- किरण अग्रवाल
जनावरांवरील लम्पी रोगामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे, त्याचसोबत गावोगावी पशुचिकित्सकांची उपलब्धता होईल हे बघणे गरजेचे आहे. संसर्ग वाढण्यापूर्वीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
कोणतेही संकट हे त्रासदायीच असते हे खरे, पण भविष्याच्यादृष्टीने ते धडा देऊन जाणारेही असते. कोरोनाच्या बिमारीतून मनुष्य बाहेर पडत नाही तोच ‘लम्पी’च्या लपेट्यात पशुधन आल्याने बळीराजाची चिंता वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे, कारण यानिमित्ताने पशुवैद्यक क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष व त्यातील उणिवा उजागर होत आहेत.
कोरोनाच्या संकटाने जनजीवन धास्तावले होते, तसे ‘लम्पी’मुळे शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा खरा सोबती बैल असो, की दूध दुभत्या गायी-म्हशी; गोठ्यातील या जनावरांकडे पशुधन म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. हे पशुधनच लम्पीमुळे धोक्यात आले आहे. जनावरांना होणारा हा त्वचारोग संसर्गजन्य असल्याने यासंदर्भातील भीती वाढून गेली आहे. पशुसंवर्धन विभाग व राज्य शासनानेही याबाबत तातडीने पावले उचलत लसीकरणाच्या मोहिमेला वेग दिला आहे, राज्यस्तरावर यासंदर्भातील संपर्कासाठी मंत्रालयात समन्वय कक्षही स्थापन करण्यात आला असून, प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी कार्यदलाचे गठनही केले गेले आहे, पण कोरोनाकाळात एकूणच आरोग्य विभागातील उणिवा व मर्यादा ज्यापद्धतीने पुढे आल्या, त्याचप्रमाणे लम्पीमुळे पशुवैद्यक क्षेत्रातील अडचणीकडे लक्ष वेधले गेले आहे.
अकोला जिल्ह्यात सुमारे सातशेपेक्षा अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली असून, या जनावरांच्या संपर्कातील १५ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातही अकोल्यापेक्षा दोन-चारशे कमी अधिक संख्येच्या फरकाने जनावरांना लागण झाली आहे. हे प्रमाण आज मर्यादित आहे, त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून तातडीने जागरूक होणे व जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे बनले आहे. अमरावती विभागात सुमारे तीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून, त्यातील सुमारे एक लाख जनावरांचे लसीकरण पूर्णही करण्यात आले आहे. पशुवैद्यक विभागाने यासंदर्भात तत्परतेने पावले उचलली आहेत; मात्र अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी लसींचा पुरवठा झालेला नसल्याची तक्रार आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी पशुवैद्यक दवाखाने असले तरी तेथे पशुचिकित्सक नाहीत. या विभागातील पदभरतीचा अनुशेष बाकी असल्याने बहुतेक ठिकाणचा कारभार हा प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे. मनुष्यासाठीच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात जिथे सुविधा व अधिकाऱ्यांची वानवा असते, तिथे जनावरांसाठीच्या दवाखान्यांकडे कोण लक्ष पुरविणार? एकेका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे एकापेक्षा अधिक गावे आहेत म्हटल्यावर तेदेखील कुठे कुठे लक्ष पुरविणार? त्यामुळे काही ठिकाणी ग्रामपंचायतींनाच लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा या क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष या संकटाच्या निमित्ताने दूर होणे अपेक्षित आहे.
सध्या शेतीचा हंगाम जोरात आहे. शेतामधील कामांपासून बळीराजाला उसंत नाही. अशा काळात पशुधनावर आलेल्या संकटाने बळीराजा बेजार झालेला दिसत आहे. कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची अवस्था पाहून जसा प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलेला दिसे, तसे आता जनावरांवर आलेल्या या संकटाने बळीराजाचा जीव तूट तूट तुटताना दिसत आहे. तेव्हा लम्पीच्या लपेट्यातून पशुधनाची सोडवणूक करण्यासाठी अधिक गतिमानतेने कार्यरत होण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने प्रसंगी सक्तही व्हायला हवे. लम्पीच्या संसर्गाची शक्यता बघता गुरांच्या आठवडे बाजारावर निर्बंध असताना खामगावमध्ये असा बाजार भरलाच कसा, याचीही चौकशी व्हायला हवी.
सारांशात, लम्पीचा संसर्ग वाढण्यापूर्वीच त्याबाबतच्या जन-जागरणासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने गावातील गोठ्या-गोठ्यांपर्यंत पोहोचण्याची व जनावरांच्या लसीकरणाची मोहीम तीव्र केली जाणे अपेक्षित आहे.