- ब्रह्मविहारीदास स्वामी(बीएपीएस, स्वामीनारायण संस्था)
जगासमोर अनेक प्रश्न असतात. यांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी आपलीच आहे. योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता व हिंमत असते, तेव्हाच कुठल्याही समस्येवर उत्तर मिळू शकते. बहुतांश वेळी लोक योग्य प्रश्न विचारत नाहीत. यासंदर्भात मी आस्तिक व नास्तिक व्यक्तीतील संवाद तुमच्यासमोर मांडू इच्छितो. योग्य उत्तरे कशी सापडू शकतात, हे या संवादातून तुमच्या लक्षात येईल. एकदा दोन मित्रांमध्ये गप्पा सुरू असतात. एक आस्तिक. देवाचा निस्सीम भक्त. तर दुसरा नास्तिक. देवावर अजिबात विश्वास नसलेला. गप्पांच्या ओघात नास्तिक मित्र आस्तिकाला विचारतो, ‘आपण या पृथ्वीवर कधीपासून आहोत हे तू सांगू शकतोस का? हजार, दोन हजार, तीन हजार, पाच हजार, नेमकी किती वर्षे झाली आणि किती वर्षांपासून जगात धर्माचे अस्तित्व आहे?’
आस्तिक मित्र म्हणतो, ‘धर्म व देव हा तर अनादी काळापासून अस्तित्त्वात आहे’. लगेच नास्तिक मित्र प्रतिप्रश्न करतो ‘मित्रा, जर धर्म अनादी काळापासून आहे तर मग जगात युद्ध, हिंसा का होत आहेत? द्वेष, गुन्हे, धार्मिक भेदभाव अजून का शिल्लक आहेत? असे आहे तर मग या जगाला देवाचा, धर्माचा उपयोगच काय ?’
काय उत्तर द्यावे, हे आस्तिकाला सुचत नाही. तो गप्प बसतो. गप्पा मारता मारता ते दोघे एका गल्लीत शिरतात. गल्लीत मुलांचा खेळ रंगात आलेला असतो. चिखलात लडबडलेल्या मुलांना कसले भानच नसते. ते पाहून आस्तिक मित्र नास्तिकाला विचारतो, ‘आपल्या पृथ्वीवर किती काळापासून साबण आहे? साबणाचा शोध पाच हजार वर्षांपूर्वी लागला. जर इतक्या काळापासून साबण अस्तित्त्वात आहे तर मग ही मुले अशी मळलेली, चिखलाने माखलेली कशी?’ नास्तिक म्हणतो, ‘कारण त्यांनी साबण मुळी वापरलेलाच नाही’.
आस्तिक हसून म्हणतो, “आता मिळाले तुझ्या प्रश्नाचे उत्तर? जगात द्वेष, हिंसा आहे; युध्दे पेटतात; कारण लोक धर्म व अध्यात्माचा उपयोगच करत नाहीत.’अनेकदा आपण संकुचित मनोवृत्तीतून धर्म, अध्यात्म या गोष्टींची हेटाळणी करतो. अकारण आणि अनावश्यक वाद निर्माण होतात. पण, जर धर्म व अध्यात्म योग्य दिशेने प्रत्यक्ष वापरात आणले गेले, तर जगात शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. जागतिक सौहार्द हे स्वप्न नव्हे, वास्तव होऊ शकते.एक धार्मिक व्यक्ती किंवा नेतृत्व बरेच काही करू शकते. आणीबाणीच्या प्रसंगी संभ्रमित समाजाला दिशा देऊ शकते. २००२ साली धर्माच्या नावाखाली दंगलीच्या आगीत गुजरात अक्षरश: जळत होता. एखादे अनुचित चुकीचे वक्तव्यदेखील आगीत तेल ओतेल अशी नाजूक परिस्थिती होती. अशा स्थितीत अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ला झाला. समाजमन प्रक्षुब्ध झाले होते.
न्याय, बदला आणि प्रतिहल्ल्याची भाषा सुरु झाली होती. परंतु प्रमुख स्वामी महाराज यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. मी त्या मंदिरातच होतो. स्वामी महाराजांनी मला सांगितले, तुझ्या नजरेत एकही अश्रू दिसता कामा नये. क्षमा हा आपला मार्ग आहे, बदला नाही! आम्ही त्या मार्गानेच गेलो आणि हिंसेच्या हल्ल्याला क्षमेने उत्तर देण्याची ही रीत पुढे “अक्षरधाम रिस्पॉन्स मॉडेल” म्हणून प्रसिद्ध झाली. सामाजिक जीवनातच नव्हे, वैयक्तिक जीवनातही हा क्षमेचा मार्ग वापरून पाहा! अनेक किचकट गुंते सहज उलगडताना अनुभवास येतील.
अध्यात्मातून समाजात शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. धार्मिक आचार्यांचा समाजात मोठा प्रभाव असतो. मोठ्या प्रभावातून मोठी जबाबदारीदेखील येते. हे धर्माचार्य जे जाहीर मंचावर बोलतात तेच त्यांनी आपल्या अनुयायांसमोर म्हटले, बोलणे कृतीत व हृदयातदेखील उतरवले; तरी जगातले बहुसंख्य तंटे सुटतील. जगात सौहार्द राहावे, अशी इच्छा धरणारे लोक अनेकदा म्हणतात, मानवता हा एकच धर्म आहे. आपण सारी एकाच इश्वराची लेकरे आहोत.
मला एक कळत नाही, हा सगळ्यांनी एकच, एकसारखेच असण्याचा अट्टाहास का करतो आपण? आपण समानतेचा आग्रह धरताना विविधतेचा सन्मान करणे कधी शिकणार? सौहार्दाने एकत्र राहण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांसारखेच असणे ही काही पूर्वअट आहे का? आपण सारे एकसारखे नाही, आपले दिसणे - आचार - विचार एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, हीच तर जीवनाची खरी रससिध्दता आहे. देवालाही विविधताच आवडते. नाहीतर इतके रंग, इतक्या चवी, इतके आकार - प्रकार त्याने कशाला निर्माण केले असते? देवाला जर समानता आवडत असती तर जगात एकाच रंगाचे व सुगंधाचे फुल असते, नाही का?विचारी, बुध्दिवादी माणसे या विविधतेचा सन्मानच करतात. सगळ्यांनी “एकसारखेच” असायला हवे, हा आग्रह हे आळशी, विचारशून्य माणसाचे लक्षण आहे.सामाजिक सौहार्दासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी लागतात : लव्ह, लॉ आणि लाईफ ! सर्वांप्रति, जीवनाप्रति परंपार प्रेम हवे... या प्रेमाच्या आधाराने सर्वांना परस्पराप्रतिचे सौहार्द टिकवून राहायला मदत करतील, असे कायदे हवेत आणि या जगात “जीवनापेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नाही”, याची जाणीव हवी!- हे सारे स्वप्नवत आणि भोंगळ आशावादी वाटते का? असेलही कदाचित ! पण माणसाने चंद्रावर पाऊल ठेवावे, हेही दीर्घकाळ स्वप्नच तर होते! कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, याची खात्री वाटावी, असे अप्राप्य स्वप्न ! - पण ते शेवटी सत्यात उतरलेच!
जगात सामाजिक सौहार्द असावे, हे आज स्वप्न वाटेल. ते तसे आहेही! परंतु ते निश्चित पूर्ण होईल, हा विश्वास धरायला काय हरकत आहे? सौहार्दासाठी आवश्यक नियम व कायदे निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी पोषक अशी जीवनशैली विकसित झाली पाहिजे. प्रेमाचा प्रसार, नियमांचे पालन व योग्य जीवनशैलीचा विकास यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न केले, तर जागतिक सामाजिक सौहार्द हे स्वप्न उरणार नाही.
(शब्दांकन : योगेश पांडे, नागपूर)