मुंबईशेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सचा वारू आता चौखुर उधळला आहे. गेल्या एक महिन्यात सेन्सेक्समध्ये तब्बल ३६०० अंशांची वाढ होत निर्देशांकाने ६६ हजार अंशांचा आजवरचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निपटीनेही १९ हजार अंशाची पातळी गाठली आहे. गेल्या महिनाभरात असे नेमके काय झाले की भारतीय शेअर बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली असावी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर यावेळच्या उच्चांकामागे जी कारणे आहेत ती आगामी तीन ते पाच वर्षांसाठी सर्वांना दिलासा देणारी आहेत, असा निष्कर्ष आता काढला तर तो अतिशयोक्तीचा ठरू नये. यातील सर्वांत प्रमुख कारण म्हणजे, जागतिक भांडवली बाजारावर ज्या शक्तिमान अमेरिकेचा प्रभाव आहे, त्या अमेरिकेमधील चलनवाद आटोक्यात येताना दिसत आहे. ही चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदरात सातत्याने वाढ केली होती. अमेरिकेत व्याजदर वाढल्यामुळे स्वाभाविकरीत्या परदेशी वित्तीय संस्था अर्थात एफआयआयनी अमेरिकेत गुंतवणुकीचा ओघ वाढवला होता. मात्र, आता चलनवाढ आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्याजदर 'जैसे थे' किंवा उतरण्याचे संकेत मिळाल्यानंतर गुंतवणुकीवर भक्कम परतावा देणाऱ्या आशिया खंडातील शेअर बाजारांकडे या कंपन्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. तेथील सरकारी रोख्यांच्या दरातही घट होण्यास सुरुवात झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जुलै महिन्यात आतापर्यंत म्हणजे पहिल्या १८ दिवसांत परदेशी वित्तीय संस्थांनी तब्बल ३० हजार ६६० कोटी रुपये गुंतवले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये १ लाख ७ हजार कोटी रुपये गुंतवले होते. त्या तुलनेत १८ दिवसांतील गुंतवणूक लक्षणीय आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारावर धडका देत असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रातही तेजीचे कोंब फुटत आहेत. जून महिन्यात देशात १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. याचा अर्थ भारतीय कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सुधार येताना दिसत आहे. लोकांच्या क्रयशक्तीमध्येही वाढ होताना दिसत आहे. मधल्या काळात भारतीय बाजारात झालेल्या चलनवाढीवर नियंत्रण घेताना दिसत आहे, तर जून व जुलै महिन्यात होणारा पाऊस हा वार्षिक सरासरी भरून काढत धान्य उत्पादन विक्रमी करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे देशी वित्तीय संस्थादेखील भरभरून पैसे भारतीय शेअर बाजारात ओतत आहेत, तर ज्यांना थेट बाजाराचा अंदाज नाही, अशी मंडळी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजारात प्रवेश करत आहेत. भारतीय म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेतदेखील तब्बल ४४ लाख ३९ हजार कोटी रुपयांची भरभक्कम वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजारात आलेल्या या तेजीमुळे आपले मित्र श्रीमंत झाले आणि आता आपण मागे राहिलो का, असा स्वाभाविक प्रश्न कुणालाही पडेल. आजवर असेही सांगितले जायचे की, बाजारात मंदी येईल तेव्हाच प्रवेश करा. तेजीमध्ये प्रवेश करणे जोखमीचे आहे. मात्र, आगामी तीन ते पाच वर्षांचे क्षितिज जोखता या क्षणीदेखील बाजारात गुंतवणूक करण्यास हरकत नाही. सेन्सेक्सचा वारू इतक्यात आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. आगामी दीड वर्षात कदाचित सेन्सेक्स १ लाख अंशांचा टप्पाही लीलया पार करेल, असाही अंदाज आता बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, बाजारात कुणी व कधी उतरावे, याचा सल्ला न देणे इष्ट. ज्याने त्याने आपली क्षमता जोखून जोखीम स्वीकारावी.
बाजार भावनेवर चालतो. आजही रशिया युक्रेन युद्धाची उबळ सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र, पाणी ज्याप्रमाणे स्वतःची वाट शोधत पुढे जाते, तसाच पैसादेखील अस्थिरतेच्या वातावरणातून स्वतःची वाट शोधत अधिक श्रीमंतीच्या दिशेने प्रवास करतो. या युद्धाच्या अस्थिरतेतून अशीच वाट निघाली असून नव्या वाटेने जागतिक अर्थकारण स्थिरावू पाहत आहे. परिणामी, दोन देशांतील आपापसांतील व्यवहार पुन्हा वाढताना दिसत आहेत आणि याची परिणती संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये समृद्धी येण्यासोबतच संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलात व नफ्यात वाढ होण्याच्या रूपाने दिसत आहे. या कंपन्यांच्या समृद्धीत होणारी वाढ त्यांच्या समभागांत केलेल्या गुंतवणूकदारांच्या खिशापर्यंत पोहोचू लागल्यामुळे आता गुंतवणूकदारही आनंदात आहेत. या आनंदाचा परीघ आता किती विस्तारतो, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.