्म आणि जीवनमूल्ये, अध्यात्म आणि विशुद्घ समाजकार्य, अध्यात्म आणि लोकसंग्रह असं एक नवं अद्वैत टिळकांनी मांडलं. टिळकांच्या विचारांचे अनेकविध आयाम आजच्या काळात नि:संशय प्रस्तुत ठरतील.