मिलिंद कुलकर्णीबिहारनंतर नव्या वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणकंदन होणार आहे. ‘आगे राम और पिछे वाम’ असे स्वत:च्या पक्षाच्या स्थितीचे वर्णन करणाऱ्या ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा हे राज्य राखतात काय? लोकसभा निवडणुकीत दोन वरुन १८ वर पोहोचलेल्या भाजपने कमळ फुलविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा चालविली आहे, त्यात त्यांना यश येते काय? साम्यवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडीचे भवितव्य काय राहील? ओवेसी यांच्यामुळे तृणमुल काँग्रेसच्या अल्पसंख्यक मतांच्या पेढीला धक्का पोहोचेल काय? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.रवींद्रनाथ टागोर यांनी १९०६ मध्ये लिहिलेल्या ‘आमार सोनार बांगला’ या काव्याची मोहिनी अद्याप देशवासीयांवर आहे. स्वातंत्र्यलढयातील बंगालचे योगदान, साहित्य, संस्कृती, चित्रपट या क्षेत्रातील बंगाली कलावंतांची कामगिरी भारतीय इतिहासाचा ठेवा आहे. याच बंगालमध्ये नंतर स्थित्यंतरे घडली. नक्षलवादी आंदोलन, सिंगूर व नंदीग्राममधील आंदोलनांनी बंगालमध्ये राजकीय सत्तांतरे घडवली. काँग्रेसच्या सिध्दार्थ शंकर रे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नक्षलवादी आंदोलन दडपण्यासाठी दमनतंत्राचा केलेला अवलंब काँग्रेसला सत्तेतून पायउतार होण्यास कारणीभूत ठरला. डाव्या पक्षांनी २०११ पर्यंत अनभिषिक्त राज्य केले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी डाव्या सरकारविरुध्द आंदोलन केले. पुढे काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष काढला. सिंगूर आणि नंदीग्राममधील प्रकल्पांविरोधात लोकक्षोभ निर्माण झाला आणि डाव्यांची सत्ता गेली. दहा वर्षांत ममता बॅनर्जी यांनी एकांडया शिलेदारासारखा बंगालचा किल्ला लढवला. ‘माँ, माटी और मानुष’ ही घोषणा बंगाली लोकांना भावली. परंतु, भावनिक राजकारण फार काळ चालत नाही, हे काँग्रेस, डाव्यांपाठोपाठ तृणमूल काँग्रेसलादेखील लक्षात आले. विकास आणि जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढविणारे ठरले आहे.तृणमूल काँग्रेसमधून दिलीप घोष, मुकुल रॉय, शुभेदू अधिकारी यांच्यासारखे प्रमुख नेते बाहेर पडल्याने ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. जहाज बुडत असताना उंदीर सगळ्यात आधी पळतात, अशी मल्लीनाथी ममतादीदींनी केलेली असली तरी विविध प्रदेशात प्रभावशाली असलेले नेते, प्रमुख कार्यकर्ते सोडून जात असल्याने पक्षावर विपरीत परिणाम होत आहे. जनमानसातील प्रतिमेला धक्का बसत आहे. दहा वर्षांमधील ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन आता केले जात आहे. त्यांचा पुतण्या अभिजित बॅनर्जी यांचा सरकार व पक्षातील वाढता हस्तक्षेप, सक्षम व दावेदार असलेल्या नेत्यांना डावलून अभिजित यांची वारसदाराच्यादृष्टीने केली जात असलेली तयारी, निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या कार्यपध्दतीविषयी निर्माण झालेला असंतोष याचा परिणाम ही पक्षांतरे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.भाजपच्यादृष्टीने बंगालची लढाई प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपच्या अपेक्षा वाढल्या. गृहमंत्री अमित शहा, राष्टÑीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केद्रीय मंत्री कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक मंत्री, पदाधिकारी गेल्या काही महिन्यांपासून बंगालच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करीत आहे. तृणमूल काँग्रेसचा प्रभाव असलेल्या कोलकाता व नजिकचा परिसर याठिकाणी देखील लक्ष केद्रित केले जात आहे. देशभरातून रोजगारासाठी गेलेल्या मजुरांमध्ये भाजपची पाळेमुळे रुजविण्यासाठी ‘जय श्रीराम’चा नारा दिला जात आहे. कालीमातेला मानणाºया बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून हनुमान जयंती साजरी होत आहे, त्यामागे भाजपचा सांस्कृतिक राष्टÑवाद आहे.राजकीय हिंसाचार हा बंगालमधील राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. जे.पी.नड्डा यांच्या वाहनावर झालेला हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मारले जात आहे. आत्त्महत्येला राजकीय हत्या संबोधले जात असल्याचे ममता बॅनर्जी यांचे विधान त्याच अनुषंगाने आले आहे.महाराष्टÑातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि पुढे ते प्रत्यक्ष भेटणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महाराष्टÑातील प्रयोग बंगालमध्ये करण्याचा पवारांचा प्रयत्न दिसतोय. तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस अशी मोट बांधल्यास भाजपशी जोरदार मुकाबला करता येईल, असा पवार यांचा होरा आहे. कागदावर हे चित्र आशादायी असले तरी त्याचे अनेक पदर आहेत. वास्तव वेगळे आहे. गुंतागंूत आहे. ती सोडविण्यात पवार यांना यश येते काय आणि तृणमूल, डावे आणि काँग्रेस हे मनाचा मोठेपणा दाखवत, जुन्या गोष्टी विसरतात काय यावर महाराष्टÑाच्या प्रयोगाचे भवितव्य अवंलबून राहणार आहे.
महाराष्टÑातील प्रयोगाची बंगालमध्ये जादू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 12:17 AM