प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)जगातील सर्वात नावाजलेली जर्मन आॅटोमोबाईल कंपनी फोक्सवॅगन सध्या विलक्षण अडचणीत आली आहे. वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंची चाचणी सरकारी संस्थेकडून होत असताना वाहन आपोआप कमी उत्सर्जन करेल आणि चाचणी झाल्यावर वाहनातून साधारण पद्धतीचे उत्सर्जन होईल, अशाप्रकारचे सॉफ्टवेअर कंपनीने गाड्यांमध्ये बसवल्याचे उघड झाल्यावर कंपनीची आणि पर्यायाने जर्मन उद्योगांची विश्वासार्हता कमी झाली आहे. कंपनीला अमेरिकेत १८००कोटी डॉलर्सचा जबरी दंड भरावा लागणार आहे. तिची सहयोगी कंपनी आॅडीही या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. फोक्सवॅगनने हे मान्य केले की त्यांच्या एक कोटीहून अधिक डिझेल कार्समध्ये हे सॉफ्टवेअर बसविले आहे. या घोटाळा प्रकरणी कंपनीचे माजी सीईओ मार्टिन विंटरकोर्न यांची चौकशी सुरू झाली असून हे प्रकरण उघड झाल्याला आता साधारण महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात कंपनीच्या नव्या कार्सची जगभरातली विक्री घसरली आहे. इतकेच नव्हे तर कंपनीच्या जुन्या व वापरलेल्या गाड्यांच्या बाजारपेठेतही घसरण झाली आहे. साहजिकच कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण होणे आणि त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसणेही क्रमप्राप्तच आहे. फोर्बसच्या वृत्तानुसार केवळ फोक्सवॅगनच नाही तर बीएमडब्ल्यू आणि डेम्लर यासारख्या इतर ब्रॅन्डसवरसुद्धा याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ‘फॉर्च्युन’मध्ये प्रकाशित नोएली एकले सेलीन यांच्या विश्लेषणानुसार फोक्सच्या फसवणुकीचे परिणाम केवळ आर्थिक स्वरुपाचेच नाहीत. त्यामुळे झालेले आर्थिक परिणाम तर गंभीर आहेतच पण त्यापेक्षाही या प्रकरणात अनेक वर्षे सदोष वाहने रस्त्यावरून बिनदिक्कत धावत राहिल्यामुळे झालेले पर्यावरणीय दुष्परिणाम अधिक गंभीर आणि दूरगामी स्वरूपाचे असणार आहेत. आपल्या लेखात सेलीन यांनी या फसवणुकीचा पर्यावरणीय अर्थ विशद केला आहे. नायट्रीक आॅक्साईड आणि नायट्रोजन डायआॅक्साईड यांच्या संयोगाने तयार होणारा अतिविषारी घटक श्वसनावर परिणाम घडवतो आणि वातावरणातल्या इतर प्रदूषित घटकांच्या बरोबर त्याचा संयोग झाला तर ते अधिकच घातक ठरते. आपल्या लेखात सेलीन यांनी याचा अत्यंत सविस्तर विचार केला आहे आणि फोक्सवॅगनच्या फसवणुकीमुळे पर्यावरणावर झालेला एकत्रित दुष्परिणाम किती असेल याचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते फोक्सवॅगनने पर्यावरणाचे केलेले अपरिमित नुकसान भरून यायला कित्येक दशके लागतील. कंपनीला झालेल्या दंडाच्या मानाने हे नुकसान प्रचंड मोठे असेल. शिवाय हे फक्त आपली बदमाषी मान्य करणाऱ्या एका मोठ्या कंपनीने सांगितलेल्या माहितीवर आधारलेले अनुमान आहे. अजून ज्यांनी आपल्या काळ्या कारनाम्यांबद्दल कुणाला काही सुगावा लागू दिलेला नाही, त्यांच्यामुळे नक्की किती नुकसान होते आहे याची माहिती उघड व्हायची आहे. औद्योगिकरणाची किंवा ज्याला प्रचलित परिभाषेत विकास असे म्हटले जाते, त्याची ही दुसरी काळी बाजू किती भयावह आहे याचे दर्शन सेलीन यांच्या विश्लेषणातून वाचायला मिळते. अमेरिकेतली किती माणसे या फसवणुकीमुळे मारली गेली अशा शीर्षकाचे मार्गोट संगर कात्झ आणि जॉन स्च्वार्त्झ यांनी केलेले एक विश्लेषण ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये वाचायला मिळते. त्याचे शीर्षक उघडच सनसनाटी स्वरूपाचे आहे. पण संपूर्ण विश्लेषण अत्यंत शास्त्रीय स्वरूपाचे आहे. आॅलिव्हर डेस्चेंस , जोसेफ शिपओ आणि माईकेल ग्रीनस्टोन या तिघांच्या चमूने केलेल्या पाहणीवर आधारलेले हे विश्लेषण खरे तर मुळातूनच वाचायला हवे. डिझेल कार्सचा वापर करण्यात कॅलिफोर्निया आघाडीवर असल्याने तिथे फोक्सच्या फसवणुकीचा पर्यावरणीय प्रभाव सर्वात जास्त जाणवणार आहे. कॅलिफोर्निया एअर रिसोर्स बोर्डाच्या अंदाजानुसार एका वर्षात प्रदूषणामुळे साधारणपणे ७२०० जणांचा अकाली मृत्यू होत असतो. राज्याची ७३ टक्के जनता किंवा अंदाजे दोन कोटी ऐंशी लाख लोक घातक पर्यावरण असणाऱ्या ठिकाणी राहतात. २००८पासून फोक्स लोकांची फसवणूक करीत आली आहे. या काळात ४६हजार टन प्रदूषित वायू तिने पर्यावरणात सोडला आहे. यावरून पर्यावरणाचा जो नाश कंपनीने केला त्याचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. कार्ल मॅथीसन आणि आॅर्थर नेस्लोन यांचे साधारण याच प्रकारचे विश्लेषण ‘गार्डियन’मध्येही प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी फोक्सच्या आजवरच्या फसवणुकीमुळे दहा लाख टन प्रदूषके निर्माण केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फोक्स आणि फियाटने निर्माण केलेले प्रदूषण लक्षात घेऊन त्या कंपन्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई करण्याचा आपला इरादा असल्याचे इटलीतल्या एका ग्राहक हक्क संघटनेने म्हटले आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांच्या गाड्यांच्या इंधनाच्या वापराची आणि कार्बन डाय आॅक्साईड उत्सर्जनाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे व त्या निष्कर्षांवर ही कारवाई आधारलेली असणार आहे.‘अल्ट्रोकॉन्सुमो’ने यासंदर्भात डिझेलगेट असा शब्दप्रयोग करून ग्राहकाना आवाहन केले आहे की त्यांनी या संदर्भात संघटनेने सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी व्हावे. फोक्सने आपल्या सदोष उत्पादनाबद्दल प्रत्येक ग्राहकाला नुकसानभरपाई दिली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. युरोपातील ग्राहकांच्या महासंघानेदेखील फोक्सच्या विरोधात अशीच मोहीम हाती घेतली आहे. ‘मॉनिक गोएन’ या संघटनेच्या महासंचालकांनी याबाबत एक पत्रक प्रकाशित केले असून त्यात ते म्हणतात की फोक्सच्या कृतीने जगभरातल्या ग्राहकांच्या उत्पादनावरच्या विश्वासाला जबरदस्त तडा गेला आहे. कार वापरणाऱ्या लाखो ग्राहकांच्या मनात विविध कंपन्यांबद्दल असंख्य प्रश्न आहेत. आमच्या मते फोक्सने या साऱ्या प्रश्नांची स्पष्ट आणि सत्य उत्तरे दिली पाहिजेत, तरच ग्राहकांचा उत्पादकांवरचा विश्वास पुन्हा निर्माण होईल. अमेरिका आणि युरोपसारख्या प्रगत बाजारपेठांमधल्या आघाडीच्या उत्पादकांच्या बदमाषीपुढे ग्राहक आणि सर्वसामान्य जनता कशी अगतिक होते आणि हे महाबलाढ्य उत्पादक कशाप्रकारे फसवणूक करतात हे जगासमोर येते आहे. भारतासारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उल्लू बनवणाऱ्या अनेक उत्पादक कंपन्या आहेत. अमेरिका आणि युरोप यांच्या मानाने इथल्या ग्राहकांमधले जागृतीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा स्थितीत आपल्या बाजारात आपण कसे आणि किती मोठ्या प्रमाणात फसवले जात असू याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
फोक्सवॅगनच्या बदमाषीकडे बघताना...
By admin | Published: October 16, 2015 10:06 PM