प्रसाद शिरगावकर, मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षक
नव्या डिजिटल युगातल्या लूटमारीचा एक नवा प्रकार सध्या प्रचंड वेगाने फोफावतो आहे. अनेकांचा त्यात बळी पडतो आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन येतो. पोस्ट ऑफिस, फेडेक्स कुरिअर किंवा कस्टम्स ऑफिसमधून बोलतोय, असं सांगितलं जातं. ‘तुम्ही पाठवलेल्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज, शस्त्रं (किंवा तत्सम बेकायदेशीर) काहीतरी होतं, ते आम्ही पकडलंय’, असं सांगितलं जातं. आपण असं काही पाठवलंच नाही हे सांगायचा प्रयत्न केला तरी ते ऐकून घेत नाहीत. आपलं नाव, पत्ता किंवा इतर काही (कोणालाही सहज उपलब्ध होऊ शकतील असे) तपशील सांगून ते आपल्याला फोनवर अडकवून ठेवतात. मग पुढे ‘तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तासाभरात ‘कोलकता / लखनौ / चेन्नई’ मधल्या (थोडक्यात भलत्याच कोणत्या शहरातल्या) पोलिस ठाण्यामध्ये येऊन सांगा’, असं सांगतात.
आपण अर्थातच जाऊ शकणार नसतो. मग ते सांगतात, ‘तुमची जबानी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट करतो आहोत.’ मग ते व्हिडीओ कॉल लावतात. ‘ही डिजिटल अरेस्ट आहे, तुमच्या मॅटरचा निकाल लागेपर्यंत व्हिडीओ चालूच ठेवावा लागेल. बंद केलात तर तुमच्या लोकल पोलिस ठाण्याला आम्ही कळवू आणि ते घरी येऊन खरी अटक करतील’, अशी भीती घातली जाते. पुढचे काही तास व्हिडीओ कॉलवर अडकवून ठेवतात, वेगवेगळे प्रश्न विचारून मानसिक छळ करत राहतात. यातून सोडविण्यासाठी पैशांची मागणी करतात आणि त्या छळाला कंटाळलेले लोक हजारो-लाखो रुपये त्यांना देऊन यातून आपली सुटका करून घेतात.
ही नव्या लूटमारीची सर्वसाधारण पद्धत. तपशिलात बदल होतात. ‘तुमचा फोन बेकायदेशीर कामांसाठी वापरला आहे, तुमचा मुलगा/मुलगी बेकायदेशीर काम करताना पकडला गेला आहे किंवा तुमच्या नावाने कोण्या अतिरेकी संघटनेने मोठे फंड्स पाठवलेत, ते आम्ही पकडलेत’, असं काहीही सांगितलं जातं. हे सांगणारे लोक आम्ही कस्टम्स, ईडी, सीआयडी, इन्कम टॅक्सवाले आहोत, अशी काहीही बतावणी करतात. आवाजात जरब ठेवून बोलतात. व्हिडीओ कॉल लावला असेल तर त्यात सरकारी कार्यालयातून बोलताना दिसतील, असा सर्व सेट लावलेला असतो. बोलणाऱ्याने अगदी सरकारी वाटेल असा गणवेशही घातलेला असतो. सर्वसामान्य पापभिरू माणूस ‘हे कसलं भलतंच लचांड आपल्या मागे लागलं आहे’, असं समजून, मानसिक छळाला वैतागून किंवा उगाच अटक-कोर्टकचेऱ्या करायला लागतील, ह्याला घाबरून ते दरोडेखोर मागतील ती रक्कम त्यांना देऊन स्वतःची सुटका करून घेतो.
अशा प्रकारची लूटमार आपल्याबाबतीत होऊ नये म्हणून आपण काय करावं हे जाणून घेऊया.
अनोळखी नंबरवरून आलेला कॉल नेमका कोणाचा असू शकतो, हे ओळखण्यासाठी ‘कॉलर आयडी’ ॲप वापरावं. ते वापरलं तर अनोळखी नंबरवरून आलेला फोन हा स्पॅम किंवा स्कॅम करणाऱ्या कोणाचा आहे का? हे (साधारणत:) समजू शकतं आणि तो कॉल उचलायचा नाही, असं ठरवू शकतो. उचलला तरी काळजीपूर्वक बोलू शकतो. अर्थात हे डिजिटल दरोडेखोर हुशार असतात, ते सतत नवे नंबर घेऊन फोन करत असतात, अनेकदा ते ट्रू कॉलरमध्ये सापडत नाहीत. हे लक्षात ठेवून कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर नेहमीच अत्यंत सतर्कपणे बोलणं महत्त्वाचं असतं. आपण न केलेल्या कृत्याबद्दल आपल्या मागे लागायला भारतीय प्रशासकीय आणि न्याय व्यवस्थेतल्या कोणालाही वेळ आणि रस नसतो. खरोखर आपण काही बेकायदेशीर केलं असेल अथवा पोलिस-प्रशासन यापैकी कोणालाही तसा संशय असेल तर ते थेट घरी येऊन चौकशी-अटक करतात. ‘डिजिटल अटक’ करण्याचं कोणतंही कलम भारतीय दंड संहितेत नाही. ‘व्हिडीओ सुरू करून समोर बसून रहा’ असं सांगणारी लुटुपुटुची अटक आपल्या कायद्यात कुठेही नाही.
नव्या युगातले दरोडेखोर डिजिटल माध्यमांचा वापर करून दरोडे घालण्याच्या, लूटमार करण्याच्या नवनव्या पद्धती सतत शोधत राहतात. ज्याला लुटायचं आहे त्याला कशाची तरी प्रचंड भीती घालणं किंवा लालूच दाखवून मोहात पाडणं ही त्यांची दोन मुख्य हत्यारं असतात. स्वतःचा बचाव करण्याचे दोन मुख्य मार्ग आपल्या हातात असतात. पहिला म्हणजे ‘कॉलर आयडी’ सारखं तंत्रज्ञान वापरून या दरोडेखोरांना आपल्यापर्यंत पोहोचू न देणं. दुसरा म्हणजे कोणत्याही अनोळखी नंबरवरील कॉलवर बोलताना सदैव सतर्क, सजग राहणं. आपल्या देशातल्या कायद्यांविषयी मूलभूत माहिती असणं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपण न केलेल्या कृत्यांबद्दल उगाचच अपराधी न वाटणं अन् त्याची भीती न वाटणं. सदैव सजग आणि सतर्क राहून आपल्या मनातल्या लोभ आणि भीतीवर मात करत राहणं हाच या डिजिटल दरोडेखोरांना बळी न पडण्याचा राजमार्ग आहे.
prasad@aadii.net