सीरम इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ संशाेधक संचालक डाॅ. सुहास जाधव यांनी काेराेनावर बाेलताना एक सत्यवचन सांगितले. ते म्हणाले, केवळ माणूस आंतरराष्ट्रीय प्रवास करीत नाही. त्याच्याबराेबर अनेक विषाणूही प्रवास करीत असतात. काेराेनाचा विषाणू प्रथमत: सापडल्यानंतर केवळ दाेन महिन्यांत ताे विषाणू १९४ देशांत पाेहाेचला हाेता. जितका माणसांच्या प्रवासाचा वेग, तितकाच विषाणूचाही असताे. बर्ड फ्लूबाबत तसेच पुन्हा घडत आहे. २०१७-१८ या वर्षात बर्ड फ्लू आला हाेता. त्याला घालविण्यात आपणास यश आले असे वाटले हाेते, पण ताे विषाणू काेठे ना काेठे राहताे. त्याच्याशी अविरत झुंज द्यावी लागते. भारताने पाेलिओपासून मुक्तता २०११ मध्ये घेतली. मात्र, अद्याप ताे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे. बर्ड फ्लू हा काेंबड्यांपासून पसरताे, असे मानले जाते. मात्र, काेणत्याही पक्ष्यांपासून ताे पसरताे. हिवाळ्यात आपल्या देशात ठिकठिकाणांहून अगदी परदेशांतूनही प्रवासी पक्ष्यांचे आगमन हाेते.
राजस्थानमध्ये प्रथम काही पक्षी मरण पावल्याच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात ठाण्यात कावळे मृतावस्थेत आढळून आले. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, आदी राज्यांत किरकाेळ प्रमाणात का असेना, अशा घटनांनी बर्ड फ्लूचा धाेका निर्माण झाल्याची आणि ताे पसरताे आहे, याची घंटा वाजविण्यात आली आहे. माणसांच्या प्रवासावर किंवा हालचालींवर लक्ष ठेवता येईल. त्यांना राेखता येईल. परदेशातून येणाऱ्यांना सरळ क्वाॅरण्टाइन करून टाकता येईल. पक्ष्यांचे दळणवळण कसे राेखणार, हा माेठा प्रश्न आहे. गेल्या मार्चमध्ये काेराेनामुळे पाेल्ट्री व्यवसाय रसातळाला गेला. कारण काेंबड्यांचे मांस खाल्ल्याने काेराेना हाेताे, असा अपप्रचार करण्यात आला आणि पाेल्ट्री व्यावसायिकांना जिवंत काेंबड्या जमिनीत गाडून टाकाव्या लागल्या हाेत्या. गेल्या चार महिन्यांपासून बऱ्यापैकी हा व्यवसाय सावरला आहे. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच आता बर्ड फ्लूचे संकट ओढावले आहे. जेथे काेठे काेणत्याही प्रकारचे पक्षी सामुदायिक पद्धतीने मृतावस्थेत आढळले की, तेथे विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे असतात. काेंबड्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना सर्दी हाेते आणि त्यामुळे श्वास काेंडला जाऊन मृत्यू ओढावताे. काही राज्यांत एच फाइव्ह आणि एन आठचा बर्ड फ्लू विषाणूचा स्ट्रेन आढळून आला आहे. मात्र, याचा मानवी संसर्ग झाल्याचे भारतात काेठेही आढळून आलेले नाही. माणसात त्याचा संसर्ग झाला तर हा विषाणू अधिक वेगाने पसरताे. त्यांच्यातील संसर्गाने हा धाेका वाढीस लागताे. सध्या तरी तशी लक्षणे आढळून आलेली नाहीत.
केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकार पाेल्ट्री व्यवसायात निर्जंतुकीकरणाची माेहीम राबवित आहेत. काही राज्यांनी प्राणी-पक्षी संग्रहालये बंद केली आहेत. काही राज्यांनी आंतरराज्य पक्षी वाहतूक बंद केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे केले पाहिजे. यात सर्वाधिक फटका पाेल्ट्री व्यावसायिकांना बसताे. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा राेजगार हिरावून घेतला जाताे आहे. बर्ड फ्लूचा धाेका अधिक जागरूकतेने हाताळावा लागणार आहे. महाराष्ट्रात, तसेच शेजारच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाेल्ट्रीचा व्यवसाय माेठ्या प्रमाणात आहे. आजवर अनेक राज्यांत लाखाे पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे. ताे नियंत्रणात आणण्यासाठी निर्जंतुकीकरणाची माेहीम आवश्यक आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव झाला तेव्हा सर्व पातळीवर दक्षता घेण्यात आली. युराेप किंवा अमेरिकेइतका माेठा फटका मनुष्य बळींच्याबाबत भारताला बसला नाही. आर्थिक हानी प्रचंड झाली, पण जनतेने मनावर घेतले आणि सर्व पातळीवर लढत राहिले. तसाच प्रयत्न करावा लागणार आहे. काेणताही विषाणू विविध मार्गाने माेठ्या प्रमाणात पसरताे आहे, कारण आपले दळणवळण वाढले आहे. प्रवास वाढला आहे. एकत्र येऊन काम करायची संख्या वाढली आहे. त्यामुळे आपणास सतर्कता बाळगणे हाच सर्वांत माेठा उपाय राहणार आहे. उन्हाळ्यात अनेक विषाणू कमी हाेतात. तसे बर्ड फ्लूमध्ये आढळणारा विषाणू शंभर अंश सेल्सिअसला जगू शकत नाही. काेंबडीचे मांस खाणाऱ्यांना तसा धाेका नाही, पण संसर्ग टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. जेथे कोठे मृत पक्षी दिसतील, त्याची दखल लगेच घेऊन नागरिकांनीही संबंधित यंत्रणेला कळविले पाहिजे. यंत्रणा त्या पक्षांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासून घेतील. त्यामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळल्यास तातडीने योग्य त्या उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होईल. त्यामुळे बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.