शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

दिसावे जनाचे, असावे मनाचे...

By admin | Published: January 31, 2017 5:04 AM

पवार पद्मविभूषण झाले. त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली. गेली ५० वर्षे ते महाराष्ट्राचे राजकारण करीत आहेत म्हणजे ते त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. चार वेळच्या मुख्यमंत्रिपदासह

पवार पद्मविभूषण झाले. त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली. गेली ५० वर्षे ते महाराष्ट्राचे राजकारण करीत आहेत म्हणजे ते त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले आहे. चार वेळच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्रातील अनेक मंत्रिपदे व लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद या साऱ्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते लोकांशी बोलतात, त्यांचे ऐकून घेतात आणि त्यांच्यात मिसळतात. म्हटले तर साऱ्या महाराष्ट्राला आपला वाटावा असा हा माणूस आहे. मात्र तो आपल्याला पुरता समजला आहे असे छातीठोकपणे सांगण्याची क्षमता एकाही मराठी माणसाजवळ नाही. साऱ्यात असायचे आणि तरीही त्यांच्यात नसायचे असे वागणे ज्या थोड्या नेत्यांना साधते त्यात पवार एक आहेत. आपल्या जवळच्या माणसांनाही आपला मनसुबा कळू न देण्याचे व त्यांच्यासकट साऱ्या महाराष्ट्राला संभ्रमात व तिष्ठत ठेवायचे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. तरीही लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्यावर ज्यांनी कधीकाळी राग धरला तेही त्यांच्याविषयी मनात ममत्व राखतात आणि त्यांच्या पक्षाएवढेच त्यांना विरोध करणाऱ्या पक्षातही त्यांचे चाहते असतात ही त्यांना साधलेली किमया आहे. उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे यांचे ते काका असतात. त्या दोघांनी ज्यांच्याशी आता वैर धरले आहे त्या फडणवीसांचे ते तारणहार असतात. काँग्रेस पक्षाशी त्यांची भाऊबंदकी असते. पण त्या पक्षाशी त्यांना आघाडीही जुळविता येते. मोदी त्यांच्याकडे येतात आणि फारुख अब्दुल्लाही त्यांचे मित्र असतात. संघातली माणसे त्यांच्याविषयी कधी बोलत नाहीत, पण बोललीच तर तीही त्यांच्याविषयी बरेच बोलतील याची शक्यता मोठी आहे. कारण पवार केव्हा कुणाच्या कामी पडतील आणि कधी कोणाची साथ, निर्वैर राहून सोडतील याचा भरवसा नाही. त्यांनी यशवंतरावांचे नेतृत्व स्वीकारले, पुलोदचे नेतृत्व केले, काँग्रेसच्या मंत्रिमंडळातली मोठी पदे भूषविली आणि वाजपेयींनीही त्यांना महत्त्वाची स्थाने दिली. देशात कधीकाळी सर्वपक्षीय सरकार आलेच तर त्याचे नेतृत्व त्यांच्याचकडे यावे असे त्यांचे आजवरचे राजकीय व्यक्तिमत्त्व राहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांशी उघड पंगा घेतल्यानंतरचे व राज्यातील भाजपा-सेना युती तोडल्यानंतरचे पवारांचे वक्तव्य या संदर्भात बरेच काही सांगणारे व त्यांच्या काहीशा संशयास्पद व अविश्वसनीय आणि तरीही हव्याशा वाटाव्या अशा राजकारणाचे अधोरेखन करणारे आहे. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर फडणवीसांचे सरकार अल्पमतात येणार आहे. काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देण्याची जराही शक्यता नाही. या स्थितीत फडणवीसांना नव्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार हे उघड आहे. मात्र तसे त्यांना करावे लागणार नाही याची शक्यताही शरद पवार हीच आहे. फडणवीसांचे सरकार सत्तेवर येत असताना सेनेने बराच काळ खळखळ करून त्यांच्यापासून दूर राहण्याच्या व त्याच्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पवारांनी फडणवीसांना अभय देत ‘ते नसले तरी मी आहे’ असे म्हणून दिलासा दिला होता. परिणामी बहुमत नसतानाही फडणवीसांचे सरकार सत्तारूढ झाले आणि पवार त्याचे पाठीराखे बनले. सेनेच्या आताच्या दुराव्यामुळे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार व पवारांच्या बळावर फडणवीस सत्तेत टिकणार असेच साऱ्यांना वाटत आहे. मात्र फडणवीसांनाही तसा विश्वास वाटू दिला तर मग ते पवार कसले? त्यांनी साऱ्यांनाच संभ्रमात ठेवणारे व त्यांच्या प्रकृतीला साजेसेच वक्तव्य यासंदर्भात केले आहे. ‘या स्थितीत फडणवीसांना नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील अशी शक्यता आहे’ असे ज्या दमात त्यांनी सांगितले त्याच दमात ‘या स्थितीत त्यांना आम्ही पाठिंबा द्यायचा की नाही हे आमच्या पक्षात बसून ठरवू’, असेही म्हणून टाकले. परिणामी पवार मुक्त, सेना लोंबकळणारी आणि फडणवीस वाट पाहणारे. फडणवीसांना पाठिंबा देणाऱ्या अन्य बारक्या पक्षांची स्थिती तर आणखीच केविलवाणी. ही अवस्था काँग्रेससारख्या अखिल भारतीय पक्षालाही संभ्रमात टाकणारी व ताटकळत ठेवणारी आहे. राज्यातील शहाणी म्हणविणारी माध्यमे व त्यांचे संपादक यांनाही पवारांना नेमके काय हवे हे सांगता येणे अवघड करणारे हे राजकारण आहे. यशवंतरावांच्या काळापासून मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात सामील होईपर्यंत व पुढे मोदींच्या बारामतीला येण्यापासून तर मोदी सरकारने त्यांना दिलेल्या राष्ट्रीय सन्मानापर्यंतचे सारेच इतरांना गौडबंगाल वाटावे असे आहे. हा सारा पवारांच्या चर्येवरचे नित्याचे स्मित कायम ठेवणारा घटनाक्रम आहे. हे स्मित म्हटले तर प्रसन्न आणि म्हटले तर गूढ वाटावे असेही आहे. अशी किमया फक्त पवारांनाच जमते आणि त्यांना ते जमते हे ठाऊक असल्याने त्यांच्या जवळ असणारेही त्यांच्याबाबत सावध असतात. मात्र अशांची सावधानता हिरावून घेण्याचेही एक जास्तीचे कसब पवारांमध्ये आहे. तात्पर्य, ते साऱ्यांचे दिसतात पण फक्त स्वत:चे असतात. तरीही त्यांचे स्वत: असणेच एवढे व्यापक व मोठे की त्यातच आपणही समाविष्ट आहोत असे अनेकांना वाटत असते. असो, पवारांना सदिच्छा आणि फडणवीसांच्या भवितव्यालाही शुभेच्छा.