- गजानन दिवाण ( उप वृत्तसंपादक )
दैव मानायचे की नाही, हा ज्याचा त्याचा भाग. पण काही गोष्टी काहीही न करता मिळतात त्याला काय म्हणायचे? बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे त्यातलेच एक. अतिशय प्राचीन असलेल्या या गोलाकार सरोवराची निर्मीती उल्कापातापासून झाली आहे. लोणार सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांच्या १६० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४६, तर प्राण्यांच्या १२ प्रजाती आढळतात. त्याचे संवर्धन व्हावे म्हणून ८ जून २००० रोजी लोणार अभयारण्याची निर्मीती करण्यात आली. या सरोवराची खोली सरासरी १३७ मीटर असून व्यास १.८० किलोमीटर आहे. त्याचे क्षेत्र ११३ हेक्टर आहे. हे सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोणार सरोवरावर विशेष प्रेम आहे. ‘महाराष्ट्र देशा’ या त्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लोणार सरोवराचेच छायाचित्र आहे. २००४ साली उद्धव ठाकरे यांनी एक दिवस या सरोवराच्या परिसरात घालविला होता. तेव्हापासून ते या सरोवराच्या प्रेमात पडले, अशी आठवण लोणार सरोवराची लढाई लढणारे जी. जे. खरात आजही सांगतात. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातच ही घोषणा व्हावी, याला त्यामुळेच वेगळे महत्त्व आहे.
या सरोवराच्या अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. अशा प्राचीन सरोवराच्या समस्यादेखील आता तेवढ्याचा प्राचीन होत आहेत. म्हणजे अनेक सरकारे आली, आश्वासने मिळाली. पण, प्रश्नांना हात लागला नाही. या सरोवरात लोणार या गावाचे सांडपाणी जाते. त्यामुळे सरोवरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या सरोवरामध्ये वेडी बाभूळ वेडीवाकडी वाढली आहे. आपल्या राज्यात रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम केले जाते, तसे येथे या बाभळी काढण्याचे काम होते. पुढचा खड्डा बुजवेपर्यंत मागचा खड्डा पुन्हा तयार. त्याच त्या बाभळी पुन्हा पुन्हा तोडण्याचे काम येथे केले जात आहे. ठराविक क्षेत्र घेऊन तेवढ्याच बाभळींचे समूळ उच्चाटन करणे प्रशासनाने जमले नाही किंवा त्यांना तसे करायचेच नाही. आता या बाभळींच्या सरोवरावरील मायेने आणखी एक अडचण वाढविली आहे. अनेक वर्षांचा सहवास लाभल्याने येथील पक्षी-प्राण्यांनीही या बाभळींना स्वीकारले आहे. त्यामुळे पुढे चालून या बाभळी नष्ट केल्याच, तर जैवविविधतेला धोका पाहोचतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जे वेड्या बाभळीचे तेच मंठा रस्त्याचेदेखील. सतत वर्दळ असलेला हा रस्ता जंगलातून म्हणजे सरोवराच्या परिसरातून जातो. त्यामुळे मंठा बायपास करावा ही मागणी अनेक वर्षांपासून तशीच पडून आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेली मोकळी जमीन न्यायालयाच्या निर्देशानुसार मोकळी करण्यात आली आहे. आता याठिकाणी सरोवराचे संवर्धन आणि पर्यटन यासाठीची कार्यालये उघडली जाणार आहेत. त्यातही भीती आहेच. पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांच्या मागे लागून संवर्धनाला बाधा येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. प्रश्नांची यादी तर भली मोठी आहे. लोणार सरोवर विशेष प्रेम असलेल्या या सरकारने सुरुवातीला एवढे तीन प्रश्न सोडविले तरी मिळविले. या प्रेमाचे सरोवरात मोठ्या संख्येने पसरलेल्या वेड्या बाभळीसारखे होऊ नये. म्हणजे ही बाभूळ आता वाढली तर सरोवराची चिंता आणि नाही वाढली तरीही जैवविविधतेची चिंता !