- किरण अग्रवाल
आपल्याकडे उंची मोजण्याचे वा जोखण्याचे परिमाण म्हणून व्यक्तीच्या पद, पैसा, प्रतिष्ठेकडे पाहिले जाते; पण प्रत्यक्षात या सर्व गोष्टी असूनही वैचारिक खुरगटलेपण प्रत्ययास येणाऱ्या व्यक्ती कमी नसतात. काळ बदलला तशी काळाची आव्हानेही बदलली. मात्र, त्यातुलनेत मनुष्याची वैचारिक पातळी उंचावली का हा खरे तर प्रश्नच ठरावा. यातील उंचावणे हे फक्त आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक जाणीवेच्या दृष्टीनेही विचारात घेतले तर फारसे समाधानकारक चित्र समोर येत नाही. संवेदनांशी सांगड तुटली की, जाणिवा बोथट होतात, मग भौतिक अर्थाने कुणाचीही उंची कितीही मोठी भासत असली तरी ती थिटी पडल्याखेरीज राहत नाही. कोरोनानंतरच्या जगण्याची परिमाणे बदलताना प्रस्तुत भूमिकेतून विचार केला जाणे व मानसिक उन्नयन घडून येणे गरजेचे ठरावे.
या अघळ पघळ प्रास्ताविकामागची पार्श्वभूमी अशी, की पीएलओएस वन या ओपन ॲक्सेस सायन्स जर्नलने अलीकडेच व्यक्तीच्या शारीरिक उंचीबाबत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष पुढे आले असून, समाजातील श्रीमंत आणि गरिबातील अंतर हे फक्त पैसा व साधनांच्याच बाबतीत नसून ते शारीरिक उंचीतही असल्याचे त्यात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत श्रीमंतांच्या सरासरी शारीरिक उंचीमध्ये विशेष फरक पडलेला नसला तरी गरिबांची सरासरी उंची मात्र कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. गरीब वर्गातील महिलांची सरासरी उंची ०.०५ सेंटिमीटरने वाढली तर श्रीमंत महिलांची सरासरी उंची ०.२३ सेंटिमीटरने वाढल्याचेही यातून समोर आले आहे. व्यक्ती व्यक्तींमधील भेदाभेदाची अगर विषमतेची दरी कोणकोणत्या पातळीवर किंवा संदर्भाने अनुभवास येते हेच यातून लक्षात यावे. अर्थात यातून घेता येणारा मुद्दा वेगळाच आहे, तो म्हणजे शारीरिक उंचीचे मोजमाप यानिमित्ताने पुढे आले असले तरी वैचारिक उंचीचे काय? ती कशी वाढणार किंवा त्यासाठी कसले प्रयत्न होणार?
कोरोनाच्या संकटाने जगण्याचे तंत्रच बदलून ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर तर शारीरिक उंचीपेक्षा संवेदना व जाणिवेच्या कक्षा उंचावणे अत्यंतिक गरजेचे बनले आहे. दुर्दैव असे की, शिक्षण व सुविधांनी माणूस पुढारला असला तरी पूर्वापार चालत आलेल्या समाजातील अनिष्ट अगर अविवेकी विचारांचे बुरसटलेपण संपलेले दिसत नाही. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा यासाठी गर्भातच अनेक नकोशींचा गळा घोटण्याचे पातक अजूनही सुरूच असल्याचे दिसते, तर नसत्या हव्यासापोटी मांत्रिका-तांत्रिकाकडून पोटच्या लेकराबाळांनाच बळी देण्याचे अघोरी प्रकारही अधूनमधून घडतच असतात. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची भांडी वेगळी ठेवून सदर भांडी त्या विद्यार्थ्यांनाच धुवावी लागत असल्याचा प्रकारही अलीकडेच समोर आला असून, या जातीय भेदभाव प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यासह अन्य दोघांना नोकरीतून काढून टाकण्याची वेळ आली. कुठे एकीकडे चंद्रावर घर करण्याची व मंगळावर पाणी शोधण्याची प्रगतता आणि दुसरीकडे ही असली वैचारिक दळभद्रीपणाची प्रकरणे?
म्हणूनच म्हणावेसे वाटते की, शारीरिक उंचीच्या अगर पद, पैसा व प्रतिष्ठेने मोजल्या जाणाऱ्या उंचीपेक्षा मानसिक, वैचारिक व बौद्धिक उंची वाढविण्याकडे लक्ष दिले जावयास हवे; पण ते तितकेसे होत नाही. शाळांमधील मूल्यशिक्षण परीक्षेपुरता उरले असून, घरातील आजी आजोबाही टीव्ही मालिकांमध्ये रमलेले दिसतात. मुला-नातवांना बोट धरून शिकवणार कोण? घरगड्यासही काका संबोधणारी व घरातील साफसफाई किंवा भांडे धुण्याच्या कामास असलेल्या भगिनीस काकू किंवा मावशी म्हणणारी मुलांची पिढी राहिली कुठे आता? एकुणात, शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातूनच सार्वत्रिक पातळीवरील विषमता दूर होऊ शकणारी असल्याने खरे तर याबाबतची उंची वाढविण्याकरिता गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.