>> मिलिंद कुलकर्णी
पूर्वीचा जनसंघ आणि आताची भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील एक घटक आहे हे एक खुले गुपित आहे. पूर्वी संघ आणि भाजपा हे दोघेही अशा संबंधाचा ठामपणे इन्कार करीत असत. दोघांचे विचार एक असले तरी दोन स्वतंत्र संस्था आणि कार्यपद्धती असल्याचे सांगितले जाई. राम मंदिर आंदोलनानंतर हे संबंध अधिक उघड झाले आणि भाजपा केंद्र व राज्य सरकारमध्ये आल्यानंतर हे संबंध लपविण्याची आवश्यकतादेखील भासली नाही.
संघाचे प्रचारक हे भाजपामध्ये संघटन कार्याची जबाबदारी सांभाळण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांची ही प्रथा आहे. संघ कार्यकर्त्यांचा चारित्र्य, शिस्त आणि संघटन कार्यात नावलौकिक आहे. हे गुण भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेत, असा प्रयत्न दोन्ही संघटनांचा असतो. पण तसे घडतेच असे नाही. संघाच्या उत्सवाला संपूर्ण गणवेशात सहभागी होणारे भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते दैनंदिन जीवनात कसे वागतात, याचा अनुभव पक्ष कार्यकर्ते आणि सामान्य जनता घेत असतेच.
अलिकडे भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीची कामक्रीडा छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने फिरत आहे. या छायाचित्रांमुळे लोकप्रतिनिधीचे लोकसभा निवडणुकीतील तिकीट धोक्यात आल्याची चर्चा आहे. बंद खोलीत खाजगी जीवनात घडलेल्या या प्रकाराची छायाचित्रे निघतात आणि ती निवडणुकीच्या तोंडावर प्रसारीत होतात, यावरुन पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घडविलेले हे कृत्य असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने समाजमाध्यमाचा आधार घेत या छायाचित्रांचा तपशील सांगत लोकप्रतिनिधीला फसविण्याचा प्रयत्न असल्याची शंका घेतली आहे. लोकप्रतिनिधीचे डोळे बंद आहेत, याचा अर्थ गुंगीचे औषध देऊन त्यांचे सोयीस्कर छायाचित्रे घेण्यात आल्याचा दावा देखील या कार्यकर्त्याने निवेदनात केला आहे.
या लोकप्रतिनिधीने घेतलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वत:चा बचाव करताना सांगितले की, दोनवेळा लोकप्रतिनिधी झाल्याने आणि तिसऱ्यांदा निवडून येण्याचा ठाम विश्वास असल्याने मंत्रिपद निश्चित आहे. त्यामुळेच हितशत्रूंनी हे षडयंत्र रचले आहे. मात्र पक्षांतर्गत की, पक्षाबाहेरील मंडळींचे हे कृत्य आहे, याविषयी त्यांनी स्पष्टपणे बोलण्याचे टाळले आहे. मंत्री व जिल्हाध्यक्षांनी मात्र या छायाचित्रांची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या काही विचारवंत, अभ्यासक आणि पत्रकारांनी या लोकप्रतिनिधीची बाजू उचलून धरली आहे. खाजगी जीवनात चार भिंतीत दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाल्यास त्याचा एवढा गवगवा का? हा सवाल रास्त आहे. पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीने किमान चारित्र्यवान असावे, ही अपेक्षा चुकीची आहे काय, हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. साधनशुचितेचा आग्रह धरणाऱ्या भाजपाच्या लोकप्रतिनिधीकडून निश्चितच ही अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. अर्थात अलिकडे भाजपाचे कमळ चिखलात फुलत असले तरी नेते आणि कार्यकर्त्यांचे पाय देखील चिखलात रुतू लागले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
स्व.वाय.जी.महाजन आणि एम.के.पाटील या दोन खासदारांविरुद्ध संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे स्टिंग ऑपरेशन गाजले होते. दोघांचे संसदसदस्यत्व रद्द करण्यात आले होते. भाजपाचे जळगावातील लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील यांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांनाही लाच घेताना पकडण्यात आले होते.
त्यामुळे सत्ता आली की, सत्तेची संगत भल्या भल्यांना बिघडविते हे भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या कृत्यावरुन दिसून आले. संघ मात्र यातून नामानिराळा राहत आहे. ‘स्वयंसेवक नापास झाला ’ असे म्हणून ते त्यांची सुटका करुन घेत आहे. शतप्रतिशत सत्ता आली तरी साधनशुचिता, विचार याला हरताळ फासला गेला तर स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे म्हणण्याचा अधिकार भाजपाला पोहोचतो तरी काय? हे तरी एकदा स्पष्ट होऊन जाऊ द्या.