राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील जनतेने सत्तेवरून खाली खेचल्यानंतर आणि तेलंगण व मिझोरम या दोन राज्यांत काहीएक करणे न जमल्यावर भाजपाचे पुढारी व त्याचा संघ परिवार त्यातून काही चांगले शिकेल असे साऱ्यांना वाटले होते. पण साºया जणांचे गुरूपण आपल्याकडे आहे अशीच ज्यांची स्वत:विषयीची खात्री आहे ते शिकत नसतात. नापास झाल्यानंतरही जगद्गुरूपदाचा आव आणून ते जगालाच शहाणपण शिकवीत असतात. शिवाय तसे करताना आपला पराभव हा पराभव नव्हेच; प्रत्यक्षात तो आपला नैतिक विजय आहे अशीच त्यांची भाषा असते. पराभवानंतर मोदी त्यांचे दगडी मौन सांभाळून आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातले राजनाथसिंह, सुषमा स्वराज किंवा नितीन गडकरी हेही गप्प आहेत. परंतु ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत. तसे सांगत असतानाही ‘काँग्रेसचा प्रचार कसा फसवा व अनैतिक होता’ हेही सांगायला ते विसरत नाहीत.
‘आम्ही पडलो त्यास त्यांचे पाप कारणीभूत’ असा त्यांचा पडलो तरी नाक वर असा दावा आहे. देशातले राजकारणाचे काही अभ्यासू भाष्यकार व बडी वर्तमानपत्रे मोदींचा पराभव मोदींमुळेच झाला हे सप्रमाण सांगत असताना ही प्रचारी माणसे त्यांची मुजोरी थांबवायला तयार नाहीत. या पराभवाची सर्वांत मोठी कारणे मोदींनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी ही आहेत. या सरकारने आपल्या कारकिर्दीत ग्रामीण भाग व गरीब माणसांची केलेली उपेक्षा हे त्याचे दुसरे कारण आहे. शिवाय त्यांनी राजकारणात रामाचा एवढी वर्षे एवढा वापर केला की लोकांना रामही भाजपाचाच प्रवक्ता वाटू लागला आहे. या सरकारची गोवधबंदी फसली, नीती आयोग नाकाम ठरला, विद्यापीठ आयोगाची मोडतोड करून सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदावर संघाच्या बौद्धिकात तयार झालेली माणसे आणून बसविली. शिवाय प्रथम सर्वोच्च न्यायालय व सारी न्यायव्यवस्था भाजपाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला व आता त्यांची नजर रिझर्व्ह बँकेजवळ असलेल्या नऊ लाख कोटी रुपयांच्या राखीव निधीवर असल्याने ती बँकही आपली मांडलिक बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातूनच रघुराम राजन गेले आणि आता ऊर्जित पटेल गेले. नवे गव्हर्नर शक्तिकांता दास सरकारच्या हातचे बाहुले आहेत. ही बाब साºयांच्या लक्षात आली आहे. ‘मी बँकेची स्वायत्तता टिकवीन,’ असे ते आज म्हणत असले तरी तेच उद्या त्या बँकेच्या किल्ल्या मोदी सरकारच्या हाती नेऊन देतील असे सारेच म्हणतात. सारी यंत्रणा अशीच ताब्यात असल्यानंतरही एकूण पराभव वाट्याला येत असेल तर त्याचा दोष कोणी घ्यायचा असतो? भारत हा एकेकाळी नाम परिषदेचा नेता होता. या परिषदेत १४८ राष्टÑे होती. प्रत्यक्षात या परिषदेचा आरंभ व स्थापनाच नेहरूंनी केली. मोदींनी तिच्याकडे एवढे दुर्लक्ष केले की या वर्षी त्या परिषदेच्या बैठकीला ते किंवा त्यांचा कोणताही मंत्री हजर राहिला नाही. लहान देशांचे जगाच्या राजकारणात एक महत्त्व आहे. त्यांचे संघटित व नैतिक वजन मोठे आहे. मात्र मोदींना त्यापेक्षा ट्रम्प यांना मिठी मारणे, पुतीन यांच्या गळ्यात पडणे आणि शिपिंग यांना ढोकळे खाऊ घालणेच महत्त्वाचे वाटले आहे. ते पुढारी भारताला महत्त्व देत नाहीत आणि जे देश ते देत होते त्यांच्यापासून मोदींनी देशाला दूर नेले आहे. गांधी आणि नेहरूंना शिव्या देणे, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुसून टाकणे आणि त्यात भाग घेणाºया लक्षावधी लोकांची उपेक्षा करणे यातच धन्यता मानण्याचे राजकारण मोदींनी व संघाने केले. कारण संघाचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी कोणताही संबंध नाही. तो नसल्याने त्याला १९४७ पूर्वीचा इतिहास नाही. ही स्थिती, इतरांचे इतिहास पुसून काढायला त्याला भाग पाडते. मात्र लोक डोळस आहेत. त्यांना या स्वातंत्र्यामागची कारणे समजतात. त्यांना सरकारचे अपयशही समजते. आज त्याचा परिणाम ते स्वत:च्या अडचणींमध्ये पाहत असतात. काही थोडीच माणसे धनाढ्य का होतात आणि आपली अडचण वाढतच कशी जाते हे ज्यांना कळले त्या गरीब माणसांनी मोदींचा पराभव केला आहे. मोदी त्यातून काही शिकणार नसल्यास ते त्यांना आणखीही एक धडा लवकरच शिकवतील. आणि तो दिवस दूर नाही.ज्यांना राजकारणात भाव नाही ते रुद्रप्रताप सिंहांसारखे मंत्री व त्या पक्षाचे काही प्रवक्ते या पराभवातील मतांची गणिते सविस्तरपणे मांडून त्यात आपणच कसा विजय मिळविला आहे ते सांगत आहेत.