अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष या दोघांनी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा आपसात वाटून घेऊन, सोनिया गांधी व राहुल गांधी या दोघांसाठीच दोन जागा मोकळ्या ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यातील राजकीय सूडवृत्तीचा असला, तरी राजकीय शहाणपणाचा नाही. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसने तसे केले, म्हणून आम्ही उत्तर प्रदेशात तसेच करू, हा न्याय आदिम स्वरूपाचा असला, तरी राजकीय नाही आणि शहाणपणाचा तर मुळीच नाही. त्या तीन राज्यांत काँग्रेसने तेथील राजकीय परिस्थिती पाहून घेतलेला जागावाटपाचा निर्णय बरोबर होता, हे मतदारांनीच मतदानातून सिद्ध केले. ज्या वेळी काँग्रेसला सोबत घेऊन समाजवादी पक्ष आणि बसपाने उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढविल्या, त्या वेळी त्या तीनही पक्षांना चांगल्या जागा व विजयही मिळाला. आताचे राजकीय वातावरण बदलले आहे.
जनतेला भाजपाशी लढत देणारा अखिल भारतीय पक्ष किंवा तशा पक्षांसोबत बळकट आघाडी हवी आहे. राहुल गांधींनी ती कर्नाटकात केली, महाराष्ट्रात केली, आंध्र प्रदेशात केली आणि तामिळनाडूतही केली. अन्य राज्यांतही ती करण्याच्या प्रयत्नाला ते लागले आहेत. या स्थितीत आपली दारे आधीच बंद करून घेण्याचा सपा व बसपाचा निर्णय त्यांच्याही हिताचा नाही. शिवाय सध्याच्या विपरित परिस्थितीत तो भाजपाला मदतीचा ठरेल, असाही आहे. सपा व बसपा यांच्यात युती झाली, तर त्या दोन पक्षांना उत्तर प्रदेशात ५० जास्तीच्या जागा मिळतील, असा अंदाज काही सर्वेक्षणांनी नोंदविला आहे. मात्र, तसे करताना त्यांनी काँग्रेस व त्याचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील हे गृहित धरले आहे, हे वास्तव हे दोन पक्ष आता विसरत असतील, तर तेच त्यांचे सर्वात मोठे शत्रू ठरतील. आजच्या घटकेला मोदींना बरोबरीने तोंड देऊ शकेल, असा एकच नेता देशासमोर आहे आणि तो राहुल गांधी हा आहे. त्याचे बळ वाढविण्याऐवजी त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न अखिलेश किंवा मायावती हे करीत असतील, तर ते त्यांचीही लोकप्रियता घालवून बसतील. राजकारण हे स्थैर्याचे क्षेत्र नव्हे, त्यात मित्र बदलतात. शत्रू बदलतात आणि कालचे प्रतिस्पर्धी आताचे सहकारी बनतात. शिवाय गेल्या चार वर्षांत देशाचे राजकारण एका बाजूला प्रदेशकेंद्रित होत असतानाच, दुसरीकडे ते एककेंद्रीही होत आहे. त्यांची ही अवस्था नजरेआड करणे शहाणपणाचे नाही. मायावती या तशाही हट्टी व एककल्ली राजकारणी आहेत. पार चिखलात रुतून बसलेल्या अजित जोगींच्या पक्षाशी त्यांनी मध्य प्रदेशात युती केली. त्या बळावर ते राज्य आपण जिंकू शकू, अशी त्यांना आशा होती. काँग्रेसपेक्षा भाजपाला फायदा होईल, अशीच ही राजकीय रचना होती. राज्य जिंकणे सोडा, अपयश त्यांच्या पदरी पडले. त्या अपयशातून त्या काहीच शिकल्या नाहीत, असेच त्यांचे आताचे राजकीय वर्तन आहे, तसेच अखिलेश यांचेही. त्यांनी वडिलांशी वैर केले. मित्र दूर केले आणि आता ते नव्या मित्रांच्या शोधात आहेत. त्यांचा दुर्दैवाने त्यांना मायावतीसारखे स्नेही लाभले. ते जास्तीची किंमत मागणार आणि कमी मोबदला देणार. त्याहून महत्त्वाची बाब ही की, हे दोन्ही पक्ष एकेकटे किंवा एकत्र येऊन मोदींना हरवू शकत नाहीत आणि राहुल गांधींएवढी ताकदही उभी करू शकत नाहीत, हे जनतेला कळते. त्यामुळे जे पराभूतच होणार आहेत, त्यांना मतदान करायला किती जण पुढे येतील? त्या दोघांसारख्याच आणखीही एक नेत्या मित्राची वाट पाहात आहेत, त्या म्हणजे ममता बॅनर्जी. या बार्इंच्या हटवादीपणापायी सारेच हैराण आहेत. त्यांना कुणी जवळ करीत नाहीत आणि राजकीय महत्त्व लक्षात घेऊन दूरही लोटत नाहीत. गेल्या २० वर्षांत त्यांचा स्वभाव पूर्वीहून अधिक हेकेखोर व अहंमन्य झाला आहे. मी म्हणजेच बंगाल अशी मनस्थिती असलेल्या या ममताबार्इंशी कोण मैत्री करील? आणि त्यांचा विश्वास तरी कोण बाळगतील? मोदी व शहा यांचा आक्रमक व काहीशा हुकूमशाही वृत्तीचा पाडाव करायचा, तर विरोधी पक्षांना एकत्र येण्याखेरीज व काँग्रेसचे अखिल भारतीय असणे मान्य करण्याखेरीज पर्याय नाहीत. जे ते करणार नाहीत, त्यांचे पक्ष गल्लीबोळात वा गावखेड्यातच राहतील. खास करून प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय राजकारणातील त्यांची ताकद आणि राजकीय परिस्थितीतील अपरिहार्यता ओळखण्याची गरज आहे.मोदींना बरोबरीने तोंड देऊ शकेल, असा एकच नेता देशासमोर आहे आणि तो राहुल गांधी हा आहे. त्याचे बळ वाढविण्याऐवजी त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न अखिलेश, मायावती हे करीत असतील, तर ते आपलीही लोकप्रियता घालवून बसतील.