मागील एक आठवड्यापासून विदर्भात पावसाचा चांगलाच जोर आहे. धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले. हजारो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. सुरुवातीला दडी मारणाऱ्या पावसाने आता कास्तकाराच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६१ हजार ९३० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर चंद्रपुरात ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. ३०० जनावरे दगावली. ४०० हून अधिक घरांची पडझड झाली. सहा लोक पावसाचे बळी ठरल आहे. तर आशिया खंडातील मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये समावेश होत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाण्याअभावी घरघर लागली होती. आता संततधार पावसामुळे ही काळजी मिटली असली तरी ओल्या कोळशाचे नवीन संकट या प्रकल्पापुढे उभे ठाकले आहे. ही समस्या दर वर्षी निर्माण होत असली तरी वीज केंद्र व्यवस्थापन कोळसा साठवून ठेवण्यासाठी योग्य नियोजन करीत नाही. नऊपैकी सात संचांतून केवळ १२८३ मेगावॅट वीजनिर्मिती सध्या सुरू असल्याने ही बाब राज्याच्या वीज संकटात भर टाकणारी आहे. दुसरीकडे अनेक प्रकल्प १०० टक्के भरले असून काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. पावसामुळे संकटातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसून उलट पिकांना संजीवनी मिळाली आहे. हजारो हेक्टर धान शेतीला या पावसाने तारले आहे. त्यामुळे या भागातील कास्तकार सुखावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हा पाऊस लाभदायी ठरला आहे तर दक्षिण गडचिरोलीमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले. त्यामुळे धानासह कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने परिवहनाची समस्या निर्माण झाली. मागील तीन दिवसांपासून येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. आता झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण होण्याची वाट शेतकरी बघत आहेत. शासनाच्या मदतीचीही त्याला आस आहे. मात्र नेहमीप्रमाणे त्याला ती मिळेल की नाही, हा खरा प्रश्न आहे.
दिलासा आणि फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 6:26 AM