निष्ठावान नेते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:28 AM2019-01-15T00:28:45+5:302019-01-15T00:29:42+5:30
उच्चशिक्षित, मृदुभाषिक आणि प्रशासनावर पकड असलेले शिवाजीराव देशमुख यांनी विधानसभेत १८ वर्ष शिराळ्याचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे विविध खात्यांवर मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘डोंगराळ भाग विकास निधी’, म्हैसाळ पाणी उपसा योजनेचे ते जनक आहेत.
- वसंत भोसले
उच्चशिक्षित, मृदुभाषिक आणि प्रशासनावर पकड असलेले शिवाजीराव देशमुख यांनी विधानसभेत १८ वर्ष शिराळ्याचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे विविध खात्यांवर मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘डोंगराळ भाग विकास निधी’, म्हैसाळ पाणी उपसा योजनेचे ते जनक आहेत.
महाराष्ट्राच्या काँग्रेसी राजकारणाची एक ‘निष्ठावान परंपरा’ आहे. त्या परंपरेत अनेक कार्यकर्ते घडले. ते नेते झाले. त्यांनी राज्यकर्ते म्हणून व्यापक भूमिका बजावली. यातील अनेक नेते गावच्या सरपंचपदापासून राज्य मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले. त्यांची काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा आणि सर्वसमावेशक समाजकार्य करीत राजकारण साधणारी होती. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुढे असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे नाव कायम आघाडीवर होते.
उच्चशिक्षित, मृदुभाषिक आणि प्रशासनावर पकड असलेले शिवाजीराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने १९७८ मध्ये सुरू झाली. प्रशासनात अधिकारी पदावर काम करणारे कोकरूडच्या देशमुख घराण्याचे शिवाजीराव देशमुख १९७८ मध्ये प्रथम अपक्ष म्हणून सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून सलग अठरा वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यापैकी अकरा वर्षे त्यांनी बहुतेक सर्व महत्त्वाच्या खात्यांवर मंत्री म्हणून ठसा उमटविला. १९९५ मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी असताना त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर सलग अठरा वर्षे ते विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करीत होते. अशी एकूण ३८ वर्षे त्यांनी विधिमंडळात काम केले.
काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते ते नेते हा प्रवास होता. मृदुभाषिक होतेच; मात्र प्रशासनावर समन्वयातून वचक होता. सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनावर विश्वास टाकून काम करणे, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदर्शयुक्त वागणूक देण्याचा त्यांचा स्वभाव विरळाच होता. त्यांनी सत्तेची भाषा कधी वापरली नाही. काँग्रेस पक्षाशीही निष्ठा हा त्यांचा राजकारणाचा गाभा होता. वसंतदादा पाटील यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सांगली जिल्ह्याचे राजकारण अनेक वर्षे हाताळले होते.
शिराळा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करीत होते. तो सर्व भाग डोंगराळ असल्याने त्याचे अनेक प्रश्न वेगळे होते. अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील डोंगराळ तालुक्यासाठी ‘डोंगराळ भाग विकास निधी’ची मागणी त्यांनी अनेकवेळा केली. त्यासाठी डोंगराळ परिसरात परिषदा घेतल्या. राज्य मंत्रिमंडळात येताच या भागांना वेगळ्या पातळीवर निकष ठरवून रस्ते, रुग्णालये, शाळा, विद्यालये, आदींसाठी खास निधी देण्याची तरतूद केली. परिणामी शिराळ्यासह अनेक सह्याद्री पर्वतरांगांतील तालुक्यांचा कायापालट झाला. उत्तम रस्ते झाले. शाळा उभारल्या, ओढ्या नाल्यांवर साकव बांधले गेले. रुग्णालये झाली.
शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यांना जोडणाºया वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या पूर्ततेसाठीही त्यांनी अपार कष्ट घेतले. या धरणामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांना आधार दिला. या धरणग्रस्तांसाठी मदत करणारा दुवा म्हणून त्यांनी मंत्रालयात काम केले.
वारणा नदीवरील धरणाची पूर्तता होताच उपलब्ध पाणी सांगली जिल्ह्याच्या पूर्वभागात देण्याची ताकारी उपसायोजना वसंतदादा पाटील यांनी मांडली. त्याची सुरुवात झाली; मात्र सांगलीच्या पूर्व भागाच्या मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्याला याचा लाभ होणार नव्हता. तेव्हा पाटबंधारे खात्याची जबाबदारी शिवाजीराव देशमुख यांच्याकडे होती. या भागातही पाणी देण्याची इच्छा वसंतदादा पाटील यांनी व्यक्त करताच देशमुख साहेबांनी म्हैसाळ येथून पाणी उपसा करून देणारी योजना तयार केली. ज्या दिवशी ही योजना तयार होत आली त्याच दिवशी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर राजीनामा देणार होते. ही बातमी समजताच देशमुखसाहेब यांनी मंत्रालय गाठून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला अंतिम रूप देऊन टाकले. ही त्यांची तत्परता पुढे फळास आली आणि आज म्हैसाळ योजनेचा लाभ पूर्व भागाला होतो आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाली. तो कालखंड पक्षासाठी कठीण होता. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला होता. त्याच कालावधीत शिवाजीराव देशमुख यांचे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नावही होते. मात्र, त्यासाठी कुरघोड्यांचे राजकारण त्यांनी कधी केले नाही, किंबहुना संधी हुकली म्हणून पक्षावर नाराजी व्यक्त केली नाही. पुढे त्यांना विधानपरिषदेचे सभापतिपद मिळाले. सरकार सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात उत्तम समन्वय साधणारे ज्येष्ठत्तम व्यक्ती म्हणून त्यांनी उत्तम भूमिका बजावली. संसदीय व्यवहाराचे सर्व संकेत पाळल्याने त्यांच्या एक तपाच्या सभापतिपदाच्या काळात वादाचे किंवा संघर्षाचे प्रसंग कधी आले नाहीत.
सांगली जिल्ह्याला खूप मोठी राजकीय परंपरा लाभली आहे. त्या परंपरेला समृद्ध करणारे नेते म्हणून शिवाजीराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले पाहिजे. त्यांनी आपल्या संयमी वृत्तीने कायम आदराने ही परंपरा सांभाळली. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या प्रतिभासंपन्न छायेत वाढलेले हे नेतृत्व होते. त्या परंपरेत देशमुख साहेबांच्या राजकीय वाटचालीने भरच घातली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!