- राही भिडे, ज्येष्ठ पत्रकारजळगावच्या मातीत जन्मलेल्या खान्देशी संस्कारात वाढलेल्या ज्योत्स्ना जैन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्नुषा व विजयबाबू दर्डा यांच्या पत्नी होऊन विदर्भात आल्या अन् दोन्ही कुटुंबाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्या व त्यांचा आब त्यांनी सहजरित्या पेलून नेला. ज्योत्स्ना या नावातच एकवटलेली ऋजुता, ममता, स्नेहभाव यांचा अनुभव दर्डा कुटुंबासोबतच लोकमत परिवारातील सर्वांनीच अनुभवला. जैन कुटुंबातून येताना राजकीय वारसा पदरी होताच. सासरीही बाबूजींचा राजकीय राबता आणि विदर्भातील मातीतला एक रांगडा गोडवा अनुभवत एखादी स्त्री या माहौलात बुजून घरातल्या चार भिंतीत राजकीय, सामाजिक प्रतिष्ठेची झूल सावरत वावरली असती. पण स्वत:च्या अस्तित्वाचा पायरव आपल्या काळजात साठवत ज्योत्स्ना भाभींनी स्वत:ची स्वतंत्र पायवाट निर्माण केली. मोठ्या वृक्षांच्या घनदाट सावलीत उभं राहून ज्योत्स्ना भाभी आपल्या आतल्या गाण्याचं खोल तळं इमाने इतबारे राखत होत्या. या शास्त्राची शिस्त पाळत रियाजाची समाधिस्त अवस्था त्यांनी कधीच भंगू दिली नाही. त्यांच्या मनाचा एक कोपरा माहेरातून पदराला बांधून आणलेल्या गाण्यांसाठी सदैव तुडुंब भरलेला असायचा. अगदी मृत्यू काही पावलं दूर असतानाही मुंबईला निघताना शेवटचा रियाज करुन शेवटच्या यात्रेला सज्ज झालेली ही मनस्वी स्त्री ! भजन-गीतांची बाराखडी मनात घोळवणारी. त्या गीतांना अलगद मायेने खेळवत कागदावर जोजवणारी ही कलासक्त स्त्री चहू अंगांनी जगण्याला कवेत घेत होती.
स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाची चाहूल त्यांनी १९९१ साली जैन सहेली मंडळाची स्थापना करुन दाखवून दिली. सामाजिक कामाचा वारसा त्यांनी माहेरातूनच आंदणासोबत आणला होता. दर्डा परिवारातल्या मातीत रुजताना विजयबाबूंसारखा सखा-पती सोबत होताच. पण त्याचबरोबर देवेंद्र व पूर्वाची आई होताना ज्योत्स्ना भाभींनी आपल्या मातृत्वाचा आनंद स्वत:सोबतच आपल्या घराला दिला. लेकरं मोठी झाली, त्यांच्या पंखात बळ आलं तेव्हा त्या विविध सामाजिक कार्यात स्वत:ला गुंतून घेत उंबरठ्या आतल्या अन् उंबरठ्या बाहेरच्या जगाचे सर्व कवडसे नीट न्याहाळू लागल्या. यातच त्यांनी लोकमतच्या माध्यमातून ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना केली व त्यांच्या कार्याचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढत गेला. ज्योत्स्ना भाभींचे वेगळेपण अधिकाधिक अधोरेखित होत गेले.
मी लोकमतमध्ये काम सुरु केल्यापासून भाभींशी माझाही स्नेह जुळला होता. मुंबईत अलीकडेच षण्मुखानंद सभागृहामध्ये गाण्याचे भावविभोर सूर कानावर पडत होते, मंचावर भाभींचा लाघवी मनस्वी फोटो मला त्यांच्या अनेक आठवणींकडे बोट धरुन नेत होता. संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी मंचावर हजेरी लावली. विजयबाबू पत्नीच्या मनातलं गाणं तिच्या नंतरही आपल्या काळजापाशी कसं अलवार जोपासतात, याचा एक अत्यंत मनोहर क्षण मी अनुभवत होते.
भाभीजींच्या संगीत स्मृती जतन करण्यासाठी विजयबाबूंनी ‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कारा ’ची योजना तयार करून ती प्रत्यक्षात आणली आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यावर शभरात दंगली उसळल्या होत्या. मुंबईत वातावरण खूपच तापलं होतं, मला मुंबईला निघायचं होतं, नागपूर स्टेशनवर जाणार कसं? - सगळे व्यवहार ठप्प झाले होते. मी त्या मन:स्थितीत ज्योत्स्नाभाभींना फोन केला. त्यांनी ट्रेन बंद तर झाल्या नाहीत ना. वाटेत काही अडचणी तर येणार नाही ना. या सारख्या अनेक गोष्टींची खातरजमा करुन घेत मला गाडी पाठवली. ड्रायव्हर सोबत जेवणाचा डबा, पाण्याची बाटलीही होती. ही आत्मीयता पाहून मन भरून आलं. मी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढले. सेकंड एसी डब्यात मी एकटीच व दूरवर एक मध्यमवर्गीय जोडपं दिसलं. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. अवती-भोवती कोणीच नाही. वाटेत जर गाडी अडवली असती तर संरक्षण नाही. एक भयाण गोठवलेली रात्र होती ती. ना खाण्याचं विकायला येणारे विक्रेते ना पाणी, चहावाला. रात्र हळूहळू सरत होती. देश जलद गतीने पेटत चालला होता. त्या भयावह रात्रीत मात्र माझ्यासाठी भाभींनी बांधून दिलेला घरचा डबा अन् पाण्याची बाटली होती... केवढा मोठा आधार !
त्यांचं ते प्रेम कधी कसं विसरणार? त्यांची मुलगी पूर्वाच्या लग्न सोहळ्यात मेंदीवाली समोर बसवून दोन्ही हातावर मेंदी काढायला लावणाऱ्या ज्योत्स्ना भाभी, मुंबईत विजयबाबूंनी आयोजलेलं एक स्नेहसंमेलन रात्री उशिरा संपल्यावर मला इतर पत्रकारांसोबत जाऊ न देता स्वत: घरी सोडून येणाऱ्या भाभी अशा किती किती आठवणींचा उरुस भाभींच्या आठवणींनी भारलेला आहे. एक अत्यंत मनस्वी गायिका, लेखिका, माहेर-सासरचं वलय सोबत असतानाही सामाजिक कार्यात रमलेल्या, निखळ माणूसपण जपणाऱ्या ज्योत्स्ना भाभींचा जीवनप्रवास अनेक कंगोऱ्यातून बिल्लोर इंद्रधनुष्य समोर उभं करतो. यात शंका नाही !