सार्वकालिक महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आक्रमकता शिकवल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सांगतात. स्वत: डॉन असे सांगायचा की, क्रिकेटच्या मैदानात तुमची आक्रमकता हातातल्या बॅट किंवा चेंडूतून व्यक्त व्हायला हवी. डॉन त्याच्या शब्दात स्पष्टपणे म्हणाला होता, ‘फलंदाजाने खरे तर प्रत्येक चेंडूवर षटकारच ठोकला पाहिजे. षटकार नाही जमला तर चौकार. चौकारही मारता नाही आला तर तीन धावा पळून काढल्या पाहिजेत. ते जमले नाही तर दोन आणि अगदीच तेही नाहीच जमले तर एक धाव तर काढलीच पाहिजे; पण चेंडू निर्धाव जाणे म्हणजे...’ स्वत: डॉन आयुष्यभर याच जिगरबाज मनोवृत्तीने खेळला. म्हणून तर कसोटी क्रिकेटमध्ये चक्क शंभराला टेकणारी अशक्यप्राय सरासरी तो नोंदवू शकला. आजही त्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकलेला नाही. स्वत: डॉन मैदानात मात्र अत्यंत सभ्य असायचा. हसतमुख डॉन त्याच्या वर्तनातून प्रतिस्पर्धी खेळाडूच काय, देशोदेशीच्या प्रेक्षकांनाही जिंकायचा.
डॉनचे क्रिकेट म्हणजे खरे ‘जंटलमन्स गेम’ आणि तीच खरी आक्रमकता. जे बोलायचे ते बॅट किंवा बॉल बोलेल. तोंड उघडण्याची गरजच काय? डॉनचे नाव घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी डॉनची आक्रमकता आत्मसात केली. म्हणूनच सातत्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करू शकला. लढवय्ये, जिंकण्यासाठी अखेरपर्यंत बाजी लावणारे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खासीयत आहे; पण त्यात डॉनची सभ्यता नाही. डॉननंतरची ऑस्ट्रेलियन आक्रमकता म्हणजे शेरेबाजी, चिडखोरपणा, प्रतिस्पर्ध्याबद्दलचा अनादर आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती असेच समीकरण बनले आहे. अपवाद अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा खेळाडूंचा. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट म्हणजे गावंंढळ, टपोऱ्या डॉनची कहाणी बनून राहिले आहे. येत्या शुक्रवारी ब्रिस्बेनच्या मैदानात भारताचे वाघ पुन्हा एकदा कांगारूंशी भिडतील. बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला हा चौथा आणि अंतिम सामना केवळ मालिकेचे जेतेपद निश्चित करण्यापुरता मर्यादित उरलेला नाही. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधल्या टोकदार संघर्षाचे पडसाद या सामन्यावर आहेत. हा संघर्ष मैदानी मुकाबल्याचा नाही.
भारतीय खेळाडूंना वंशद्वेषाचा, वर्णभेदी शेऱ्यांचा सामना करावा लागला आहे. चेंडूच्या आकारात फेरफार केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला यापूर्वीच शिक्षा झालेली आहे, तरी स्वभावात बदल शून्य. ऋषभ पंतची लय बिघडवण्यासाठी या महाशयांनी त्याच्या ‘बॅटिंग गार्ड’ची खूण मिटवण्याचा प्रयत्न केला. कर्णधार टीम पेनने स्वत: तीन झेल सोडले; पण तरीही सातव्या क्रमांकाच्या फलंदाजालाही शेरेबाजी करण्याची किडकी वृत्ती त्याने दाखवली. अंगावर धावून जाणारे गोलंदाज तर नेहमीचेच. हे कमी की काय म्हणून भारतीय क्षेत्ररक्षकांनाही प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी शेरे ऐकवले गेले. खेळाडू म्हणून पराभूत होणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू माणूस म्हणूनही अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाला शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत भारत असेल. पहिला सामना ज्या झोकात यजमानांनी जिंकला तो तोरा पुढच्या दोन्ही सामन्यांत भारताने उतरवला. विशेष म्हणजे, कोण्या एकाच्या कामगिरीवर नव्हे तर सांघिक प्रदर्शनाच्या बळावर. ऑस्ट्रेलियासाठी हीच मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. कर्णधार विराट कोहलीने पितृत्व रजेसाठी माघार घेतली. पाठोपाठ मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा अशी फळीच जखमी झाली; पण यामुळे भारतीय संघाची बेडर वृत्ती आणि बलदंड मन जराही उणावले नाही. जितके मोठे आव्हान तितकी जबरदस्त कामगिरी असेच गेल्या दोन कसोटी सामन्यांचे विश्लेषण करावे लागते. हनुमा विहारी, आर. आश्विन, ऋषभ पंत या त्रयीने दाखवलेली जिगर, चेतेश्वर पुजाराची अखंड साधना यांनी ऑस्ट्रेलियन उद्धटपणाचा पालापाचोळा केला. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचा धीरोदात्तपणा ऑस्ट्रेलियाच्या अनाठायी आक्रमकतेपुढे अधिक उंच झाला. मितभाषी अजिंक्यही दोन सामन्यांतच ‘डॉन’ झाला; पण ते मैदानातल्या कामगिरीवर, अनावश्यक बडबड करून नाही. मालिकेपूर्वी ‘चार-शून्य’च्या गमजा मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजिंक्यने पाठ टेकायला लावली असली तरी जखमी खेळाडूंच्या वाढत्या यादीमुळे अजिंक्यसाठी ‘लास्ट लाफ’ अधिक आव्हानात्मक ठरला आहे. हे हास्य अजिंक्यने मिळवले तर ऑस्ट्रेलिया नामक टपोरी ‘डॉन’ची पुरती फजिती निश्चित आहे.