तुर्की आणि सीरियाच्या सीमेवर झालेल्या प्रलयंकारी भूकंपातील मृतांची संख्या पाच हजारांवर जाऊन पोहोचली आहे आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सगळे होत्याचे नव्हते झाले आहे. अवघे जगणेच उन्मळून पडले आहे. अशा संकटाच्या काळात सारे जग सीरिया, तुर्कीच्या मदतीसाठी येत आहे आणि ते आवश्यकही आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भारतानेही मदतीचे पथक रवाना केले आहे. हा भूकंप शतकातील सर्वाधिक मोठा असल्याचे मानले जात आहे.
आताच्या घडीला येथील परिस्थिती पूर्वपदावर आणणे आणि जनजीवन सुरळीत करण्याचे मोठे आव्हान तेथील प्रशासनासमोर आहे. सोमवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या पहिल्या धक्क्यानंतरच्या बारा तासांत ४१हून अधिक धक्के चारपेक्षा अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे आहेत. त्यातील काही ७.५ रिश्टर स्केलचेही होते. तुर्की आणि सीरियाचे या भूकंपाने न भूतो असे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस असेच हादरे सुरू राहतील, असे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. तुर्की आणि सीरिया भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्याला शास्त्रीय कारणे आहेत. तुर्कीच्या उत्तर, मध्य, आणि पूर्व क्षेत्रातून ‘ॲनाटोलिया’ हा ‘टेक्टॉनिक ब्लॉक’ जातो. आफ्रिकी, युरेशियन, इंडियन, अरेबियन प्लेटमधील घर्षणामुळे भूकंप होतात. ‘अरेबियन प्लेट’ उत्तरेकडे सरकत असल्याचे मानले जाते. त्याचा परिणाम ‘ॲनाटोलिया’ हा ब्लॉक हलण्यात होतो. त्याचा फटका तुर्कीला बसला. यातील पृथ्वीवरील भूभागाच्या जवळ कंप झाल्याने मोठे नुकसान झाले.
पहिला सर्वांत मोठ्या तीव्रतेचा भूकंप जमिनीखाली १७.८ किलोमीटरवर झाला. त्यानंतरचे धक्के भूपृष्ठाच्या अधिक जवळ झाले. अशा प्रकारच्या भूकंपाने मोठे नुकसान होते. दोन आठवड्यांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची कंपने पूर्ण उत्तर भारतात जाणवली होती. हा भूकंप जमिनीखाली २५ किलोमीटर अंतरावर झाला होता. अशावेळी तुलनेत कमी नुकसानीची शक्यता असते. अर्थात याची तीव्रताही कमी होती. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. तुर्की, सीरिया आणि मध्य पूर्व आशिया हा भाग गेल्या दहा वर्षांत चर्चेला आला, तो सीरियातील संघर्षामुळे. या भूकंपामुळे अतोनात नुकसान झाले असले, तरी त्यापेक्षा अधिक बळी आणि नुकसान येथील संघर्षामुळे झाले आहे. या प्रदेशाच्या मदतीला आज येणाऱ्या महासत्ता हा परिसर संघर्षमुक्त करण्यासाठी पुढाकार घेताना मात्र दिसत नाहीत.
उलट, संघर्ष चिघळत ठेवण्यातच त्यांचे हित आहे, असे वाटण्यासारखे चित्र आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा उदय आणि त्याविरोधात पुकारलेले युद्ध, निर्वासितांची समस्या आदी बाबी चर्चेत होत्या. तुर्की-सीरियातील तणाव जुनाच असला, तरी गेल्या दहा वर्षांतील घडामोडींमुळे तो चर्चेत आला. सीरियातील संघर्षानंतर निर्वासितांची मोठी समस्या उद्भवली. दुसऱ्या देशात निर्वासितांचे लोंढे जात असताना अनेकांचा त्या प्रवासात मृत्यू झाला. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या एकूण आकडेवारीपेक्षा किती तरी जास्त मृत्यू गेल्या दहा वर्षांतील संघर्षांत झाले आहेत; मात्र, दुर्दैवाने हा संघर्ष सुटण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न फारसे झाले नाहीत. सीरियातील तणाव आजही संपलेला नाही.
अमेरिकेने भूकंपग्रस्तांना मदत जाहीर केली असली, तरी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्याशी संपर्क साधलेला नाही. नैसर्गिक संकटाच्या काळातही आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेच मात्र संपत नाहीत ! धरणी हादरली, तरीही मने अजून जुळत नाहीत. भूकंपाचे पूर्वानुमान शक्य नसल्याने (यावर शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. कंपनाच्या लहरी तयार झाल्यानंतर इशारा फार तर देता येतो.) या संकटाची जाणीव ठेवून विकासाची कामे व्हायला हवीत.
विकासाच्या प्रारुपांवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अर्थात, सध्या सीरिया आणि तुर्कीला साऱ्या जगाच्या मदतीची गरज आहे, ती केवळ भूकंपामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच नव्हे, तर दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये भरडल्या गेलेल्या नागरिकांच्या दु:खांवर फुंकर घालण्यासाठी. राजाने मारले आणि निसर्गानेही झोडपले, अशी त्यांची स्थिती आहे. केवळ येथील प्रशासनासमोर नव्हे, तर हे आव्हान स्वत:ला महासत्ता संबोधणाऱ्या अमेरिका, रशियासह जगातील सर्व देशांसमोर आहे. मानवी समुदाय म्हणून त्याकडे पाहावे लागणार आहे. भूकंपाने उद्ध्वस्त केलेले असताना, पुन्हा सारे उभे करण्यासाठी अवघ्या जगाचा कस लागणार आहे.