- संजीव साबडे, समूह वृत्तसमन्वयकसोलापूर हे पूर्वापार कापड उद्योगाचे मोठे केंद्र होते. एकीकडे हातमाग, दुसरीकडे चादरी व टॉवेल आणि काही कापड गिरण्या असल्याने तेथील अर्थकारण कापड उद्योगावरच अवलंबून होते. त्यापैकी नरसिंग गिरजी व लक्ष्मी विष्णू या दोन कापड गिरण्या मोठ्या होत्या. आधी नरसिंग गिरजी गिरणी बंद पडली आणि नंतर १९९२च्या सुमारास लक्ष्मी विष्णू मिलही बंद झाली. लक्ष्मी विष्णूचे सोलापूरकरांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनाही आकर्षण होते. कारण ती गिरणी मराठी माणसाने सुरू केली होती. मंगळवारी माधवराव आपटे यांचे निधन झाले, तेव्हा पुन्हा एकवार लक्ष्मी विष्णू, फलटणचा साखर कारखाना आणि आपटे अमाल्गमेशन, कॅम्लिन, मुंबईतील कोहिनूर मिल यांची आठवण अनेकांना झाली. कारण माधवराव आपटे आणि त्यांचे कुटुंब या सर्वाशी संबंधित होते. किंबहुना, यातील कॅम्लिन वगळता अन्य उद्योग आपटे कुटुंबीयांचेच होते.उद्योजक माधवराव आपटे म्हणून ते फारच कमी लोकांना माहीत होते. माधवराव आपटे यांचे क्रिकेटवरील अतीव प्रेम हे त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल, पण त्यामुळे एके काळी हजारो लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या माधवराव आपटे व आपटे कुटुंबीय यांना विसरून चालणार नाही. एके काळी लक्ष्मी विष्णू मिलच्या जाहिराती मराठीच नव्हे, तर इंग्रजी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिसत. अतिशय चांगल्या दर्जाचे कापड हे लक्ष्मी विष्णू मिलचे वैशिष्ट्य होते. अशा कुटुंबात माधवराव आपटे वाढले होते, पण क्रिकेटचे प्रेम घेऊन.फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखानाही आपटे कुटुंबाचाच. त्या काळात जे महत्त्वाचे खासगी साखर कारखाने होते, त्यात फलटणच्या साखर कारखान्याचा उल्लेख करावाच लागेल, पण तोही टिकला नाही. दादरच्या कोहिनूर मिलच्या जागेवर मोठा टॉवर सध्या उभा राहत आहे. त्या मिलशीही माधवराव आपटे व त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध होते. तीही कालांतराने बंद पडली. मुंबईत आपटे कुटुंबीयांच्या अनेक मालमत्ता होत्या व आहेत. एके काळी लहान मुलांमध्ये जम्बो आइसक्रीम अतिशय लोकप्रिय होते. प्लॅस्टिकच्या चेंडूमध्ये ते आइसक्रीम मिळत असल्याने मुलांना त्याचे आकर्षण होते. स्वस्तिक समूहही आपटे कुटुंबीयांचाच होता.पण कोहिनूर मिलचा संबंध असणे क्रिकेटपटू असलेल्या माधवराव आपटे यांना अडचणीचा ठरला. ते ज्यावेळी क्रिकेटमध्ये कारकीर्द करू पाहत होते, त्यावेळी भारतीय क्रिकेटच्या निवड समितीवर लाला अमरनाथ यांचा वरचष्मा होता. लाला अमरनाथ यांनी कोहिनूर मिलच्या उद्योगाचा दिल्लीत काही भाग हवा होता. माधवराव आपटे यांनी लाला अमरनाथ यांची व लक्ष्मणराव आपटे यांच्याशी ओळख करून दिली, पण तो व्यवसाय लाला अमरनाथ यांना मिळाला नाही. बहुधा त्याचमुळे लाला अमरनाथ निवड समितीमध्ये असेपर्यंत माधवराव आपटे यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. लाला अमरनाथ समितीवरून गेल्यानंतरच माधवराव आपटे कसोटी क्रिकेटमध्ये आले.माधवराव हे अतिशय लाघवी, प्रेमळ आणि ज्यांच्याशी गप्पा माराव्यात, असे व्यक्तिमत्त्व होते. क्रिकेटशी प्रेम असले, तरी सर्व क्षेत्रांत त्यांचा वावर असायचा. साहित्य, राजकारण, संगीत अशा साºया बाबींमध्ये त्यांना रस होता. या क्षेत्रांतील मंडळींमध्ये त्यांचा वावर होता. शिवाजी पार्क हे त्यांचे प्रेम होते. शरद पवार, मनोहर जोशी यांच्यापासून उद्योजक माधवराव जोग, कॅम्लिनचे सुभाष दांडेकर अशा दिग्गजांशी त्यांचे उत्तम संबंध होते.माधवराव आपटे गेल्या काही वर्षांत शिवाजी पार्कमधील हॉटेलात मित्रांंबरोबर जसे जेवायला आलेले दिसत, तसेच सीसीआयमध्येही खेळाडू, राजकारणी यांच्यासमवेत त्यांचा वावर असे. माधवराव आपटे मुंबईचे नगरपाल होते. उद्योजकांच्या मुंबई चेंबर आॅफ कॉमर्ससारख्या अनेक संस्था, संघटनांशी त्यांचे संबंध होते. शिवाय क्रिकेटविषयक सर्व सीसीआयसारख्या मोठ्यापासून अतिशय लहानसहान संस्था, वरिष्ठ व नवोदित खेळाडू यांमध्ये आपटे यांचा संबंध होता. तब्बल ५0 वर्षे ते कांगा लीग स्पर्धेशी निगडित होते आणि विनू मंकड, विजय मर्चंट, पॉली उम्रीगर, सुभाष गुप्ते यांच्याबरोबर क्रिकेट खेळलेले माधवराव आपटे नंतर सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांच्यासारख्या बºयाच नंतरच्या पिढीतील खेळाडूंसहही खेळले. बॅडमिंटन व स्कॅश या खेळांमध्येही ते पारंगत होते. बॅडमिंटन त्या काळात फार लोकप्रिय नव्हता आणि आपटेंचे प्रेम क्रिकेटवरच होते. अन्यथा ते बॅडमिंटनपटू म्हणूनही ओळखले गेले असते.
माधवराव आपटे: खेळाडू, उद्योजक आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 4:26 AM