प्रिय नागपूरकर,नमस्कार. थंडी काय म्हणतेय. सध्या आपल्या शहरात राज्यभराचे आमदार, मंत्री, अधिकारी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले आहेत. आपण त्यांचे स्वागत जोरदार केलेलेच आहे. त्यांच्या येण्यामुळे आपले रस्ते बदलले असतील, काही मार्ग बंद झालेले असतील. पण विदर्भाच्या विकासासाठी हे सगळं आपण सहन करायला पाहिजे ना. कोणकोणते विभाग या अधिवेशनासाठी झटत आहेत माहिती आहे का तुम्हाला? पण हे फायदे पाहा ना भाऊ...आपल्या बांधकाम विभागाने सगळ्या पाहुण्यांसाठी चक्क चार- पाचशे टीव्ही भाड्याने घेतले. रंगरंगोटीचे काम काढले आहे, हजारो पोलीस कर्मचारी राज्यभरातून आलेले असतानाही रोजंदारीवर शेकडो लोक घेतले. शेवटी आपल्याकडे येणाºया पाहुण्यांचा सगळा खर्च तर निघाला पाहिजे ना भाऊ... कुणाला गाड्या हव्यात, कुणाला हॉटेल हवे, कुणाला आणखी काही लागते... सगळ्यांच्या सोयीनुसार ‘व्यवस्था’ करण्यात आपले सगळे अधिकारी कामाला लागले. तेव्हा आपली थोडी फार गैरसोय तर होणारच. पण हे फायदे पाहा ना भाऊ...विदर्भातले अधिवेशन किमान महिनाभर झालेच पाहिजे, असे आपले देवेनभाऊ विरोधात असताना आग्रह धरायचे. आता ते राज्याचे प्रमुख आहेत. तेव्हा त्यांना सगळ्या राज्याचे पाहावे लागते. अधिवेशन दोन आठवडे होते म्हणून तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. पण हे फायदे पाहा ना भाऊ...या दोन आठवड्यात विदर्भात किती उलाढाल होते ते पाहा. सावजीच्या रश्श्यावर ताव मारला जातो, रंगीत पाण्याची विक्री वाढते, सकाळी सकाळी पोहे आणि चण्याचा कट खायला खवय्यांची गर्दी होते, तर काही दर्दी वडा रश्श्यापासून ते पानाच्या ठेल्यापर्यंत अनेक ठिकाणं तुम्ही मंडळी प्रेमाने शोधून ठेवता. पण हे फायदे पाहा ना भाऊ... राहता राहिला विधिमंडळात काय होते त्याचा. पहिले दोन दिवस तर कसे गेले तुम्ही पाहिलेच आहेत. पुढचे आठ दिवसही पटापट निघून जातील. मागच्या अधिवेशनाने विदर्भाला काय दिले आठवते का तुम्हाला... नाही ना... मग यावर्षी काय मिळणार हे तरी कशाला लक्षात ठेवत बसता.
पण हे फायदे पाहा ना भाऊ...
By अतुल कुलकर्णी | Published: December 13, 2017 1:33 AM