एक काळ असा होता की, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लोक दिल्लीच्या थंड हवेचा आनंद लुटत. मुद्दाम दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देत. पण गेल्या काही वर्षांत थंडीचे हे चार महिने दिल्लीकरांना नको नकोसे वाटू लागले आहेत, या थंडीच्या महिन्यांत त्यांचा श्वास कोंडू लागला आहे. थंडीमध्ये कोणी आजारी पडत नाही, दवाखाने ओस पडतात, असे पूर्वी दिल्लीत बोलले जात असे. पण आता थंडी सुरू होताच दिल्लीत श्वास घेणे अवघड होत चालले आहे, दम्याचा त्रास असलेल्यांचे तर हालच आहेत. गेल्या दोन आठवड्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि रुग्णालये, दवाखान्यांत गर्दी वाढत चालली आहे. याचे कारण थंडीमध्ये दिल्ली व परिसरात होणारे प्रदूषण. गेल्या सहा सात वर्षांत या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून, दरवर्षी सर्वोच्च न्यायालयाला त्यात लक्ष घालावे लागत आहे.
केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. यावरून तेथील स्थितीचा अंदाज यावा. यंदा प्रदूषणामुळे दिल्लीच्या शाळांना एक आठवड्याची सुटी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांवर कमीत कमी वाहने यावीत म्हणून, सरकारी खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, सकाळी फिरायला, संध्याकाळी खेळायला जायचे टाळावे, घराच्या दारे व खिडक्या बंद कराव्यात, बाहेर पडायची वेळ आली तर मास्क लावावा, असा सल्ला सरकारने दिला आहे. शेजारच्या पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यांनीही याचे अनुकरण करावे, असा दिल्ली सरकारचा आग्रह आहे. या प्रदूषणाची कारणे सर्वज्ञात आहेत. थंडीमध्ये उन्ह नसते आणि वारे पडत असल्याने हवेतील प्रदूषित घटक खालीच राहतात. त्याचा सर्वाधिक फटका दिल्लीत बसतो, याची अनेक कारणे आहेत. एक तर वाहनांची संख्या दिल्लीत प्रचंड आहे. त्यांची इंजिने प्रदूषित घटक सतत बाहेर फेकत राहतात. दुसरे कारण म्हणजे मोठ्या शहरांत सतत सुरू असणारी बांधकामे. दिल्ली त्याला अपवाद नाही. सध्या तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. तिसरे कारण म्हणजे या काळात दिल्ली व शेजारच्या राज्यांतील शेतकरी जाळत असलेला कृषी कचरा. या सर्वांमुळे दिल्लीकरांचा अक्षरशः कोंडमारा होत आहे. त्यामुळेच काही काळ बांधकामे थांबवा, रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या मर्यादित राहील, याची काळजी घ्या, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून, याची अंमलबजावणी कशी करता येईल, प्रदूषण कमी कसे करता येईल, याबाबत उपाययोजना करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. श्वसनाच्या आजारांमुळे लोकांचे जीव जात असताना सरकारांचे एकमेकांवर जबाबदारी ढकलणे सुरू आहे.
पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी जो कृषी कचरा जाळतात, त्यामुळे फार प्रदूषण होत नाही, असा दावा केंद्र सरकारने यंदा प्रथमच न्यायालयात केला आहे. त्यावर पंजाब व उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. याउलट केजरीवाल सरकार सातत्याने प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भाजपची टीका आहे. काय खाेटे, काय खरे कोणास ठावे; पण दरवर्षी प्रदूषणात वाढ होत आहे आणि त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. देशात दिल्ली शहर प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असले तरी कोलकाता चौथ्या व मुंबई सहाव्या स्थानी आहे. म्हणजे राजधानी दिल्ली जात्यात आहे, तर कोलकाता, मुंबई सुपामध्ये आहेत. दिल्लीसारखी स्थिती या शहरांत यायला वेळ लागणार नाही. याशिवाय देशातील असंख्य लहान शहरांत प्रदूषण वाढत चालले आहे. जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणारे हवामान बदल यांचा फटका पावसाळ्यामध्ये बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटांमुळेही मृत्यू वाढत असून, थंडीत जीव जाण्याची वेळ आली आहे. तापमानातील बदल आणि प्रदूषण यांकडे आता धोक्याची घंंटा म्हणूनच पहायलाच हवे.